सांगली : कुस्तीचे मैदान गाजवल्यानंतर तबाल चारवेळा सांगली विधानसभा मतदारसंघ गाजवणारे 'बिजलीमल्ल' म्हणून प्रसिद्धी मिळवणारे संभाजी पवार यांचे निधन झाले. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी सांगली येथील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. संभाजी पवार यांनी २००९मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे आत्ताचे पंतप्रधान आणि तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले होते. सर्वसामन्यांचा नेता हरपल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी पवार यांना आदरांजली वाहताना म्हंटले आहे की, "कुस्ती असो किंवा राजकारणाचे मैदान, दोन्ही क्षेत्रात अतिशय तडफदार कामगिरी बजावणारे सांगलीचे माजी आमदार बिजलीमल्ल संभाजीराव (आप्पा) पवार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर त्यांच्या कुस्तीचे चाहते अनेक राज्यात होते. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते हिरीरीने पुढाकार घेत. जवळजवळ चार वेळा ते विधानसभेवर निवडून आले आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे कुटुंबीय, आप्तपरिवार यांच्या दुःखात सहभागी आहोत."
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीदेखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे, त्यांनी ट्विट केले आहे की, "सांगलीचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते, पैलवान संभाजी पवार यांच्या निधनाची बातमी समजली. बिजलीमल्ल म्हणून ओळख असणाऱ्या आप्पांनी सांगली जिल्ह्यात भाजप रुजविण्यात मोलाची भूमिका निभावली. त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली !" असे त्यांनी म्हंटले आहे.
'बिजलीमल्ल' माजी आमदार संभाजी पवार यांची थोडक्यात माहिती
मल्ल नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ओळख होती. विधेश म्हणजे एकाहून एक सरस कुस्त्या तेजीने आणि चपळतेने क्षणार्धात निकाली लावण्याची त्यांची खासियत होती. यामुळेच त्यांना 'बिजलीमल्ल' म्हणून ओळख मिळाली होती. पुढे स्व. वसंतरावदादा पाटील यांच्या यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णु अण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव केला. शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभा दणाणून सोडणाऱ्या संभाजी पवार यांना जनता दलाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती. त्यानंतर २००९मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. २०१४मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली.