मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात १० लाखांचा टप्पा पार झाला असून, आजपर्यंत एकूण १० लाख ८ हजार ३२३ लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी, ७ लाख ७ हजार ४७४ (७०.१६ टक्के) लसीकरण महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर करण्यात आले आहे. तसेच लसीकरण करण्यात आलेल्या एकूण व्यक्तिंपैकी ४७.३६ टक्के संख्या ज्येष्ठ नागरिकांची आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १६ जानेवारी २०२१ पासून पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीचे लसीकरण सुरु झाले. त्यानंतर १ फेब्रुवारीपासून पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणास सुरुवात झाली. तर १ मार्च २०२१ पासूनच्या तिसऱ्या टप्प्यात वयाची ६० वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आणि वयाची ४५ वर्षे पूर्ण होण्यासह सहव्याधी असलेले नागरिक यांच्या लसीकरणास प्रारंभ झाला. सध्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १०६ लसीकरण केंद्रे कार्यरत असून, २८ महापालिकेच्या अखत्यारितील आहेत. या २८ लसीकरण केंद्रांवर एकूण १५५ लसीकरण बूथ कार्यरत आहेत. तर राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारितील १२ लसीकरण केंद्रे कार्यरत असून तिथे एकूण १८ लसीकरण बूथ कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त विविध खासगी रुग्णालयांमध्ये ६६ लसीकरण केंद्रे कार्यरत असून, त्याठिकाणी लसीकरणासाठी एकूण ७४ बूथ आहेत. महानगरपालिका, राज्य शासन व केंद्र शासन यांच्या अखत्यारितील लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण करण्यात येत आहे. तर खासगी लसीकरण केंद्रांवर प्रति मात्रा रुपये २५०/- शुल्क आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सीन’ अशा दोन्ही प्रकारच्या लशी उपलब्धतेनुसार देण्यात येत आहेत. या अंतर्गत आजवर कोव्हिशिल्डच्या ९ लाख ३२ हजार २९१ इतक्या (९२.४६ टक्के) मात्रा देण्यात आल्या आहेत. तर कोव्हॅक्सीन लशीच्या ७६ हजार २७ इतक्या (७.५४ टक्के) मात्रा देण्यात आल्या आहेत. यानुसार एकूण १० लाख ८ हजार ३२३ इतक्या मात्रा आजवर देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली.