टिग्रेच्या महिला आणि मानवता

26 Mar 2021 22:21:48

tigre _1  H x W



इथिओपिया... आफ्रिकेतील एक देश. इरिट्रिया, सुदान, येमनसारखे गरीब आणि गृहयुद्धात बळी गेलेले देश हे इथिओपियाचे शेजारी. इंग्रजांचे पारतंत्र्य येण्याआधी या देशाचे लोक प्रकृतीपूजक-निसर्गपूजक होते. जगभरातल्या इतर वनवासी-गिरीवासींसारखेच साधे भोळे होते.
 
 
जगभरातले इंग्रजांचे पारतंत्र्य सुटले. इथिओपियातूनही इंग्रजांनी काढता पाय घेतला. पण, पूर्वी १०० टक्के निसर्गपूजक असलेल्या देशात ७० टक्के लोकसंख्या ख्रिश्चन होती, तर काही टक्के मुस्लीम आणि काही टक्के ज्यू झाली. देशात ख्रिस्ती आणि मुस्लीम बहुसंख्याक झाले. त्यातच आफ्रिका खंडात अंतर्गत कलह, खंडातील देशांचे आपापसात युद्ध, युद्धसदृश स्थितीमुळे कामधंदे, व्यवसाय निर्मिती नाही, उत्पन्न नाही, त्यामुळे कुपोषण भूकमारी आणि आरोग्य समस्यांचे आगार हे देश बनले.
 
 
 
या देशांची परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की, जागतिक स्तरावर विकास करण्याच्या मानकात या अंकित देशांचा विकास करण्याचेच जास्त प्रयत्न असतात. कुपोषण आणि भुकबळीने हजारो- लाखो लोकांना वाचवणे हे संयुक्त राष्ट्राचे गेले कित्येक वर्षांचे काम. पण, तरीही आफ्रिका खंडातील देशांची परिस्थिती काही सुधारत नाही. दहशतवाद अतिशय विकृत आणि क्रूरपणे इथल्या नागरिकांचा घास घेत आहे. ‘बोको हराम’ असो की, आणखी कोणती संघटना, हे या देशामध्ये थैमान घालतात. देशाच्या सरकारने गुडघे टेकावे म्हणून या संघटना महिलांना ढाल बनवतात. छे, ढाल बनवत आहेत, असे म्हणूही शकत नाही.
 
 
कारण, ते महिलांवर निर्घृण अत्याचार करतात. का? तर जगभरात महिलांसाठी प्रामुख्याने दया, करुणा आणि न्यायिक भूमिका वरवर तरी आहे. तसेच प्रत्येक समाजात महिलांना इज्जतीचे बाहुले समजतातच. त्यामुळे महिलांवर अत्याचार केले की, त्याचा पडसाद समाजामध्ये उमटतोच उमटतो. म्हणून तर दहशतवादी कधी शेकडो मुलींचे शाळेतून अपहरण करतात, तर कधी महिलांचे अपहरण करून त्यांची अक्षरशः विक्री करतात. लैंगिक दासी म्हणून तिचा वापर करतात. का? तर तिच्यावरचे अत्याचार हे तिच्या समाजातील पुरुषांच्या मानहानीचे प्रतीक आहे, अशी दहशतवाद्यांची मानसिकता असावी.पण, आता याबाबत जरा वेगळा पैलू दृष्टीस येत आहे.
 
 
इथिओपिया या देशाच्या सीमेवरील टिगे्र हा भूभाग. टिग्रे भागातील लोक आता सीमेवरून सुदान या देशात पलायन करत आहेत. पण, सुदानच्या दिशेने पलायन करणार्‍या कितीतरी जत्थ्यांवर हल्ले झाले. त्यात मुख्यत: किशोरवयीन आणि तरुण मुलांवर गोळ्या झाडण्यात येतात. यामधील मुली-महिलांना बाजूला काढले जाते. त्यांच्यावर अमानुष बलात्कार केला जातो. इथे लहान बालिका किंवा वृद्ध महिलांनाही या अत्याचाराला सामोरे जावे लागतेच लागते आणि हो, हे सगळे त्यांच्या कुटुंबीयांसमोर केले जाते. इतके सगळे होत असतानाही टिग्रेचे नागरिक का सुदानचा मार्ग धरत आहेत? तर दगडापेक्षा वीट मऊ म्हणून! टिग्रेमध्ये हजारो लोक नाहक मरत आहेत.
 
 
संयुक्त राष्ट्राच्या पाहणीतून समोर आले की, टिग्रेच्या पाच छोट्या दवाखान्यांत मार्च महिन्याच्या मध्यात ५००च्यावर बालिका, महिला सामूहिक बलात्कार झाला म्हणून उपचारासाठी आल्या होत्या. हे तर केवळ पाच दवाखान्यांतले वास्तव. सगळ्या टिग्रेमध्ये काय होत असेल? या अत्याचारित महिलांनी दुःख व्यक्त करत संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधींना सांगितले की, सैनिकी वेशातील लोकांनी बंदुकीच्या धाकावर बलात्कार केला. इतकेच नव्हे, तर त्यांच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा अत्याचार पाहायला सक्तीही केली. भावाला बहिणीवर, पित्याला मुलीवर बलात्कार करण्याची जबरदस्ती केली. तसे केले नाही म्हणून त्यांनी किती तरी जणांची हत्या केली. त्यांना ज्या बालिका, महिला आवडल्या, त्यांना ते अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. हे सैनिक कोण असावेत? दहशतवादी सैनिकी वेशात आहेत का?
 
 
टिग्रेमध्ये सीमाभागात सुरक्षा म्हणून इथिओपिया सरकारनेही तिथे सैन्य पाठवले. दुसरीकडे इरिट्रिया देशाच्या सैनिकांनी टिग्रेमध्ये घुसखोरी केली आहे. इथिओपियाचे राष्ट्रपती म्हणतात की, “हे सगळे अत्याचार इरिट्रियाचे सैन्य करत आहे. त्यांनी त्यांचे सैन्य हटवावे. वाटलेच तर आम्हीही सैन्य हटवू.” मात्र, दोन देशांच्या अंतर्गत वादात टिग्रेच्या महिला नरकवास भोगत आहेत. संयुक्त राष्ट्राने यावर कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे. पण, तरीही अत्याचारित बालिका, महिलांचे उद्ध्वस्त भावविश्व कसे बदलणार? बलात्काराचे शारीरिक व्रण मिटतीलही; पण, मानसिक व्रण कसे मिटणार? टिग्रेच्या महिलांबाबत मानवता कुठे गेली?




Powered By Sangraha 9.0