३० टक्क्यांनी ‘टीबी’चे रुग्ण झाले कमी
मुंबई: गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईसह देशभरात ‘लॉकडाऊन’ झाले होते. या ‘लॉकडाऊन’मुळे सर्व गोष्टी थांबल्या होत्या. पण या सर्वात मुंबईला एक फायदा झाला आहे. ज्यामुळे मुंबईला ‘टीबी’ नियंत्रणाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
२०२० या वर्षात मुंबईत ‘लॉकडाऊन’ करावे लागले. पण पण मुंबईत ’टीबी’च्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याचा नवा अहवाल समोर आला आहे. २०२० या वर्षात मुंबईत ’टीबी’च्या रुग्णसंख्येत तब्बल 30 टक्क्यांनी घट नोंदविण्यात आली आहे. २०१९ साली मुंबईत एकूण ६० हजार, ५९७ ‘टीबी’चे रुग्ण आढळले होते. २०२० या वर्षात त्यात घट होऊन ४३ हजार, ४६४ रुग्ण नोंदवले गेल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. याशिवाय कोरोनाचा संसर्ग झालेले २४१ ‘टीबी’चे रुग्ण नोंदवल्याचेही महापालिकेने म्हटले आहे.
मुंबईतील एकूण तीन विभागांना ‘टीबी’ रोगावर नियंत्रण मिळवल्याबद्दल केंद्र सरकारने पुरस्कारदेखील जाहीर केला आहे. परळ भागात मागील पाच वर्षांत ’टीबी’च्या रुग्णांमध्ये ४० टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. परळ विभागाला ‘टीबी’वर नियंत्रण मिळवल्याबद्दल केंद्राकडून रौप्यपदक जाहीर करण्यात आले आहे. कांस्यपदक हे घाटकोपर, प्रभादेवी आणि ग्रॅण्टरोड विभागाला देण्यात आले आहे.
‘टीबी’च्या रुग्णांवर कोरोना संसर्गामुळे मोठा परिणाम होईल आणि ’टीबी’ रुग्णांमध्ये वाढ होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. पण सुधारित आकडेवारीनुसार ही दिलासादायक बाब समोर आली. २०२० या वर्षात मुंबईत एकूण १३ हजार, १५५ ‘टीबी’च्या रुग्णांपैकी फक्त २४१ रुग्ण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आले आहेत. मुंबईसाठी हीदेखील एक चांगली गोष्ट आहे. मागील तीन महिन्यांत ‘टीबी’ची सहव्याधी असून कोरोनामुळे दगावलेला एकही रुग्ण आढळलेला नाही.