ऊर्जामंत्र्यांचा पाय खोलात, चार्टड विमान प्रकरण भोवणार!

19 Mar 2021 17:27:33

nitin raut_1  H



नितीन राऊत यांच्याविरुद्धच्या तक्रारीची केंद्रीय कंपनी मंत्रालयाकडून दखल

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बेकायदेशीर पद्धतीने वीज कंपन्यांच्या खर्चाने खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवासाची माहिती केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने मागवली आहे. राज्यातील चारही वीज कंपन्यांकडून ही माहिती मागवली गेली आहे.



त्यामुळे आता राऊत यांच्या विमान प्रवासावरील खर्चाची राज्य वीज नियामक आयोगानेही चौकशी करावी, अशी मागणी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. पाठक यांनी सांगितले की, लॉकडाऊन काळात राऊत यांनी वीज कंपन्यांच्या खर्चाने दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, मुंबई येथे केलेल्या विमान प्रवासाबाबत केंद्रीय कंपनी मंत्रालयाकडे तक्रार केली होती.



या संदर्भात वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने चारही वीज कंपन्यांकडून राऊत यांच्या विमान प्रवासाच्या खर्चाचा तपशील मागविला आहे. यामुळे राऊत यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. वीज कंपन्यांचा महसूल आणि त्यांचा खर्च याबाबतीत निर्देश देण्याचा अधिकार असलेल्या राज्य वीज नियामक आयोगानेही राऊत यांच्या बेकायदेशीर खर्चाची चौकशी करावी, अशी मागणीही पाठक यांनी केली.




Powered By Sangraha 9.0