‘विनय’शील प्रभृति

    दिनांक  03-Mar-2021 22:22:14
|

Vinay Patil Bhandup_1&nbs
 
 
 
‘विद्यां ददाति विनयं, विनयात् याति पात्रताम्’ या संस्कृत श्लोकाप्रमाणे समाजात विनयशील प्रभृति, अशी ओळख निर्माण करणारे ठाणे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाचे निवृत्त उपनिबंधक विनय पाटील यांच्याविषयी...
मूळचे ठाणेकर असलेल्या विनय पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबात ‘विद्या विनयेन शोभते’ या उक्तीचा प्रत्यय येतो. त्यांचे आई-वडील, दोन्ही बहिणी, पत्नी शिक्षकी पेशात, तर विनय यांची मुलगीदेखील शिक्षिका आहे. विनय यांच्या वडिलांनी शिक्षण अर्धवट सोडाव्या लागलेल्या चाकरमान्यांसाठी गेली ४७ वर्षे भांडुपमध्ये ‘भांडुप विकास नाईट हायस्कूल’रूपी माध्यमिक शाळा उभारली आहे. कुटुंबात असे शैक्षणिक वातावरण असताना बारावीनंतर विनय १९८४ साली नुकत्याच स्थापन झालेल्या ठाणे महापालिकेत कर विभागात कारकुनी करू लागले. बारावीनंतर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स केलेला असल्याने कालांतराने महापालिकेत स्वच्छता निरीक्षकपदी नियुक्ती झाली. नोकरीच्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत विनय यांनी जून २०१९ मधील ‘एन्जोओप्लास्टी’ वगळता एकही वैद्यकीय सुट्टी घेतली नाही. हा त्यांच्या प्रामाणिकपणाचा दाखलाच म्हणावा लागेल. गेली १२ वर्षे ते ठाणे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात उपानिबंधक म्हणून कर्तव्य बजावून गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त झाले. इतर काळाप्रमाणेच कोरोना काळातही त्यांनी बजावलेल्या कामगिरीची पोचपावती म्हणजे, त्यांच्या निरोप समारंभाला उपस्थित सर्व कर्मचारीवृदांचे डबडबलेले डोळे होते!
 
‘जे जे जगी, जगती तया... त्यांना माझे म्हणा!’ या कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तीप्रमाणे विनय पाटील यांनी महापालिकेतील प्रत्येक पदाला न्याय दिला. कर विभागात असताना १९८४ची भीषण दंगल झाली होती. महापालिका स्थापन होऊन दोनच वर्षे उलटल्याने नव्याने करआकारणीची मोहीम हाती घेण्यात आली होती. मनात आणलं असतं, तर ठाणे शहरात कित्येक चाळींचे ते मालक बनू शकले असते. मात्र, विनयशील स्वभावाने असे कुठलेही गैरकाम न करता गोरगरीब, तसेच घर नसलेल्यांना सर्वोपरी मदत केली. स्वच्छता निरीक्षकपदाची जबाबदारी शिरावर घेतल्यानंतर विनय यांनी शहर स्वच्छतेचा विडा उचलला. किंबहुना, सफाई कामगारांच्या हितार्थ त्यांनी विविध योजनादेखील राबविल्या. मद्यपी कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून दारू सोडवल्याने कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून बचावली. कचरा-घाणीत काम केल्याने कामगार व्यसनांच्या अधीन जातात. परिणामी, डोक्यावर सावकारांचे कर्ज झाल्याने वसुलीसाठी पगाराच्या दिवशी पेटीवर सावकार येत. व्याजाची ही साखळी मोडण्यासाठी विनय यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने अर्थसंचयाची क्लृप्ती लढवली. सहकारातून बऱ्यापैकी निधी जमल्यानंतर सावकारांची गचांडी वळून देणी फेडली. तसेच कामगारांना अर्थसाक्षर बनवले. या उपक्रमात व्याजापोटी गोळा झालेल्या रकमेचा विनियोग दर दीपावलीत मिष्ठान्न भरून स्टीलचे डबे कामगारांना भेट दिले. अशा उपक्रमामुळे ठाणे ‘म्युनिसिपल क्रेडिट सोसायटी’च्या निवडणुकीत दोन वेळा दमडीही खर्च न करता ते निवडून आले. कामगारांनाही स्वच्छतेचे धडे देऊन आरोग्यदायी मंत्र दिल्यामुळे, त्यांचा प्रभाग म्हणजे नेहमीच स्वच्छ व सुंदर असे. कामातील या सचोटीमुळेच त्यांना मुख्य स्वच्छता निरीक्षकपदी बढती मिळाली.
 
सन २००८ मध्ये विनय यांच्यावर जन्म-मृत्यू विभागात उपनिबंधकपदाची जबाबदारी आली. येथील १२ वर्षे बजावलेल्या सेवाकाळात देशभरातील तसेच, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मन येथील भारतीय वंशाच्या मूळ ठाणेकरांच्या जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी ठाणे महापालिकेने तब्बल २०० वर्षांपूर्वीच्या जतन करून ठेवलेल्या जन्म-मृत्यूच्या बाडमधून संदर्भ शोधून दिले आहेत. एखाद्याकडे कुठलाच पुरावा नसेल, तर जन्म-मृत्यूची नोंद शोधणे तसे जिकिरीचे काम असते. मात्र, जन्म अथवा मृत्यू कुठल्या सणाच्या किंवा तिथीच्या आसपास झाल्याची आठवण जरी अर्जदाराने सांगितली, तरी विनय पाटील व त्यांचे कर्मचारी ती नोंद लीलया शोधून देत. यामुळे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींसह पोलीस, पत्रकार, अनेक आयएएस अधिकारीदेखील त्यांचे मित्र बनले. नोकरीत रुजू झाल्यापासून २०१९ पर्यंत एकही वैद्यकीय रजा न घेतलेल्या विनय पाटील यांचा निवृत्तीकाळ काही महिन्यांवर होता. इतक्यात २०२० मध्ये कोरोनाची महामारी आली. मृत्यूचे थैमान सुरू होते. वयोमान व ‘एन्जोओप्लास्टी’ झालेली असल्याने सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रजेवर जाणे जरुरी होते. पण, ‘कोविड’ काळात कच खाऊन चालणार नव्हते. विनय यांनी ‘कोविड’चे हे नऊ महिने खंबीरपणे पाय रोवून लढा दिला. मध्यंतरी प्रकृती ढासळली, तरी काही दिवस घरातूनही कारभार हाकला. शववाहिका, गॅसवाहिनी, ‘पीपीई किट’ घालून अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची फौज सज्ज ठेवणे मोठे जिकिरीचे काम होते. ठाण्यातच नाही, तर संपूर्ण जिल्हाभरातून रात्री-अपरात्री फोन येत. त्या सर्वधर्मीय ‘कोविड’ मृतदेहांवर त्या-त्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार प्रक्रियेबाबत मदतीचा हात दिला.
 
आजवरच्या सेवेत सर्वस्तरातील व्यक्तींना मदतीचा हात देणाऱ्या विनय पाटील यांनी अनेकांचे उद्ध्वस्त होणारे संसारदेखील सावरले. काहींना उपजीविकेसाठी रोजगार उपलब्ध करून दिला. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाचा वापर टाळल्यास प्रदूषणमुक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनदेखील होईल. याबाबत जनजागृती करीत असून सेवानिवृत्तीनंतरही ते मदतकार्यात अग्रेसर आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा.
- दीपक शेलार
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.