
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.त्यातच नवीन पोलीस आयुक्त कोण होतील या देखील चर्चेला उधाण आले आहे.
त्यात पोलीस आयुक्त बदलले जाणार म्हणून ,पोलीस खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावायला देखील सुरुवात केली आहे. सोमवारपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेक पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेत आहेत. मात्र ज्येष्ठतेनुसार जर या पदावर नियुक्ती करण्याचे ठरवल्यास मुंबई पोलीस आयुक्तपदी रजनीश सेठ यांचे नाव अधिक चर्चेत आहे, परंतू शिवसेनेच्या हक्काचा माणूस म्हणून सदानंद दाते किवा विवेक फणसाळकर यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तसेच सीआययुच्या आणखी काही अधिकाऱ्याची या प्रकरणात चौकशी सुरू आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्तांना होती का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या प्रकरणात अनेक राजकीय पुढाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. भाजपने तर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशा वेळी सरकार अधिकाऱ्याचा बळी देण्याच्या विचारात आहे, ज्यामध्ये पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीचे संकेत देण्यात येत आहेत.