महापालिका समिती निवडणुकांवर कोरोनाची दहशत

25 Mar 2021 16:24:00

bmc_1  H x W: 0



मुंबई :
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेल्याने एप्रिलमध्ये होणाऱ्या वैधानिक आणि विषेश समित्यांच्या निवडणुकांवर कोरोना दहशतीची छाया आहे. मागील वर्षीही कोरोनाच्या धसक्यामुळे एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.


राज्यात आणि मुंबईत आटोक्यात येत असलेला कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पालिका प्रशासन चिंतेत आहे. मागील चार दिवसांमध्ये तीन ते पाच हजारांच्या दरम्यान रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे उसळी घेणाऱ्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत असताना काही ठिकाणी कडक निर्बंध येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत प्रशासन वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असले तरी काही तरी निर्णय घ्यावेच लागणार आहे. सध्या महासभेव्यतिरिक्त इतर समित्यांच्या सभा प्रत्यक्ष होत आहेत. महासभा ऑनलाईन पद्धतीने होत आहे. पण कोरोनाचा फैलाव असाच होत राहिल्यास सर्व समित्यांच्या सभा पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात होणाऱ्या वैधानिकसह विशेष समिती अध्यक्षांच्या निवडणुकांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.


सोमवार ५ एप्रिल रोजी शिक्षण व स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या दोन्ही समिती अध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी १ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. ६ एप्रिल रोजी सुधार समिती व बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकी ८ ते १२ एप्रिल दरम्यान होणार आहेत. त्यानंतर १९ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान १७ प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण असेच चालू राहिले आणि राज्य सरकारद्वारे परिपत्रक आल्यास या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता अधिक आहे.
Powered By Sangraha 9.0