मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) केला जात होता. हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) देण्याची मागणी विरोधीपक्षाकडून वारंवार केली जात होती. एनआयए आतापर्यंत केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत होती. तर दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत होते. मात्र आता तिन्ही केसचा तपास एनआयए करणार आहे.