रामदासकथित सेवकधर्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2021
Total Views |

Ramdas Swami_1  
 
 
 
समर्थांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला, त्यावेळी शिवाजी महाराजांबरोबर बाळाजी आवजी चिटणीस, निळो मुजुमदार व इतर सरदार आणि सेवक वर्ग आदी हजर होते. त्यांच्या विनंतीवरून समर्थांनी सर्वांना अनुग्रह दिला. त्यावेळी त्यांना उद्देशून स्वामींनी ‘सेवकधर्म’ सांगितला. राजाच्या बरोबर चाकरीत असताना लोकांनी कसे वागावे, याचे विवरण रामदासस्वामींनी ‘सेवकधर्म’ या स्फुटात केले आहे. स्वामींचे लोकव्यवहाराचे निरीक्षण त्यात दिसून येते.
 
 
 
राजधर्माचे श्रेष्ठत्व महाभारतानेही वर्णिले असले तरी ‘क्षात्रधर्म’ आणि ‘सेवकधर्म’ समर्थांनी निवेदन करून ते दोन्ही राजांसाठी व राज्यासाठी उपयुक्त आहेत, असे सांगितले आहे. ‘धर्मस्थापना’ हे मुख्य ध्येय असल्याने क्षात्रधर्मीय व सेवकधर्मपालक या दोघांनीही त्याकडे लक्ष दिले पाहिजे. कुठलेही राजकीय कार्य असो, सामाजिक कार्य असो अथवा धर्मसंस्कृती रक्षणाचे कार्य असो, त्यासाठी संघटना ही अत्यंत महत्त्वाची असते. संघटन भक्कम असेल, तर यशाची खात्री असते. या संघटनेच्या जोरावर ‘क्षात्रधर्म’ व ‘सेवकधर्म’ पाळणाऱ्यांनी देवद्रोह करणाऱ्याची गय करू नये. त्यांनी हे लक्षात ठेवावे की, जे देवाचे दास आहेत, तेच यशस्वी होणार आहेत, याबद्दल किंचितही शंका मनात बाळगू नये.
 
 
देवदास पावती फत्ते ।
यदर्थी संशय नाही॥
 
वाकेनिसी प्रकरणाच्या टिपणानुसार शके १५७१, वैशाख शुद्ध नवमी, गुरुवार रोजी शिवाजी महाराजांस शिंगणवाडीच्या बागेत समर्थांनी अनुग्रह दिला. हनुमंतस्वामींच्या बखरीतही ‘शिव-समर्थ भेटी’चे व अनुग्रहाचे वर्णन आले आहे. समर्थांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला, त्यावेळी शिवाजी महाराजांबरोबर बाळाजी आवजी चिटणीस, निळो मुजुमदार व इतर सरदार आणि सेवक वर्ग आदी हजर होते. त्यांच्या विनंतीवरून समर्थांनी सर्वांना अनुग्रह दिला. त्यावेळी त्यांना उद्देशून स्वामींनी ‘सेवकधर्म’ सांगितला. राजाच्या बरोबर चाकरीत असताना लोकांनी कसे वागावे, याचे विवरण रामदासस्वामींनी ‘सेवकधर्म’ या स्फुटात केले आहे. स्वामींचे लोकव्यवहाराचे निरीक्षण त्यात दिसून येते. समर्थांच्या ठायी सूक्ष्म अवलोकन व बहुश्रुतता हे गुण होते. त्यांनी या स्फुटात मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने दाखवले आहेत. सेवकांना उपदेश करताना समर्थांनी प्रथम स्वामिनिष्ठा कशी असावी, हे सांगितले आहे. सर्व प्रथम सेवकाने आपल्या मालकाला काय हवे, ते नीट समजून घ्यावे. काही सेवक नोकरीत रुजू झाल्यावर आपले पूर्वीचे दिवस विसरून जातात. आता आपण राजाकडे काम करतोय, याचा गर्व करू लागतात. त्यांच्या मनात काही स्वार्थी विचार घोळू लागतात. त्यांच्या वागणुकीत फरक पडतो. ते ‘सेवकधर्मा’ला निरुपयोगी होतात.
 
उगाच गर्वे मेला।
मागील दिवस विसरला।
स्वार्थचि करू लागला। म्हणजे गेले॥
 
असा हा गर्विष्ठ, स्वार्थी सेवक मोठ्यांना बुद्धी शिकवायला लागतो. त्यालाच सर्व कळते इतरांना नाही, अशी त्याची भावना होते. अशा मूर्खाला कोणती पदवी द्यावी? मालकाची आज्ञा पाळणे हा सेवकाचा धर्म आहे. सेवकाने त्यात कामचुकारपणा करू नये. सेवकाला चांगल्या कामाबद्दल बक्षीस देणे हे धन्याचे कर्तव्य आहे. सेवकाने नेहमी स्वामी कार्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. आपल्या स्वार्थापायी धन्याचे नुकसान होत आहे, हे माहीत असूनही त्याकडे जो कानाडोळा करतो. अशाला ‘सेवक’ म्हणता येणार नाही.
 
