स्त्रियांनी मात्र एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे; ती म्हणजे, तिने स्वतःला उन्नत्तीपासून दूर ठेवू नये. जीवनात भरारी घेताना स्वतःवर पारंपरिक सांस्कृतिक मर्यादा घालून घेऊ नये. या वर्षीचे जागतिक महिला दिनाचे घोषवाक्य फार समर्पक होते. तिने स्वतःला आव्हान द्यायला पाहिजे.
जागतिक महिला दिनाचे ‘सेलिब्रेशन’ जगभरात उत्साहात संपन्न झाले. सांस्कृतिकदृष्ट्या पुरुष आणि स्त्रिया वेगळ्या पार्श्वभूमीवर विकसित होत असतात. त्यामुळे बरेचसे गैरसमज समाजात पसरलेले होते आणि आजही आहेत. एका मानसशास्त्रज्ञाने स्त्रियांचा मेंदू हा सगळ्यात कनिष्ठ प्रमाणात विकसित झाला आहे, असे चक्क प्रसिद्ध केले होते. (१८९७) अर्थात, संशोधनातून नंतर असे दिसून आले की, स्त्रियांची बुद्धी पुरुषांपेक्षा कमी नक्कीच नाही. पण, त्यांचा मेंदू हा पुरुषांच्या मेंदूपेक्षा वेगळा आहे, हा समज आहे. शास्त्रीयदृष्ट्या म्हणायचे तर स्त्रियांच्या मेंदूचे ‘वायरिंग’ हे संवेदनशीलतेकडे आणि अंतर्ज्ञानाकडे जास्त झुकलेले आहे, तर पुरुषाचा मेंदू हा तर्कशक्ती आणि कृतीकडे वळणारा आहे. पुरुषाकडे खूप तल्लखबुद्धी आहे आणि स्त्रीकडे भावूक मन आहे. हा बौद्धिक किंवा भावूक तर्क लैंगिक भूमिकेतून किंवा पक्षपातीपणातून निर्माण झालेला दिसतो. आजकालच्या काही वर्षांमध्ये स्त्रिया जेव्हा प्रतिभाशाली दिसतात किंवा ‘टॅलेन्टेड’ असतात, तेव्हा त्यांच्यात थोडी ‘मर्दानगी जास्त आहे का,’ असा प्रश्न निर्माण होतो. अर्थात, माणसाच्या शरीरात मग ते पुरुष असो का स्त्री असो, शरीरशस्त्रानुसार हृदय आहे, यकृत आहे, जठर आहे आणि मूत्रपिंड आहे, मग यामध्ये आपल्याला लौकिकदृष्ट्या लैंगिक भेद दिसत नाही. सर्वसामान्य माणसात तो भेद तिच्या बौद्धिक आणि भावनिक वागणुकीतच दिसून येत असतो. याला शरीरशास्त्रापेक्षा वा वैद्यकीय शास्त्रापेक्षा सामाजिक आणि मानसिक गैरसमज हे कारण आहे.आज स्त्रिया आणि शास्त्र दोन्हीही पूर्वीच्या अशास्त्रीय आणि पूर्वग्रहदूषित कालापासून खूप पुढे आलेले आहे. तरीसुद्धा आपण जेव्हा स्त्रिया शास्त्रीय क्षेत्रात कमी का आहेत, याचा विचार करतो, तेव्हा वेगळ्या दृष्टीने का होईना, या जुन्या सदोष समजुतीची री पुन्हा पुन्हा ओढली जाते. ‘डीएनए’च्या रचनेचा शोध लावणार्या शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ रोझालीड फ्रॅन्कलीन यांच्या जन्माची शंभरी उलटून गेली तरीसुद्धा स्त्रियांच्या बौद्धिक क्षमतेबद्दलचे पूर्वग्रहदूषित समज आजही अस्तित्वात आहेत, ही दुर्दैवी आणि शरमेची गोष्ट आहे.
