‘अच्युतानंद सरस्वती’ उर्फ पूर्वाश्रमीचे डॉ. वेणीमाधव उपासनी

21 Mar 2021 18:57:23

Achutananda Saraswati_1&n
 
 
 
ज्येष्ठ शल्यविशारद आणि डोंबिवलीतील अनेक सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ डॉ. वेणीमाधव श्रीराम उपासनी तथा ‘अच्युतानंद सरस्वती’ यांचे वयाच्या ८५व्या वर्षी गुरुवार, दि. १८ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी।’ या वचनानुसार ‘मदनमहाराज’ या मूळ पुरुषापासून साधुसंताची परंपरा ज्या वंशात होती, त्या भगवतभक्त घराण्यात डॉ. वेणीमाधव उपासनी यांचा जन्म ९ ऑक्टोबर, १९३५ रोजी झाला. त्यांचे आजोबा जे गृहस्थाश्रमी होते, ज्यांनी श्रीगुरू आज्ञेने सव्वालक्ष ब्राह्मण भोजनाचा संकल्प केला. तो १८ वर्षांत पूर्ण करून संन्यासाश्रम स्वीकारून ‘स्वामी नित्यानंद महाराज’ नाम धारण केले. यथावकाश संजीवन समाधी घेतली. याच भगवतभक्ती, वैदिक कर्माचरणाचे संस्कार, ज्ञानदानाचे पवित्र कार्य याच संस्कारांवर डॉ. वेणीमाधव यांचा पिंड पोसला होता. लौकिकात वैद्यकीय पदवी मिळवून रुग्णसेवा चालू असतानासुद्धा ज्ञानार्जन करून नामांकित शल्यविशारद म्हणून ते प्रख्यात झाले. रुग्णसेवा ईशभावाने केली. परिणामी, शुद्ध कर्माचे फळ म्हणून चित्तशुद्धी त्यांतून भगवद्गीता, ज्ञानेश्वरी श्रीमत्भागवत, रामायण, नाथांचे वाङ्मय यांचे अध्ययन सुरू झाले. डॉक्टर प्रारंभीच्या काळात आयुर्वेद शाखेतून उत्तीर्ण झाले. वैशिष्ट्य असे की, गृहस्थाश्रम आणि दवाखाना हे करत असताना ते ‘एमबीबीएस’ही झाले. प्रापंचिक जबाबदारीत हे शिक्षण म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. ते त्यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडून यशस्वी कमान त्यांनी चढतीच ठेवली. १९६५-६८च्या सुमारास ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना रूढ होती. त्यांच्या सर्वच रुग्णांचे ते कुटुंबीयच झाले. हळूहळू दवाखान्याबरोबर इंदिरा हॉस्पिटलचे कार्यक्षेत्र विस्तारले गेले. त्यांनी केलेली निदाने, उपचार आजही कानावर येतात. एकीकडे प्रापंचिक गृहस्थाश्रमातली जबाबदारी पार पाडत असताना त्यांचे लौकिक-पारलौकिक ज्ञानार्जन सुरुच होते. तरीही अंतरी ओढ होती, ती परमात्म्यप्राप्तीची, तसेच आजोबांचा संन्यास अंतरी बिंबला होता. येथेच चतुर्थ आश्रमाची बीजं अंतरी रुजली असावी.
 
वैद्यकीय सेवेत अत्यंत व्यस्त जीवन ते जगले. तरीही समाजाचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. याच ओढीने उपासनी यांनी प्रथमतः शिक्षण क्षेत्रात कार्य सुरू झाले. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून कार्य हाती घेतले. ज्यात ‘सिस्टर निवेदिता इंग्लिश स्कूल’चे व्यवस्थापन पाहता पाहता अध्यक्षपदाची जबाबदारीही अनेक वर्षे समर्थपणे पेलली. पेंढारकर महाविद्यालयाच्या प्रारंभीपासून ते महाविद्यालय बाळसे धरेपर्यंत सचिवपदाची जबाबदारी पूर्ण केली. ‘सिस्टर निवेदिता’ शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक, वर्ग यांच्यात ते इतके एकरूप झाले की, शाळा हेच त्यांचे घर झाले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या राहत्या इमारतीतच त्यांनी शाळेला जागा दिली. २० वर्षे जवळजवळ तेथेच शाळेचे वर्ग भरत होते. याच काळात ‘एमआयडीसी’ परिसरात शाळेच्या इमारतीच्या बांधकामापासून ते अध्यक्षपद ही सर्व कामे त्यांनी मनापासून ज्ञानदानाच्या ओढीनेच केली. याच विद्यार्थ्यांना पेंढारकर महाविद्यालयात काही प्रमाणात प्रवेश मिळावा, यासाठीही डॉ. झटले.
कर्तव्यकर्मठ होऊन केलेली वैद्यकीय सेवा तसेच समाजसेवा या दोन्ही क्षेत्रांत डॉक्टरांचे नाव, कीर्ती वाढू लागली.
 