आप स्वार्थ उदंड करणे।
आणि स्वामिकार्य बुडवणे।
ऐसी नव्हेत की लक्षणे। सेवकाची॥
 
सेवकधर्माचे मुख्य वर्म हे आहे की, त्याने मालकाशी कधीही खोटेपणाने वागू नये. खोटेपणा उघड झाला नाही तरी सेवकाच्या वागणुकीत फरक पडतो, त्यांच्या वागणुकीत संभ्रम निर्माण होतो. संभ्रम निर्माण झाल्यावर सेवकधर्म राहत नाही. मग पुढे वैभव कसे प्राप्त करता येईल?
 
सेवकाचे मुख्य वर्म ।
काही नसावे कृत्रिम।
कृत्रिम केलिया संभ्रम। कैचा पुढे॥
 
सेवकाने मालकाशी प्रामाणिक राहिले पाहिजे, खोटेपणा करू नये हे तर खरेच; परंतु, राजानेही सेवकांकडे नीट लक्ष ठेवले पाहिजे. माझे सेवक चांगले आहेत, असे गृहित धरून राजाने गाफिल राहू नये. थोडक्यात, सेवकांवर अंधविश्वास न ठेवता राजाने सदैव जागरूक असावे. सर्वच माणसे काही सारखी नसतात. राजा जर सेवकांवर अतिविश्वास ठेवून त्यांच्यावरच अवलंबून राहू लागला, तर तो सेवकांकडून नाडला जाण्याची शक्यता असते. म्हणजे असा राजा सेवकांच्या अधीन झाला असे म्हणावे लागेल. राजाच्या अंगी जर अशी पराधीनता आली तर त्याला काय म्हणावे? आता सेवकाच्या दृष्टीने विचार केला, तर सेवकानेदेखील राजाने त्याच्यावर जो विश्वास दाखवला, त्या विश्वासास पात्र झाले पाहिजे. आपल्या वागणुकीतून ती पात्रता त्याने दाखवली पाहिजे. आपला सेवकधर्म प्रामाणिकपणे बजावला पाहिजे. राजाशी स्वामिनिष्ठ राहिले पाहिजे. असे असले तरी क्वचितप्रसंगी एखाद्या सेवकास काही कारणाने वैऱ्याकडे शत्रुपक्षाकडे जाण्याची बुद्धी होते. ते कृत्य कदाचित स्वार्थबुद्धीने असेल किंवा वैऱ्याने लालूच दाखवल्यामुळे असेल किंवा शत्रूने गोड बोलून काही लाच दिल्यामुळे असू शकेल. ते काहीही असो, ज्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था केली, त्याच्याशी दगाबाजी करणे हे चांगले नाही. विश्वासघात करणाऱ्या अशा बेईमान सेवकास तात्पुरता लाभ मिळेल, पण त्याच्या मनात स्वामिद्रोहाचे शल्य कायम डाचत राहिल हे नक्की! या जन्मात तर त्याचा दुर्लौकिक होईल आणि मेल्यानंतरही चांगली गती मिळणार नाही, यासाठी कोणीही विश्वासघात करू नये. ‘सेवकधर्म’ पाळण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 
 
सेवक विश्वास दाविती।
वैरियाकडे मिळोन जाती।
त्या चांडाळासि गती। कोठेचि नाही॥
 
विश्वासघात करून शत्रुपक्षाला मिळणाऱ्या सेवकाला समर्थांनी चांडाळ म्हणजे अत्यंत दुष्ट, नीच म्हटले आहे. समर्थांनी येथे ‘चांडाळ’ शब्द तिरस्काराने वापरला आहे. इतकी त्यांनी विश्वासघाताची, फुटीरतेची चीड होती. सेवकांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण समर्थांनी नोंदवले आहे व उपयुक्त सल्लाही दिला आहे. एखादा सेवक कामावर ठेवला. काम पाहून त्याला बढती दिली किंवा पगार वाढवला तर क्वचित प्रसंगी तो शेफारून जातो, गर्वाने फुगून जातो. माझ्यावाचून धन्याचे अडते, असे त्याला वाटू लागते. यासाठी सेवकांची बदली करत राहिले पाहिजे, तर सेवक आज्ञेत राहतील आणि राजाचे समर्थपण कायम राहील.
 
कामाकारणे ठेविले।
काम पाहूनि वाढविले।
तेही उगेच गर्वे फुगले।
कोण्या हिशोबे।
या कारणे बदलीत जाणे।
सेवक आज्ञेच्या गुणे।
तरीच समर्थपण जाणे। समर्थासी॥
 
शेवटी समर्थांनी सांगितले आहे की, आपले काम झाले नाही तरी चालेल, पण कधीही सेवकाधीन होऊ नये. या सर्व सेवकधर्मात समर्थांचे बारकाईचे निरीक्षण मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने त्यांनी पाहिल्याचे स्पष्ट होते. शिवाजी महाराजांच्या सेवकांना केलेला हा उपदेश आहे. शिवाजी महाराजांच्या अनुग्रहाच्या वेळी त्यांनी समर्थांची पूजा केली. समर्थांना पोवळी, मोती, पुतळा, मोहोरा इत्यादीकांचा अभिषेक केला. समर्थांनी ते द्रव्य मोठ्या परातीत घेऊन सर्वच उधळून टाकले आणि गुराख्यांच्या पोरांस ते घेऊन जाण्यास सांगितले. आजही शिंगणवाडीच्या परिसरात समर्थांचा व शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेली एखादी पवित्र मोहोर पुतळी तिथे मिळते असे म्हणतात.
 
- सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@