दिल्ली - राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्रात नमूद केलेल्या तारखेला देशमुख हे कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल होते, असे पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत म्हटले. १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत देशमुख हे होम क्वारंटाईन असल्याने त्यांना कोणीही भेटणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे परमवीर यांनी पत्रात नमूद केलेल्या देशमुख-वाझेंच्या भेटीची माहिती चुकीची असल्याचे, ते म्हणाले.
शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमवीर सिंह यांनी केलेले आरोप खोडून काढले. ५ फेब्रुवारी रोजी देशमुख यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ते १५ फेब्रुवारीपर्यंत रुग्णालयात होते. त्यानंतर १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत होम क्वारंटाईन होते, अशी माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे परमवीर सिंह यांनी पत्रात नमूद केलेली देशमुख-वाझेंची भेटीची माहिती चुकीची असल्याचे पवार म्हणाले. सिंह यांनी पत्रात नमूद केलेल्या तारखेला देशमुख हे होम क्वारंटाईन असल्याने त्यांची वाझेसोबत भेट कशी होऊ शकते? असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला खंडणी वसुलीचा आरोप पवारांनी खोडून काढला आहे. तसेच मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणात वाझेची भूमिकाही आता समोर आल्याने सगळं स्पष्ट झाल्याचे, ते म्हणाले.
दरम्यान, परमवीर सिंह यांच्या पत्रावरून आज लोकसभेत खडाजंगी झाली. यावेळी शिवसेना आणि भाजप खासदार एकमेकांशी भिडले. भाजप खासदार पुनम महाजन, गिरीश बापट यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बापट यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली.