मुंबई : एप्रिल महिना जवळ येताच क्रीडा क्षेत्रामध्ये आता आयपीएलचे वेध लागले आहेत. मात्र, कोरोनाचा राक्षस वरती पुन्हा डोके काढत असताना आयपीएलचे नियोजन आणि स्थानिक क्रिकेट स्पर्धा यांच्यावर काही निर्बंध घातले गेले आहेत. कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने बीसीसीआयने सर्वच वयोगटातील देशांतर्गत स्पर्धांना काहीकाळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सर्व राज्यांच्या संघटनांना लिहिलेल्या पत्रात सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली असून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्याच्या निर्णयाचीही माहिती दिली. "देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा २०२०-२१ जागतिक महासाथीच्या पार्श्वभूमीवर उशिराने सुरू झाल्या. महासाथीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला देशांतर्गत स्पर्धा सुरू करण्यासाठी जानेवारी २०२१ पर्यंतची वाट पाहावी लागली." असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
"सध्या या क्रिकेट स्पर्धा खेळवण्यासाठी काही राज्यांमधील परिस्थिती अनुकूल नाही. तसेच, येत्या काळात देशात दहावी आणि बारावीच्या परीक्षाही पार पडणार आहे. अशा परिस्थितीत आपल्या तरूण खेळाडूंना या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी करणे आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य वेळ मिळायला हवी. आपल्या खेळाडूंचे आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण यांना आमचे प्राधान्य आहे. आयपीएल २०२१नंतर सर्वच वयोगटातील क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करू." असे शाह यांनी पत्रात नमूद केले. आयपीएलच्या १४व्या हंगामातील सामने ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत खेळवले जाणार आहेत.