धैर्यशक्ती

    29-Mar-2021
Total Views |

Dhairyashakti  _1 &n
 
 
दया, क्षमा आणि शांती हे नैसर्गिक गुण अंगी बाणवले गेले की, माणसाचे आरोग्य संतुलित राहते. या संतुलनाला फार महत्त्व आहे. शरीरातील सर्व द्रव्ये, संप्रेरके व अवयवांची कार्य ही जेव्हा संतुलनात असतात, त्याचवेळी आरोग्य नीट राहते. कुठलेही गुण जेव्हा शरीर व मनास समतोल व संतुलन राखतात, तेव्हा ते गुण निसर्गाकडूनच आलेले असतात.
 
 
म्हणूनच आपण सर्वस्वी निसर्गालाच परमेश्वर मानून निसर्गाची सेवा केली पाहिजे आणि नैसर्गिक गुण अंगी बाणवून आयुष्य निरोगी केले पाहिजे. निसर्गाचा अजून एक गुण जो शरीर व मनाला बळकटी देणारा आहे व तो म्हणजे धैर्य (Courage), जो मनुष्य येणार्‍या परिस्थितीशी धैर्याने वागत असतो, अशा माणसाला कधीही नकारात्मक ऊर्जा स्पर्शून जात नाही.
 
 
कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची प्रकृती व त्यातून सकारात्मकरीत्या मार्ग काढण्याची कला व कसब हा निसर्गाने बहाल केलेला एक सुवर्णगुण आहे. जसे आपण पाहिले की, अनेक सकारात्मक गुण निसर्गात असतात. परंतु, या सद्गुणांना अपायकारक असे षड्रिपूसुद्धा या जगात आहेत. जसे आपण म्हणतो की, राम जसा आहे तशीच रावण प्रवृत्तीसुद्धा जगात आहे आणि या रावणाला जर मारायचे असेल, तर इतर सद्गुणांबरोबरच धैर्य हासुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. जेव्हा माणूस सद्गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळी त्याला रोखण्यासाठी मानसिक व शारीरिक विकार पुढे सरसावतात. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ व मोह हेच ते सद्गुणांचे शत्रू होय.
 
 
आता धैर्य म्हणजे काय? धैर्य म्हणजे निश्चयाने वागणे, धैर्य म्हणजे अढळपणा असणे, धैर्य म्हणजे धीराने वागणे. आजूबाजूची परिस्थिती कितीही नकारात्मक, वाईट किंवा मन सुन्न करणारी किंवा खचवणारी असेल, तरीही त्याला खचून न जाता धीराने काम करणे, मनाला ताब्यात ठेवून सकारात्मक कार्य करत राहणे यालाच ‘धैर्य’ म्हणतात. धैर्य व संयम हे दोन गुण माणसात असले तर माणसाची, मनाची व शरीराची ताकद अफाट वाढते.
 
 
मोडून पडला संसार
तरी मोडला नाही कणा।
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा॥
 
ही कुसुमाग्रजांची कविता आपल्याला धैर्य व संयमच शिकवते. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका हा प्रसंग तर मूर्तिमंत धैर्य व संयम यांचे प्रतीक आहे. धैर्याने कार्य करणे, म्हणजेच नुसत्या बाहेरील व आजूबाजूच्या परिस्थितीशी लढणे असे नव्हे, तर माणसाला बाहेरील शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूच जास्त असतात व हे अंतर्गत शत्रू हे दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच वाईट गुण षड्रिपू असतात, हे वाईट गुण सतत आपल्याला चांगले करण्यापासून परावृत्त करत असतात व स्वतःच मुजोर होत असतात.
 
या सर्व वाईट गुणांना जर ताब्यात ठेवायचे असेल, तरीसुद्धा धैर्य व संयम याची नितांत आवश्यकता असते. या एकेक गुणाला धैर्याने तोंड द्यावे लागते, तरच तो ताब्यात येतो. कठोर परिश्रम करावे लागतात. डॉ. हॅनेमान यांनी ’जीसरपेप’ या ग्रंथात लिहून ठेवलंय की, 'Organon' त्यांनी लिहिलेले हे वाक्य म्हणजे, तंतोतंत धैर्यच स्पष्ट करते. ‘होमियोपॅथी’चे विज्ञान सर्वतोपरी या गुणांचा वापर करते, यापुढे आपण सकारात्मक गुणाचा अभ्यास करूया व त्यानुसार आपली अंतर्गत शक्ती वाढवूया.
 
 
-डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
 
9869062276