 
 
अध्यात्मग्रंथांचे अध्ययन जसे वाढू लागले, तसे ‘तैसे ज्ञाने तृप्त व्हावे। ते ज्ञान जनांसी वाटावे॥’ ही प्रक्रिया सहज घडली. ज्ञानेश्वरी-गीता या विषयांवर प्रवचन सेवा सुरू झाली. ज्ञानतृष्णेने काही भक्तमंडळी जमू लागली त्यांना नामसाधना सांगता सांगता डॉ. श्रीगुरूपदावर आरुढले. अनेक भक्त-साधक विसावण्यास निष्ठेने आले. याचवेळी अखिल भारतीय कीर्तनकुलाची स्थापना झाली, ती करवीरच्या शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली. यात उपकुलप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. यानंतर कीर्तनकुलाचा कार्यविस्तार हा त्यांचा श्वास झाला. यातून कीर्तन महोत्सवाचे आयोजन कीर्तन महाविद्यालय, पाठशाळा यामार्फत प्रबोधन कार्य सुरू झाले. यालाच संवादी असणाऱ्या शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मणसभा, डोंबिवली येथे विश्वस्त, तर श्रीगणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष, तसेच श्रीव्यंकटेश तिरुपती बालाजी मंदिर, डोंबिवलीचे अध्यक्ष यांसारख्या अनेक संस्थांची सन्माननीय पदे त्यांनी भूषविली आहेत. सन २००२ मध्ये डोंबिवलीत प्रथमच ‘जागतिक कीर्तन महोत्सव’ आयोजनाची पूर्णत: जबाबदारी स्वीकारून तो राम शेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे संपन्न करण्यात उपासनी यांचा सिंहाचा वाटा होता.
 
या सामाजिक कार्यासह त्यांनी ‘श्रीमत्भागवत सप्ताह’ गावोगावी तसेच देशविदेशातही केले. ‘श्रीरामकथा सप्ताह’ हे मराठी तसेच हिंदीत संगीतासह संपन्न केले. यातून मिळालेल्या दक्षिणेतून ‘भागवत कथाकार’ लेखक यांच्यासाठी ‘मैत्रेयी’ आणि ‘विदुर पुरस्कार’ प्रदान करून नवा दंडक समाजात घालून दिला. वाणी अत्यंत मधुर, नम्रवृत्ती यांनी ते अनेक भक्तांच्या अंतरी स्थिरावले. वाशिंद जवळ पाली नावाचे खेडे आहे, जेथे त्यांनी श्रीराम मंदिर बांधले. आजही त्या संपूर्ण खेड्यात प्रत्येक घरात श्रीसद्गुरू म्हणून ते दिवाणखान्यात विराजमान आहेत. ‘प्रवचन-सप्ताह या माध्यमातून येणारी दक्षिणा ही समाजातील भक्तांकडून आलेली आहे, ती समाजालाच परत गेली पाहिजे,’ याच भूमिकेतून ‘मैत्रेयी’ आणि ‘विदुर पुरस्कार’ होता. या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मैत्रेयी पुरस्कार’ श्रीमत् भागवताचार्य यांना, तर ‘विदुर पुरस्कार’ आध्यात्मिक ग्रंथलेखनासाठी होता. याचे विशेष म्हणजे, तो गुरुशिष्य जोडीलाच दिला जातो. असे गुरुशिष्य हुडकणे हेच दिव्यकर्म होते. यात प्रामुख्याने नाव घ्यायचे झाले, तर प. पू. स्वामी स्वरुपानंद सरस्वती आणि त्यांच्या सत्शिष्या स्वामिनी प. पू. स्थितप्रज्ञानंदा सरस्वती हे होते. या पुरस्कार प्रदानानंतरच यांनी प. पू. स्वामीजींकडून संन्यासदीक्षा घेतली. प्रवचने, रामकथा, कृष्णकथा या सेवेतच २००३ साली फुलगावचे प. पू. स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्याकडून त्यांनी चतुर्थ आश्रम स्वीकारला. त्यानंतर ‘अच्युतानंद सरस्वती’ असे त्यांचे नामाभिमान झाले. प. पू. स्वामींच्या चरणी ते स्थिरावले. यानंतर मात्र त्यांनी केवळ वाक्यज्ञ नाही, तर लेखनआरंभाला सरस्वतीची कृपा झाली. मुखातून ओवी सहज उमटू लागली. गीतेवर त्यांनी संपूर्ण स्वतंत्र भाष्य ओवीबद्ध केले आहे. या अप्रतिम ग्रंथाची निर्मिती झाली. त्याचबरोबर त्यांच्या भक्तांसाठी ‘उपासना कशी आणि का करायची,’ याची निर्मिती केली. त्यांच्या भक्तांना नामसाधना, तत्त्वचिंतन याचे पुरेपूर मार्गदर्शन यात केले आहे. या सर्वांपेक्षा बृहद्ग्रंथनिर्मिती त्यांच्याकडून पांडुरंगाने करवून घेतली. तशी धारणा होती. ती म्हणजे संपूर्ण भागवत संस्कृतसंहिता त्यांनी मराठीत ओवीबद्ध केली. हे सारे करत असताना ‘देहदुःख ते सुख मानीत जावे’ अशी त्यांची वृत्ती अखंड आनंदी होती.
 
