वैदिक सणांचे योग रहस्य भाग-१६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2021
Total Views |

sa_1  H x W: 0
 
 
 
 

कूर्मजयंती
 
चतुर्दशीला ‘कूर्मजयंती’ येते. हिंदू मंदिरांच्या प्रवेशद्वारी कूर्माची (कासवाची) प्रतिमा असते. ती का? तर भक्ताने भगवंतासमोर जाताना कूर्माप्रमाणे सर्वांग आणि मन आत ओढायचे म्हणजे अंतर्मुख करायचे असते. भगवंत गीतेतील दुसऱ्या अध्यायात म्हणतात, ‘यदा संहरते चायं कूर्मोऽड्.ननीवसर्वशः। इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥’ श्लोक ५८, अ. २। याशिवाय कूर्माचे महत्त्व समुद्रमंथनाच्या प्रकरणात सांगितलेच आहे. कूर्मनाडी सिद्ध झाल्यास मेरुदंडाच्या साहाय्याने साधकाच्या शरीरातील समुद्रमंथन होऊन देववृत्तींना अमृताचा लाभ होतो. समुद्रातून १४ रत्नेच का निघाली? तर साधकाच्या शरीरात सप्तचक्रे असतात. प्रत्येक चक्रातून साधकातील देव आणि दैत्य वृत्तीनुसार ७ X २ = १४ रत्ने निघणार! हीच ती समुद्रमंथनातील १४ रत्ने होत. १४ रत्ने निघाली म्हणून चतुर्दशीलाच ‘कूर्मजयंती’ साजरी करतात. चांगल्या वृत्तींच्या साहाय्याने वाईट वृत्तींवर विजय मिळविणे व चांगल्या वृत्तींच्याही पलीकडे जाऊन मनातील कोणत्याही विचारांच्या प्रभावाखाली न राहता निर्विकल्प होणे हीच मुक्ती; अन्यथा साधकाला चांगल्या कर्माचाही अहंकार वाईटच. संयमाशिवाय आत्मज्ञान नाही. सर्वसाधारणांकरिता या अतुल अवस्थेचे स्मरण असावे म्हणून दर ग्रीष्मात चतुर्दशीला कूर्मजयंती साजरी करतात. समुद्रमंथन झाल्यावर आता तूर्त कशाचीच आवश्यकता नसल्याने पौर्णिमेला ‘वैशाखस्नान’ समाप्ती होते.
 
शनैश्वर जयंती
अमावस्येला ‘शनै: शनै: चरणस्थ’ शनी ग्रहाची जयंती येते. देवाची जयंती आपण समजू शकतो. पण जड अशा मानलेल्या शनी ग्रहाची जयंती कशाकरिता करायची? एकदा शनैश्वराने आपल्या पृथ्वीला जीवदान दिले होते. त्याच्या त्या दयार्द्र वर्तनाबद्दल आपण पृथ्वीवरील मानव अजूनही ‘शनैश्वर जयंती’ साजरी करतो. फार प्राचीन काळातील गोष्ट आहे. खगोलशास्त्रज्ञांनी यातील रहस्य संशोधन करावे. अतिप्राचीन काळी शनी ग्रह पृथ्वीकडे सरकू लागला. शनीसारखा प्रचंड ग्रह पृथ्वीच्या निकट आल्यावर पृथ्वीचा नाश अटळ होता. त्यावेळी पृथ्वीवर दशरथ राजा राज्य करीत होता. त्याचे गुरू वसिष्ठांना पृथ्वीचा नाश होण्याचे दुश्चिन्ह स्पष्टपणे दिसू लागले. त्यांनी दशरथाला एक दिव्य रथ आणि अस्त्र दिले. त्या रथावर बसून तो चंद्रावर गेला आणि तेथून आपल्या अस्त्राचा मारा करून त्याने शनैश्वराचा पृथ्वीवरील हल्ला परतविला. ही कथा गणेश पुराणात आली आहे. शनी हा सूर्यपुत्र मानला जातो.
 
खगोलशास्त्रीय इतिहास सिद्धांत
 
खगोलशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास वरील कथेत आपल्या सूर्यमालेतील अतिप्राचीन काळच्या एका भयंकर घटनेचा इतिहास आहे. आज सूर्यमालेत पृथ्वीनंतर मंगळ आहे. परंतु, लेखकाच्या मते, हा मंगळ पृथ्वीपासूनच वेगळा फेकला गेलेला एक तुकडा आहे. चंद्र ज्यावेळेस गुरुग्रहापासून सुटून पृथ्वीच्या कक्षेत घुसला, त्यावेळेस काही काळ पृथ्वीचे स्वांगपरिभ्रमण बंद पडून पृथ्वीच्या एका भागावर सूर्याची प्रखर उन्हे सतत पडल्यामुळे तो भाग फुटून अवकाशात फेकला गेला असावा. पृथ्वीवर त्यामुळे जो प्रचंड खड्डा पडला. त्याचे चिन्ह आजही पृथ्वीवर आहे. तो ‘मंगळ खड्डा’ म्हणजे प्रशांत महासागर होय. प्रशांत महासागर आणि मंगळाचा व्यास जवळ जवळ सारखाच आहे. मंगळालाही आपल्या भाषेत ‘भौम’ वा ‘भूमिपुत्र’ म्हणतात. त्यावरून मंगळ हा पृथ्वीचाच अंश असावा, असे अनुमान निघू शकते. मंगळावर गेल्यावर तेथील प्रस्तराचे संशोधन होऊन तेथील आणि पृथ्वीवरील प्रस्तरांचे आयुष्य जर सारखेच निघाले, तर व्यासकथेतील सिद्धांताचे महत्त्व जगाला पटेल.
 
