नितीन गडकरींची ‘इलेक्ट्रिक वाहन क्रांती’ !

19 Mar 2021 16:02:05
ngev_1  H x W:
 

इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील भारताची क्षमता गडकरींनी ओळखली आहे.
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : देशात सध्या रस्ते आणि महामार्ग क्षेत्रामध्ये क्रांतिकारी काम केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी घडवित आहेत. त्याजोडीला आता देशाला भविष्यकालीन वाहने म्हणजे इलेक्ट्रीक वाहनांमध्येही स्वयंपूर्ण बनवून देशात इलेक्ट्रिक वाहन क्रांती घडवून आणण्यासाठी गडकरी यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या कार्याचा धडाका पाहता ही क्रांती अगदीच सहजशक्य असल्याचे स्पष्ट आहे.
 
 
 
संपूर्ण जगात सध्या जिवाष्म इंधन म्हणजेच पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांच्यावर असलेले अवलंबित्व कमी करण्याचे धोरण राबविले जात आहे. त्यातही प्रामुख्याने या इंधनांवर चालणाऱ्या वाहनांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. कारण या इंधनाचे असलेले मर्यादित साठे आणि त्यांचा पर्यावरणावर होणारा घातक परिणाम यामुळे आता जग इलेक्ट्रिक वाहनांवर ‘शिफ्ट’ होताना दिसत आहे.
 
 
 
भारतातदेखील इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरांबंधी बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. मात्र, त्या चर्चेला प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन धोरण आखणे आणि त्याची अंमलबजावणी करवून घेणे यास केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी प्रारंभ केला आहे. त्याची सुरुवात त्यांनी स्वत: इलेक्ट्रिक वाहनाच्या वापराने केली आहे. प्रत्यक्ष केंद्र सरकारचा मंत्रीच जेव्हा केवळ घोषणा करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करतो, तेव्हा त्याचा मोठा संदेश हा व्यवस्थेमध्ये जात असतो. त्यामुळे भारतात येत्या काही वर्षातच इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती दृष्टीपथात आली आहे. त्यासाठी त्यांनी ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्याने ‘गो इलेक्ट्रीक’ या अभियानास प्रारंभ केला आहे. देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा प्रचार करणे आणि सर्वप्रथम केंद्रीय मंत्री, सरकारी अधिकारी यांनी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास प्रारंभ करणे या प्रमुख घटकांचा त्यात समावेश आहे.
 
 
 
 
लिथियम आयन बॅटरी उत्पादनात भारत होणार स्वयंपूर्ण
 
 
 
पारंपरिक वाहनांमध्ये ज्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल किंवा नैसर्गिक वायू हा प्रमुख घटक असतो, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम आयन बॅटरी हा प्रमुख घटक असतो. कारण त्यावर ते वाहन चालते. या बॅटरी उत्पादनामध्ये सध्या तरी चिनचे प्रभुत्व आहे आणि त्याद्वारे चीन अतिशय आक्रमकपणे जागतिक इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करीत आहेत.
 
 
मात्र, भारतातदेखील लिथियम आयन बॅटरी बनविण्याची क्षमता आहे हे ओळखून गडकरी यांनी त्यासाठी त्यांनी वैकल्पिक इंधन पर्याय शोधून काढण्यासाठी नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामध्ये पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजन राघवन, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, महामार्ग खात्याचे सचिव, डिआरडीओ, इस्रो आणि सीएसआयआर आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. त्या बैठकीत देशात लिथियम आयन बॅटरीमध्ये संशोधन, विकास आणि त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे ही बॅटरी तयार करण्यासाठीचा कच्चा माल, विविध उपकरणे आणि तंत्रज्ञान भारतातच उपलब्ध आहे. त्यामुळे संपूर्णपणे स्वदेशी ‘मेड अँड मेक इन इंडिया’ बॅटरीचे उत्पादन येत्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे. यामुळे बॅटरीची किंमत कमी होऊन आपोआपच इलेक्ट्रिक वाहनेही स्वस्त होतील. त्यामुळे आगामी ५ वर्षांमध्ये लिथियम आयन बॅटरी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात भारत जगातील एक प्रमुख देश बनणार, यात कोणतीही शंका नाही.
 
 
 
 
ev_1  H x W: 0
 
 
५० हजारांऐवजी केवळ २ हजार रूपये खर्च
 
 
 
पारंपरिक इंधनावर चालणारी वाहने आणि इलेक्ट्रिक वाहने यातील प्रमुख फरक गडकरींनी अगदी सोप्या शब्दात मांडला आहे. ते म्हणतात, पेट्रोल आणि डिझेल वाहने वापरणाऱ्यांना त्यासाठी जवळपास ५० हजार रूपयांचा खर्च येतो. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करताना त्यासाठी केवळ २ हजार रूपयांची वीज लागते. त्यामुळे जनतेच्या खिशाला चाट पडत नाही आणि प्रदुषणदेखील कमी होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0