‘श्रेष्ठ ज्येष्ठ भागवताचार्य’ अशीच त्यांची ख्याती होती. यांची पन्नासावी भागवत कथा जोंधळे हायस्कूलच्या मोकळ्या मैदानावर हजारो श्रोतृवर्गापुढे संपन्न झाली. या सात दिवसांत सात संतांची ‘तुला’ केली गेली. ज्यात अनुराधा पौडवाल यांची कुंकमतुला, प. पू. डॉ. देशमुख यांची शर्करातुला, हभप विष्णुबुवा शुक्ल यांची तांदूळतुला अशा विविधतेने हा सोहळा संपन्न झाला. याचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतःची पदरमोड करून केलेला हा भव्यदिव्य सोहळा डोंबिवलीकरांनी पाहिला. अनेक रुग्ण, अनेक विद्यार्थी यांना सढळ हस्ते मदतीचा हात दिला, तो निष्कामपणेच. यांची ही गुणसंपदा सामान्य जनांना आत्मसात करण्यासारखीच आहे. मध्यंतरी त्यांची ‘बायपास’ची शस्त्रक्रिया झाली होती. त्यातून ते बरे होताच तोच बाभुळगाव येथील महास्वामी चिंदबर मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम त्यांच्या शुभहस्ते संपन्न होणार होता. कळसावर साध्या शिडीने चढणे हे अत्यंत कठीण होते. तरीही ‘हे माझे कर्तव्य’ या भूमिकेतून त्यांनी पूर्ण शिडी चढून सुवर्णकलश स्थापित केला. स्वदेहाची पर्वा त्यांनी केली नाही. देह भगवंतचरणी देणे हेच त्यांचे ध्येय होते. संन्यासाश्रम स्वीकारल्यावरसुद्धा खेड्यापाड्यात रुग्ण दिसला तर ते सेवा करत. कर्मठांना हे पटेल की नाही, याचा विचार तेथे नसे. आज हा वाचला तर उद्या भगवतचरणी येईल, हीच त्यांची प्रामाणिक आस असे; तसे ते क्वचित बोलूनही दाखवत. त्यांच्या या लौकिक तसेच पारलौकिक कार्यासाठी, समाजपुरुषांनी त्यांची दखल घेतली. कोल्हापूरचा ‘भागवतरत्न पुरस्कार’, ज्ञानेश्वर कार्यालयाचा ‘डोंबिवलीभूषण पुरस्कार’, वैद्यकीय कार्यासाठी ब्राह्मणसभेचा ‘धन्वंतरी पुरस्कार’, ब्राह्मणसभा गिरगावतर्फे ‘समाजभूषण पुरस्कार’ तसेच कीर्तनकुलातर्फे ‘समाजभूषण पुरस्कार’, याचबरोबर अनेक सत्कारांनी त्यांना पुरस्कृत केले. इतके पुरस्कार सन्मान मिळूनही ते साधेपणाने राहत. अनेक संतांच्या चरणी जात. त्यांच्या चरणी बसून चर्चा करत. तेव्हा ‘मी संन्यासी’ हा भावही नसे. देहाची उपाधी स्वीकारली की त्यागणे आलेच. वृद्धत्वाने दि. १८ मार्च, २०२१ फाल्गुन शुद्ध पंचमी दिनी ते शिवस्वरूप झाले. ‘डोंबिवलीभूषण’ अस्ताला गेला. कीर्तिरुपाने, बोधरुपाने ते आपल्यात नित्य असणारच आहेत.
 
 
मनोनिवृत्ति परमोपशान्तिः
सा तीर्थवर्या मणिकर्णिका च।
ज्ञानप्रवाहा विमलादिगङ्गा
सा काशिकाहं निन्बोधरुपा॥
 
 
 
आपले मन बाह्य विषयांपासून निवृत्त करणे, मनाला पूर्ण शांत करणे हेच श्रेष्ठतीर्थ मणिकर्णिका, तर ज्ञानरुपी प्रवाह हीच पवित्र गंगा, तर निजबोध म्हणजे स्वस्वरुपाचे ज्ञान म्हणजेच मी देहरूप काशी, हे ज्यांनी जाणले तेच ज्ञान भक्तांना उदारहस्ते वाटले. त्या परमआदरणीय अच्युतानंद सरस्वती स्वामींचे चरणी वंदन करून शब्दांना विराम देते.
 
 
- अलका मुतालिक
Powered By Sangraha 9.0