स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी लेखले जाण्याची वृत्ती ही शतकानुशतके वेगवेगळे मुखवटे घालून आली. एकोणिसाव्या शतकात पारंपरिक पुरुषवादी संस्कृती प्रचंड मागासलेली होती. स्त्रीच्या नाजूक शरीराला शास्त्रीय शिक्षण त्रासदायक होईल वा नुकसानदायक होईल, असा भोंगळ समज त्याकाळी होता. १८८६साली विलियम मूर या ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांनी तर गैरसमजुतीचा कळसच गाठला होता. त्यांनी घोषित केले की, स्त्रियांना जर उच्चशिक्षित केले, तर त्यांना ‘अॅनोरेक्सिया स्कोलॅस्टिका’ (Anorexia Scholastica) नावाचा आजार होईल, ज्यामुळे स्त्रिया अनैतिक आणि वेड्या होतील. विसाव्या शतकात स्त्रियांमध्ये आधुनिक, शास्त्रासाठी आवश्यक असलेल्या विशेष कौशल्याचा अभाव आढळला. ‘टेस्टोस्टेरॉन’ या हार्मोनमुळे पुरुषांच्या मेंदूचे म्हणे ‘हार्ड वायरिंग’ होते, जे शास्त्रीय अभ्यासात पोषक ठरते. त्यांना शेवटी हे ठामपणे मांडायचे होते की, स्त्रिया शास्त्रात भाग घेत नाहीत. कारण, त्या त्यांच्यातील कौशल्ये अभावाने घेऊ शकत नाहीत.तथापि, इतिहास बोलत असतो. इतिहासानुसार आज सबळ पुरावा आहे की, शास्त्राच्या परिघात स्त्री शास्त्रज्ञांनी अनेक क्षेत्रात पुरुषांना केव्हाच मागे टाकले आहे.
यामागे आणखी एक मजेशीर युक्तिवाद असासुद्धा आहे की, पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त काटेकोर असतात. त्यांचे पटकन समाधान होत नाही. स्त्रिया गोष्टींपेक्षा माणसांना प्राधान्य देतात म्हणून त्यांची तांत्रिक क्षमता कमी असते. अर्थात, हा युक्तिवाद तितकासा मजबूत नाही. आज पुरुष जसे ‘लॉरी’ चालवतात, तशा स्त्रियाही चालवतात. अनेक पुरुषप्रधान उद्योगात भारतातसुद्धा स्त्रियांनी साहस करून दाखविले आहे. सांस्कृतिकदृष्ट्या अगदी लहानपणीच मुलांनी काय करायचे, याचे शिक्षण घरातूनच दिले जाते. त्यानुसार पुढच्या सवयी विकसित होत जातात. त्यामुळे खरेतर दोघांनाही एक आवड वा पसंती निर्माण होते. अर्थात, हा ‘लैंगिक खंड’ (Gender Gap) व्यावसायिकदृष्ट्या कमी व्हायला हवा. आपण पुरूष ‘शेफ’ जसे पाहत आहोत, तसेच स्त्रिया कुस्तीगरही पाहत आहोत.आज ‘लैंगिक भेद’ हा स्त्री-पुरुषांच्या मेंदूमध्ये तितक्या प्रखरतेने नाही, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे तिच्या बौद्धिक क्षमतेवर कुणी शिंतोडे उडवू नयेत. तरीही स्त्रियांनी मात्र एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे; ती म्हणजे, तिने स्वतःला उन्नत्तीपासून दूर ठेवू नये. जीवनात भरारी घेताना स्वतःवर पारंपरिक सांस्कृतिक मर्यादा घालून घेऊ नये. या वर्षीचे जागतिक महिला दिनाचे घोषवाक्य फार समर्पक होते. तिने स्वतःला आव्हान द्यायला पाहिजे. ‘चूझ टू चॅलेंज!’ अर्थात, आव्हान स्वीकारा!
-डॉ. शुभांगी पारकर