दुसऱ्या परिवर्तन यात्रेची वेळ आता आली आहे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2021   
Total Views |

maharashtra_1  
 
समाज आता परिवर्तनासाठी आतुर झालेला आहे, अशा वेळी लोकमनाची हाक लक्षात घेऊन तिला दिशा आणि नेतृत्व केले पाहिजे. १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर हे काम गोपिनाथराव मुंडे यांनी समर्थपणे केले, हेच काम आता सक्षम नेतृत्वाने करायला पाहिजे. महाराष्ट्र ढवळून काढण्याची वेळ आता आलेली आहे.
गोपिनाथराव मुंडे यांनी मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर (१९९३) महाराष्ट्र ढवळून काढणारी परिवर्तन यात्रा काढली होती. तेव्हा मुख्यमंत्री होते शरदराव पवार. मुंबईतील बॉम्बस्फोट दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदाराने केले. त्यांच्या आणि शरद पवारांच्या हितसंबंधाचे वाभाडे गोपिनाथराव मुंडे यांनी विधानसभेत काढले. यामुळे सर्व महाराष्ट्र हादरून गेला होता. परिवर्तनासाठी जनता आतुर झाली होती. गोपिनाथरावांनी परिवर्तन यात्रा काढली आणि १९९५ साली सत्ताबदल झाला. हा इतिहास अतिशय मोजक्या शब्दात दिला आहे.
 
 
दुसऱ्या परिवर्तन यात्रेची वेळ आता आली आहे. सचिन वाझे प्रकरणाने महाराष्ट्र हादरलेला आहे. परमवीर सिंह यांच्या पत्राने राजकीय भूकंप झालेला आहे. महाविकास आघाडी ‘महावसुली आघाडी’ झालेली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांवर पोलीस महानिरीक्षक आरोप ठेवतो की, दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल केले जावेत. सचिन वाझे याची नियुक्ती त्यासाठी करण्यात आली. हे सर्व प्रकरण राज्याच्या सद्सद्विवेकबुद्धीला जबरदस्त हादरा देणारे आहे.
 
 
राज्य करवसुलीसाठी चालविले जाते, तो राज्याचा कायदेशीर अधिकार आहे. खंडणीवसुली गँगस्टर करतात. या गँगस्टरवर नियंत्रण आणण्याचे काम आणि त्यांना कायद्याच्या कक्षेत आणून शासन करण्याचे काम शासन व्यवस्थेचे असते. परंतु, शासन व्यवस्थाच जर खंडणी वसूल करणारी झाली तर कसे चालेल? शेताचे रक्षण करण्यासाठी कुंपण घालावे लागते. पण, कुंपणाने जर शेत खाल्ले तर रक्षण कुणापासून करायचे? हिंदी चित्रपटातील एक सुंदर गाणे आहे,
 
 
‘चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये,
सावन जो अगन लगाये, उसे कौन बुझाये।
पतझड जो बाग उजाडे, वो बाग बहार खिलाये
जो बाग बहार में उजडे, उसे कौन खिलाये’
 
 
याचा अर्थ सोपा आहे, आगीचे शमन पाण्याच्या धारा करतात; पण त्या धारांनीच जर आग लावली तर विझविणार कोण? वसंत ऋतूत बाग-बगिचे फुलतात; पण वसंत ऋतूनेच बाग उजाड केली तर बाग फुलणार कशी? ज्यांनी रक्षण करायचे, तेच भक्षण करू लागले तर रक्षण कोणी करायचे? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 
 
 
सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी दल या सरकारच्या त्रुटी दाखविण्याचे काम करीत राहते. संसदीय लोकशाहीतील तो एक अपरिहार्य भाग असतो. काही धोरणे चुकली तर टीका होते, एखाद्या मंत्र्याने भ्रष्टाचार केला तर त्यावरदेखील टीका होते, जनहिताची कामे रखडली की, त्यावर टीका होते. चारित्र्यभ्रष्ट जर एखादा नेता झाला तर तोदेखील टीकेचे लक्ष्य होतो. या गोष्टी तशा सामान्य आहेत. प्रत्येक सरकारात कमी-अधिक प्रमाणात या गोष्टी होत असतात. धोरणे आखताना चुका होतात, काही वेळा चुकीचे सल्ले ऐकले जातात, तसेच मनुष्य म्हणून ज्या कमतरता आहेत, त्या कमतरता कधी कधी चारित्र्याच्या व्यवहारातून प्रकट होतात. अशा गोष्टी जरी क्षम्य नसल्या तरी काही प्रमाणात त्या सहन केल्या जातात. राजकारण म्हटले की असेच चालायचे, म्हणून लोक स्वस्थ बसतात.
 
 
राज्यसत्ता ही काही विश्वासावर चालत असते. त्यातील पहिला भाग असतो, तो म्हणजे राज्यकर्ते नैतिकतेचे पालन करतील. ही नैतिकता राजधर्माशी निगडित आहे. राजधर्म हे सांगतो की, शासकाने प्रजापालन केले पाहिजे, प्रजेचे रक्षण केले पाहिजे. यामध्ये जर काही गडबड झाली, तर लोकांच्या विश्वासाला प्रचंड धक्के बसतात. १९९३च्या बॉम्बस्फोटाने हे धक्के त्यावेळेला जनतेला बसले. जे गुन्हेगार आहेत, बॉम्बस्फोटात या ना त्या प्रकारे सहभागी आहेत, ते राजकर्त्यांशी कोणते आणि कशा प्रकारे संबंधित होते, याचे पुरावे लोकांसमोर आले. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला जबरदस्त तडा गेला.
 
 
सामान्य जनता कितीही भोळी असली, आपल्या नेत्याच्या मागे अनेक वेळेला आंधळेपणाने जाणारी असली तरी या जनतेची म्हणून एक सद्सद्विवेकबुद्धी असते. ही सद्सद्विवेकबुद्धी कायम स्वरूपाची असते. कधी ती सुप्त असते आणि कधी ती जागृत असते. सुप्त सद्सद्विवेकबुद्धीला जागे करावे लागते. हे जागे करण्याचे काम राजकीय साठमारी करून करता येणार नाही. राजकीय विषय, राजकीय अंगाने जातात आणि समाजात ते विचारांचे गट निर्माण करतात. सद्सद्विवेकबुद्धीचा विषय हा राजकीय नाही, तो राजनीतीशास्त्राचा आहे, तो राजधर्माचा आहे. वाझे प्रकरण आणि परमवीर सिंह यांचे पत्र यामुळे अस्वस्थ होऊन रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती शासनाची मागणी केली आहे. सद्सद्विवेकबुद्धी जागी होत असल्याचा हा परिणाम आहे.
 
 
प्रश्न राष्ट्रपती राजवटीचा नाही, तर प्रश्न सुशासन आणि नैतिकशासनाचा आहे. तो राष्ट्रपती शासनाने पूर्ण होत नाही. त्याची जबाबदारी समाजाचे नैतिक नेतृत्व करणाऱ्यांचे आहे. हे नैतिक नेतृत्व म्हणजे समाजाची सज्जनशक्ती असते. सज्जनशक्तीचे वैशिष्ट्य असे की, ती विखुरलेली असते आणि अनेक वेळेला निष्क्रिय असते. या विखुरलेल्या शक्तीला संघटित करून सक्रिय करायला पाहिजे. ते करण्याचे काम समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना करावे लागते.
 
 
अशा नेत्यांनी परिवर्तनाची आता वेळ आलेली आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. समाजातील सज्जनशक्तीला साकडे घातले पाहिजे, आवाहन केले पाहिजे, तिला जागे केले पाहिजे. राजधर्म आणि राजनैतिक नैतिकता याचे पालन करणारे शासनकर्ते आणणे, हे या सज्जनशक्तीचे काम आहे. असे म्हटले जाते की, समाजात दुष्ट शक्ती प्रबळ होतात, कारण त्याचा प्रतिकार करण्यासाठी सज्जनशक्ती उभी राहत नाही. सज्जनशक्तीची निष्क्रियता दुष्ट शक्तींना बळ देते. दुष्ट शक्ती वाढत जातात, याला जबाबदार निष्क्रिय सज्जनशक्ती असते. तिला जागृत करणे, हे या वेळेचे सर्वात मोठे काम झाले पाहिजे.
 
 
समाज आता परिवर्तनासाठी आतुर झालेला आहे, अशा वेळी लोकमनाची हाक लक्षात घेऊन तिला दिशा आणि नेतृत्व केले पाहिजे. १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर हे काम गोपिनाथराव मुंडे यांनी समर्थपणे केले, हेच काम आता सक्षम नेतृत्वाने करायला पाहिजे. महाराष्ट्र ढवळून काढण्याची वेळ आता आलेली आहे. पुन्हा एकदा सांगायचे तर प्रश्न केवळ आजचे सरकार जाऊन दुसरे सरकार येण्याचा नाही. एक मुख्यमंत्री जाऊन दुसरा मुख्यमंत्री त्याजागी आणण्याचा नाही. केवळ मंत्र्यांची खाती बदलण्याचा नाही. प्रश्न आहे तो राजधर्माचे पालन करणारे शासन आणण्याचा, समाजाच्या सद्सद्विवेकबुद्धीशी प्रामाणिक राहणाऱ्या शासनाचा आहे आणि त्यासाठी सज्जनशक्तीचा प्रचंड दबाव त्यासाठी निर्माण होणे, ती जागृत होणे, आग्रही होणे अत्यावश्यक आहे.
@@AUTHORINFO_V1@@