पृथ्वीपासून मंगळ ग्रह बाहेर फुटून पडण्यापूर्वी ही अतिप्राचीन काळातील गोष्ट आहे. त्यावेळेस पृथ्वीनंतर मंगळ ग्रह नसावा. आज ‘रोहिणी शकटा’च्या रूपाने जो असंख्य लघुग्रहाचा एक पट्टा गुरू ग्रह आणि मंगळाच्या मध्ये दृष्टीस पडतो, तो त्या काळात पृथ्वी आणि गुरू ग्रहामध्ये असावा. परंतु, खगोल शास्त्रज्ञांच्या मते, हा लघुग्रहांचा पट्टा म्हणजे ‘रोहिणी शकट’ आज दिसते तसे अनेक लघुग्रहांचे नसून त्या कक्षेत पूर्वी फिरणाऱ्या एका मोठ्या ग्रहाचे काही आकाशस्थ दुर्घटनेमुळे तुकडे होऊन त्या तुकड्यांची स्वैरगती म्हणजे हा ‘रोहिणी शकटा’चा पट्टा असावा. म्हणजे एका अतिप्राचीन काळी हे ‘रोहिणी शकट’ नसून एखादा मोठ्ठा ग्रहच तेथे आपल्या कक्षेत फिरत असावा. शनी ग्रह याच ‘रोहिणी शकटा’जवळ सरकला होता. त्यामुळे त्यास्थानी पूर्वी असलेल्या प्रचंड ग्रहाचा नाश होऊन त्याचे तुकडे झाले असावे. शनी ग्रह आणखी पृथ्वीकडे सरकतच होता. पण, काही कारणांमुळे आदळला नाही. तेव्हापासून पृथ्वी आपले जीवन निर्वेध चालवित आहे. त्यावेळी शनैश्वराने पृथ्वीवर कृपाच केली म्हणायची. त्याचे स्मरण म्हणून अजूनही ज्येष्ठातील अमावस्येला ‘शनैश्वर जयंती’ साजरी करतात.
 
आषाढ आणि दशहरा
 
आषाढ शु. प्रतिपदेला ‘दशहरारंभ’ होतो. दशेंद्रियातील इंद्रियभाव हरण करण्याचा कालावधी म्हणजे ‘दशहरा’ होय. भगीरथाच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे त्याच्या ‘भगीरथ प्रयत्ना’प्रीत्यर्थ ‘दशहरा’ समारंभ उत्साहाने साजरा करतात. भगीरथ कथेत काय रहस्य आहे? भगीरथ म्हणजे आटोकाट प्रयत्न करणारा साधक. कपिल महामुनींचा शाप मिळून ते ६० सहस्र सागर दग्ध झाले. सांख्य तत्त्वज्ञानाचे म्हणजेच योगशास्त्राचे जनक कपिल महामुनी. त्यांचा शाप म्हणजे योगमार्गातील साधना योग्य न केल्याने उत्पन्न झालेला प्रखर शरीरदाह होय. कुंडलिनी जागृत झाल्यावर प्रत्येक साधकाच्या शरीराचा असा दाह होतो. राधेच्या अंगाचा असाच दाह होत होता. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ’चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी।’ इथे माऊली स्त्रियांच्या भाषेत बोलत आहेत. उच्च योगावस्थेत साधक स्त्रीभावात आरूढ होतो. रामकृष्ण परमहंस, संत गुलाबराव महाराज व सर्व खऱ्या संतांचा असाच स्त्रीभावाचा अनुभव आहे. मीराबाई म्हणतात, ’राणाने भेजा विषका प्याला पीबत मीरा हाँसी॥’ साधकाच्या ६० सहस्र नाड्यांत म्हणजे सगराच्या ६० सहस्र पुत्रांचा असाच दाह होऊन ते भस्म झाले. त्यांना पावन करण्याकरिता ज्ञानगंगेची आवश्यकता होती. त्यामुळे सगराप्रमाणे साधकाच्या शरीरस्थ ६० सहस्र दग्ध नाड्या शांत होतात. (अधिक माहितीसाठी लेखकाचे ‘कुंडलिनी’ हे पुस्तक वाचावे.) या साधनानुभवातील रहस्य भगवान वेदव्यासांनी भगीरथ कथेच्याद्वारे सुरक्षित ठेवले आहे. साधनामार्गात केवळ कल्पनांना वाव नाही. तेथे प्रखर प्रयत्न आहेत आणि प्रयत्नांती सुख देणारा फलप्रसाद आहे. असा हा ‘दशहरा’ ग्रीष्माचे शेवटच्या चरणात साधकरूपी भीष्माला पावन करतो. ऋतू भीष्म ग्रीष्मांचा देहपात ‘दशहरा’ समाप्तीतच होतो.
 
 
(क्रमशः)
 
 
- योगिराज हरकरे

(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
@@AUTHORINFO_V1@@