तुमची जबाबदारी!

21 Mar 2021 21:02:55

Aditya Thackeray_1 &
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी!’ काय चुकलं माझं? किंबहुना, काय चूक झाली माझ्याकडून? साहजिकच नव्हती चूक, पण तरीही किंबहुना माझ्याच घरात कोरोना यावा? आम्ही खबरदारी घेत होतो. मास्क लावत होतो. कोमट पाणीही पित होतो. अगदी ‘आग लगे चाहे बस्ती मैं’ असे जरी झाले तरी आम्ही घराबाहेर पडलो नाही. पण, मग तरीही कोरोनाने आमच्या घरात प्रवेश केला? मी कोरोनाला मागे धमकी दिली होती. त्याचा बदला त्याने असा घ्यावा? काल-परवाच तर ते तात्याराव म्हणाले की, “मला सगळ्यांपेक्षा कोरोनाबाबत जास्त ज्ञान आहे.” आमचे ‘दूरदृष्टीवाले’ही म्हणाले होते की, ‘डब्ल्यूएचओ’पेक्षाही मला जास्त ज्ञान आहे. किंबहुना, त्यात काही खोटे नव्हते. मला होतेच, नव्हे नव्हे आहेच ज्ञान. त्यामुळेच माझ्यावर जळून केंद्र सरकारने कोरोना घरात पाठवला. पण, हा महाराष्ट्र कधी थांबला नाही, थांबणार नाही. काय म्हणता, ‘कोरोना नंबर वन’च्या बाबतीत थांबणार नाही? तुम्ही देशद्रोही आहात, औरंग्याचे हेर आहात. माझ्या सत्तेची बदनामी करता? महाराष्ट्रद्रोही कुठले? इथे वेळ काय काळ काय? आम्ही कुठे कुठे पाहावे? पण, हा प्रश्न मला का पडावा? मी तर आधीच ठरवले, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी.’ तरीही तो आलाच घरात! काल-परवाच मी कोरोनाची लस घेतली, पण त्याचे कौतुक कुणालाच नाही. चर्चा लस घेतल्याची करावी ना? पण नाही! त्यांच्या ‘आयटी सेल’वाल्यांनी चर्चा केली दुसरीच! साहजिकच मुद्दा असा की, कोरोना घरात शिरलाय. आम्ही अशा या कातरवेळी ‘क्वारंटाईन’ होत आहोत. बाहेर काय चाललेय, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. मी आधीच सांगितले की, कोरोना वाढला तर जबाबदार तुम्हीच. आता माझ्या घरातही आलाय, तर त्याला जबाबदार कोण असं विचारू नका. कारण, माझे व्यवहार हीसुद्धा तुमची जबाबदारी. इतक्या सगळ्या जबाबदार्‍या तुम्हाला दिल्या आहेत. अजून काय हवे महाराष्ट्राला? काय म्हणता, महाराष्ट्रात अनागोंदी चालू आहे? हे बघा, हीसुद्धा तुमची जबाबदारी. कारण, ‘माझे सरकार तुमची जबाबदारी’ आहे. मी केवळ बाबांना वचन दिलेला मुलगा आहे. त्या वचनाच्या परिणामाची जबाबदारी माझी नाही, किंबहुना नाहीच. ती जबाबदारी तुमची आहे!

आम्ही सदाबहार भ्रष्टाचारी!

मला तरी सांगायचे त्यांनी, मी शिकवले असते की, १०० कोटी कसे तयार करायचे! मी दहा एकरांमध्ये वांगी पिकवून १०० कोटी असे हातोहात काढले. यांना एक काम धड जमत नाही. आता सगळ्यांसाठी मी कोर्स सुरू करणार आहे, ‘वांगी लावा १०० कोटी उगवा!’ जाऊ दे कुठून मी म्हटले की, ‘अकेला फडणवीस क्या करेगा? आता त्या एकट्याने आम्हाला सगळ्यांनाच कामाला लावले. त्याला कुठून मिळत असेल हा मालमसाला? मला तर बाई संशयच येतो. घरचेच भेदी असावेत. ती ‘पहाटेची शपथ’ अजूनही डोळ्यांसमोर येते. नकोच आठवायला ती शपथ. आई शपथ्थ...
 
 
 
बरं ते तर ते, पण नानाला तरी काही वाटावं? भर अधिवेशनात त्याला म्हणाले की, ‘खुशाल तपास करा.’ जसे काही त्याला समर्थनच देत होते. सगळे माझ्या बाबांचा हेवा करतात. नाना पण त्याच पक्षाचा. ज्या पक्षाला बाबांनी सोडून आमचा इतका मोठा पक्ष तयार केला. ‘माझ्या बापाचा पक्ष आहे’ असे मी नेहमी म्हणते ते उगाच नाही. आता बाबा काय करतील? त्यांना काय बरोबर समजतं कधी काय करायचे? उगाच नाही नरेंद्र मोदी माझ्या बाबांना ‘गुरू’ म्हणाले. ‘आधारवड’च आहेत ते. लोक उगाच त्यांना ‘अधाशीवड’ बोलतात. आमच्या शेतीतच आम्ही कोट्यवधी कमवतो. आमचे साखर कारखानेही आहेत. काय कमी आहे आम्हाला? आता बाकीच्या मंत्र्यांना ‘सेट’ करायचे असते. पदाधिकार्‍यांना पोटापाण्याला लावायचे असते. त्यासाठी करावे लागते ‘काहीबाही.’ ते ‘काहीबाही’ करण्याआधी आपला खिसा रिकामा असेल, तर कसे चालेल? आम्ही काही लपूनछपून करत नाही बरं का? आमच्या काँग्रेसच्या यशोमती ठाकूर म्हणाल्याच होत्या की, ‘आता सरकार आलं, आता लुटा.’ आम्ही छगनकाका, अशोकदादा चव्हाण यांना सत्ते घेतलं, तेव्हाच महाराष्ट्राला ‘ग्रीन सिग्नल’ दिला होता. माझ्या बाबांचे ठाण्याचे मानसपुत्रही आहेतच की सोबतीला! आमचा इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्रही जनतेला माहिती आहे. छगनकाका मंत्री आहेत. धनुभाऊ मंत्री आहेत. ‘बडे बडे शहरोंमें छोटी-छोटी बाते होती रहती हैं’ हेसुद्धा आमच्या मंत्र्यांचेचे सुवचन होते. आता नाव घेतले म्हणून काय झाले? तेलगीला विसरलात का तुम्ही? काहीही म्हणा, आम्हाला काही परक पडत नाही. आम्ही कोण म्हणून काय विचारता? आम्ही सदाबहार भ्रष्टाचारी आहोत!
Powered By Sangraha 9.0