ठाण्यातील रुग्णालयांची अग्निसुरक्षा धाब्यावर...

27 Mar 2021 16:43:08

fire saftey _1  


७६ रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिरोध यंत्रणाच नाही

ठाणे: भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर ठाणे शहरातील रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र, ठाण्यातील ३१७ रुग्णालयांपैकी २४१ रुग्णालयांनीच ‘फायर ऑडिट’ करून घेतले असून अद्याप सुमारे ७६ रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिरोध यंत्रणाच कार्यान्वित नसल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तेव्हा, भंडारा आणि भांडुप रुग्णालयांतील अग्निप्रलयानंतर ठाणेही आगीच्या तोंडी असल्याची भीती व्यक्त होत आहे.




भांडुप येथील ‘सनराईज’ रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ‘कोविड’ रुग्णालयांचे अग्निपरीक्षण तपासण्याचे आदेश दिले आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाला. तेव्हाही मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अग्निसुरक्षा व्यवस्था लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य खात्याने अग्निशमन दलाकडे ठाणे शहरातील ३१७ रुग्णालयांची यादी दिली होती. या यादीनुसार अग्निशमन दलाने सर्व रुग्णालयांना नोटिसा बजावून अग्निसुरक्षेचा आढावा घेतला होता. शासकीय आणि ठामपाच्या ३४ रुग्णालयांची अग्निसुरक्षाही तपासण्यात आली होती. या ३४ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ३१७ खासगी रुग्णालयांपैकी २४१ रुग्णालयांनी अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र, ७६ रुग्णालयांनी अद्याप आपला अहवालच सादर केला नसल्याची माहिती अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांनी दिली आहे.



भंडारा ते भांडुप...नाहक बळी

नववर्षात भंडारा जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून दहा नवजात बालकांचा नाहक जीव गेला होता. त्यानंतर, ठाकरे सरकारने अग्निपरीक्षण व अग्निसुरक्षेचे ढोल पिटले होते. मात्र, निधी उपलब्ध नसल्याने या अग्निसज्जतेला रोक लागल्याचे समजते. त्यातच आता पुन्हा भांडुपमधील खासगी रुग्णालयात आग लागून ११ रुग्णांना नाहक जीव गमवावा लागल्याने ठाकरे सरकारची दफ्तर दिरंगाई उघड झाल्याची चर्चा रंगली आहे.


Powered By Sangraha 9.0