आनंदी माणसांना माहीत असतं की, आनंदाची निवड करायला लागते. आयुष्यात सुख देणारी गोष्ट प्रत्येक वेळी पूर्णत्वाकडे नेणारी असेलच असे नाही. आनंदाचा पाठपुरावा सातत्याने करायला पाहिजे आणि वेळोवेळी आनंद साजरा करत तो कायमस्वरुपी नाही, याची जाणही ठेवायला लागेल.
या महिन्यात दि. २० मार्चला ‘जागतिक आनंद दिवस’ साजरा झाला. एवढ्या मोठ्या जगात फिनलँड हा देश नेहमीप्रमाणे सगळ्यात जास्त आनंदी देश ठरला, तर १४९ देशांमध्ये भारत हा १३९व्या क्रमांकावर आला. जागतिक आनंदाची पातळी देशादेशांमध्ये कमी-जास्त असते आणि संयुक्त राष्ट्रसंघ त्यानुसार क्रमवारी जाहीर करते. अर्थात, आनंदी राहणे ही प्रत्येकाची कमीत कमी अपेक्षा आहे. प्रत्येकाला आनंदी राहायला आवडेल. त्यात आनंद नाकारावा, असा कोणी जगात नसावा.
पण, हा ‘आनंद’ म्हणजे काय, हा प्रश्नच मुळात विचित्र आहे. पण, खरंच हा विचित्र प्रश्न आहे का? जरी आपण अव्यक्त राहिलो तरी आपल्यासाठी आनंद म्हणजे नक्की काय, याचा विचार सर्वसाधारणपणे कुणी करत नाही. प्रत्येकाला आनंद, संतोष वा सुख-समाधान याबद्दल काहीतरी खास वाटत असतं, वेगळं वाटत असतं. आपलं स्वत:च प्रशस्त घर असतं तर मी आनंदी असेन. मला आवडणारा जीवनसाथी मिळाला तर मी समाधानी असेन. मला योग्य नोकरी मिळाली तर मी आनंदी असेन. माझी मुलं मार्गाला लागली तर मला संतोष वाटेल. अशी भली मोठी यादीच असते. त्यातील क्रमवारी बदलत जाते. पुढे-मागे आपण या सूचीनुसार खूप कष्ट करतो, अगदी गाढवासारखे राब राब राबतो. अशा पद्धतीने आपण डोंगर चढतो. त्याच्या टोकाला पोहोचतोही. तिथे पोहोचल्यावर आनंद मिळाला नाही. डोंगराच्या टोकावर गेल्यावर हे लक्षात आलं की, आपण आणखी दु:खी होतो. आनंद तर कुठेतरी परग्रहावर राहिला. आपल्या पदरी मात्र दु:खाचा डोंगर आला. अशावेळी कदाचित बर्याच जणांच्या मनाला हे पटणार नाही की, आपल्याला आनंद म्हणजे काय, याची पुसटशीसुद्धा जाणीव नाही.
तर मग जाणून घेऊया की, आनंद म्हणजे नक्की काय? आनंद जो तुमचा, माझा आणि सगळ्यांचाच आहे, तो म्हणजे भावनेची अनुभूती. आनंद ही राग, चीड, संताप, पश्चाताप यासारखी भावनिक अनुभूती आहे. किंबहुना, ती भावनाच आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला ‘आनंद’ या भावनेची औपचारिक व्याख्या जाणून घ्यायची तेवढी गरज वाटणार नाही. आपल्याला सुख जाणवतं, संतोष कळतो. जेव्हा जेव्हा मनात समाधान, कृतज्ञता, प्रसन्नता जाणवते, तेव्हा आपल्याला कळतं की, आपण आनंदी झालेलो आहोत. या सगळ्या सकारात्मक आणि सुखदायी भावनांच्या हिंदोळ्यात बसून आपल्या आयुष्याला कुठेतरी आपल्याला हवा असलेला अर्थ प्राप्त झाला आहे. त्याच्यात भलेपण, बरेपण आलेले आहे. बर्याच आनंदी असणार्या लोकांना हे माहीत नाही की ‘आनंद’ ही एक स्थिती आहे. आनंद हे एखाद्याचे स्वभाववैशिष्ट्य नाही. थोडक्यात, आनंद ही अनंतकाळ स्थिरावणारी व कायमस्वरुपी अशी भावना नाही, तर बदलती आणि क्षणभंगुर अशी भावनिक दशा आहे. सर्वसामान्य माणसांसाठी आनंद म्हणजे संवेदना, जाणीव वा मनोवृत्ती आहे, जी इतरांनाही समजू शकते, दिसू शकते वा कळू शकते. अर्थात, आनंदाची व्याख्या आजही तशी आव्हानात्मक आहे, पण त्याच्या वैयक्तिक अनुभूतीबद्दल फार वाद नसावा.
सकारात्मक मानसशास्त्रात आनंद हा आपल्या आयुष्यात लोकांच्या स्वत: बघण्याचा एक समाधानी व कल्याणकारी अनुभव (Subjective well-being) मानला जातो. एक आनंदी उपभोग आहे. ज्या लोकांना आनंद शोधायचा असतो, ते आपल्या अवतिभोवतीच्या जगात शोधायला लागतात, पण एखाद्याने पूर्ण जग बळकावले तरी त्याला त्याचा आनंद मिळेल, याची ग्वाही देता येत नाही. शिवाय आनंद मिळवायच्या नवनवीन कामना निर्माण होतात.
अर्थात, आपल्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींतून आपल्याला आनंदाने जगता यायला हवे. आपल्याला ‘प्रमोशन’ मिळाले, तर आपण साजरे केले पाहिजे. पण, आपण ही जाणीवसुद्धा ठेवली पाहिजे की, या अल्पावधीच्या आनंदातून आपला दीर्घकालीन किंवा टिकाऊ आनंद लाभणार नाही. आनंदी माणसांना माहीत असतं की, आनंदाची निवड करायला लागते. आयुष्यात सुख देणारी गोष्ट प्रत्येक वेळी पूर्णत्वाकडे नेणारी असेलच असे नाही. आनंदाचा पाठपुरावा सातत्याने करायला पाहिजे आणि वेळोवेळी आनंद साजरा करत तो कायमस्वरुपी नाही, याची जाणही ठेवायला लागेल. काहीतरी चांगल मिळालं वा नवीन मिळालं की, त्या प्रसंगाशी आनंद जोडला जातो, ही माणसाची प्रवृत्ती जितकी दुर्दैवी आहे, तितकीच ती अपरिपक्व आहे. (क्रमश:)
- डॉ. शुभांगी पारकर