भारतीय राष्ट्रवादाचे जनक: विष्णुशास्त्री चिपळूणकर

13 Mar 2021 21:59:55

Vishnushastri Chiplunkar_
 
 
 
 
विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हेदेखील नामवंत लेखक. ‘निबंधमाला’ हे विष्णुशास्त्रींनी सुरु केलेले मासिक सात वर्षे अखंड चालले. इंग्रजी, संस्कृत व मराठी भाषेबरोबरच, इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. १८७८ साली त्यांनी ‘काव्येतिहास संग्रह’ हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळेच्या स्थापनेतही पुढाकार घेतला. १८७५ साली ‘किताबखाना’ नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. भावी पिढीला ‘राष्ट्रीय शिक्षण’ देण्याच्या हेतूने १८८० साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापनाही केली. अशा या विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या दि. १७ मार्च रोजीच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या राष्ट्रवादी विचारांचा घेतलेला हा आढावा...
 
 
जन्म २० मे, १८५० आणि मृत्यू १७ मार्च, १८८२. अवघे ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेला हा महापुरुष! किती प्रचंड काम त्यांनी केले! ज्यावेळी भारतामध्ये अशी धारणा होती की, हिंदूंचा धर्म, संस्कृती, भाषा, साहित्य, इतिहास, स्थापत्त्य इथली माणसे, त्यांचे वेद, पुराणे, नीतिशास्त्र त्यांच्या श्रुती आणि स्मृती असे सारे काही बुरसटलेले, त्याज्य... इंग्रज आले आणि सारे बदलले. इंग्रजी राज्य, इंग्रजांचे आगमन होणे हे ईश्वरी वरदान मानणाऱ्या पिढ्यांची बोलती बंद करवून त्यांना शास्त्रीबुवांनी सांगितले की, "आमच्याकडे शिवाजी, बाजीराव, माधवराव यशवंतराव होळकर, रणजितसिंग, तात्या टोपे यांच्यासारखे तलवारबहाद्दर निपजले. बाळाजी विश्वनाथ, नाना फडणीस, सखाराम बापू, महादजी शिंदे, नानासाहेबयांसारखे मुत्सद्दी पैदा झाले, तो देश कॅप्टन क्लाईव्ह, वॉरन हेस्टिंग्ज मालकम एलफिन्स्टन यांसारख्यांना हार जाणारा अशी सामान्य गोष्ट नव्हती.पण, विचित्र कालगतीमुळे हे घडले हे खरे आहे, पण गोष्ट अशी आहे की, अज्ञान युगाचा पराभव हा ज्ञानाच्या जोरावर सर्वत्रच होत होता. नवे शास्त्रं, नवे शस्त्रं या समोर आमची मंडळी टिकू शकली नाहीत, असे म्हणावे तर मुद्रणकला चीनमधून युरोपात जाईस्तोपर्यंत तिथे स्थिती अशीच नव्हती का? नव्या ज्ञानाची चाहुल हा प्रगतीचा, बदलाचा दिवा असतो. तेव्हा ज्ञानसंपन्न लोकांस बनविणे हा एकमेव मार्ग समाजधुरिणांनी स्वीकारला पाहिजे - लोकांना शहाणे करून सोडणे हा एकमेव मार्ग!" शास्त्रीबुवांनी 24व्या वर्षी ‘निबंधमाला’ हा त्यांचा अक्षरयज्ञ सुरू केला आणि साडेसात वर्षे हा प्रकल्प राबविला. त्यांचे अनेक निबंध गाजले. ‘रिपोर्टर ऑन दी नेटिव्ह प्रेस’कडून त्यांच्या लेखांची भाषांतरे करून ती व्हॉईसरॉयपर्यंत पाठविली जात होती.
 
 
‘इतिहास’, ‘आमच्या देशाची स्थिती व कर्तृत्व’, ‘देशोन्नती’, ‘लोकहितवादी’ या लेखांनी, तर इतिहास घडविला. याशिवाय त्यांनी ‘मराठी भाषेची सांप्रतची स्थिती’सारखा साहित्याशी निगडित असा विषय घेऊन, "भाषा हे राष्ट्राच्या उत्कर्षाचे मोठेच साधन आहे. आमची माय मराठी ही भिकार भाषा नाही. दिल्ली अटकेपर्यंतच भगवा झेंडा फडकविलेले आम्ही लोक आहोत. तुकाराम-रामदास यांसारख्या भगवतपारायण साधून आपल्या श्रुतीसही वंद्य वाटतील," अशा अर्थी आपल्याला काव्यात ग्रंथित केलेले आहेत. "मुक्तेश्वर, वामन पंडित मोरोपंत इत्यादी रसाळ कविश्रेष्ठींनी आमच्या मराठी संस्कृतीसारखीच प्रौढी आणलेली आहे. आवेश, विचार, सरसता या सर्व गोष्टींसाठी आमच्या भाषेत अन्य भाषेकडे बघावयाची गरज नाही," असे सांगून मराठीचा खणखणीत गौरव १८७४ सालीच त्यांनी केला होता.
 
 
‘इतिहास’ या निबंधाने तर प्रचंड खळबळ इंग्रजी वर्तुळात उडाली. शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते मुंबईच्या राज्यपालाला चटका बसेल असे ते लिखाण होते. त्याचे कारणच हे होते की, ‘आसेतु हिमालयापर्यंत’ पसरलेल्या इंग्रजी साम्राज्यावर आव्हान देणारे असे लिखाण भारतातल्या कोणत्याही भाषेत तोपर्यंत झालेले नव्हते. पराधीन झालेल्या भारतीयांना प्रेरक वाटेल, असा तो तर्क होता. चिपळूणकरांनी लिहिले होते की, "हिंदूंचे मन, परंपरा ही निवृत्तिमार्गीय आहे. त्यामुळे साद्यन्त असे इतिहासलेखन आपल्याकडे झालेले नाही, पण हिंदू त्याबाबतीत अगदीच अनभिज्ञ आहेत, असे नाही. काश्मिरी पंडितांनी ‘राजतरंगिणी’ नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यात अकबर बादशहाच्या कितीतरी आधीच्या शतकांचा इतिहास त्यांनी ग्रंथबद्ध केलेला आहे." पानिपतच्या लढाईची बखर महाराष्ट्रीयन असूनही फारसी भाषेत लिहिणाऱ्या काशिराज पंडिताचाही त्यांनी गौरव केलेला आहे. पण, त्यांनी हेही मान्य केले की, ग्रीक, रोमन किंवा चिनी लोकांप्रमाणे आपण हिंदू लोकांनी सविस्तर इतिहासलेखन केलेले नाही.
 
 
निबंधाच्या पुढच्या भागात स्वराज्याचा अंत, इंग्रजांचे आगमन याविषयी दुःख आणि खेद व्यक्त करून इंग्रजी इतिहासकारांवर टीकेचे आसूड त्यांनी ओढले. देशाची स्थिती, माणसांची, भाषेशी नीट ओळख नाही, तरीसुद्धा इंग्लंडमध्ये राहून चिपळूणकरांनी भारताचा इतिहास लिहिणाऱ्या जेम्स मिलवर प्रखर टीका केली. मेकॉले, मॉरिस यांच्याबरोबरच इंग्रजाळलेल्या, बाटलेल्या, मोरोबा कान्होबा, बाबा पद्मनजी यांच्यावरही ते बरसले. "इंग्रज लोकांची नैसगिक अशीच अनास्था भारतीय इतिहासाविषयी असल्याकारणाने आणि त्यांचे राज्य असल्याकारणाने असा विपर्यस्त, चुकीचा अवाजवी इतिहास त्यांच्याकडून लिहिला गेला, हे खरेच! पण, आपल्या लोकांनी इतिहासाची साधने जमा करावीत आणि नवा इतिहास लिहून आपल्याच पूर्वजांची स्मृती, कीर्ती जतन करावी," असे त्यांचे म्हणणे होते. "आमच्या देशात पाणिनी, कालिदास, भास्कराचार्य, वाल्मिकी, आर्यभट्ट यांसारखी बुद्धिमान माणसे, पोरस शिवाजी, विक्रमादित्य, बाजीराव, रणजितसिंग, यशवंतराव होळकर यांसारखे तलवारबहाद्दर निर्माण झाले, तो देश इंग्रज म्हणतात तसा कमी पराक्रमी, बुद्धिहीन नाही," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला होता. मरणाच्या आधी केवळ तीन दिवस म्हणजेच दि. १४ मार्च, १८८२ला ‘केसरी’मध्ये चिपळूणकरांनी ‘देशोन्नति’ नावाचा अप्रतिम लेख लिहिला होता. चिपळूणकर मनाने, विचाराने, प्रतिगामी नसून विचारवंत, पुरोगामीच होते, असे त्या लेखात स्पष्टपणे जाणवते. त्यात ते एके ठिकाणी म्हणतात, "जातिभेदाने या राष्ट्राची फूट अतिशयितच पडलेली आहे. अठरापगड जातीस १८ टोपकरांनी गुंडाळून टाकले आणि साऱ्यांच्या हाती सारखीच करवंटी दिली, पण लोक अजून जागे होत नाहीत, त्यांचे डोळे उघडत नाहीत, जातिभेदाचा भेद त्याचा वेडगळपणाचा पीळ क्रमश: कमी कमी होत जाऊन साऱ्या जाती देशबंधुत्वाच्या थोरल्या नात्यात अंतर्भूत होऊन, एकोपा निर्मितीतच साऱ्यांचे हित आहे," असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रवादाच्या या आद्य प्रवर्तकाने केलेले होते.
 
‘किताबखाना’, ‘केसरी’, ‘मराठा’ची स्थापना ‘न्यू इंग्लिश स्कूल’ या स्वतंत्र विचारी शाळेची स्थापना, चित्रशाळेची निर्मिती या साऱ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या अल्पायुष्यात केल्या. ‘राष्ट्राभिमान’ हा त्यांच्या लेखणीचा प्राण होता. लोकमान्य टिळक, हरी नारायण आपटे, राजवाडे, इतिहासकार, खरेशास्त्री, आगरकर, वामन शिवराम आपटे ही त्यांची विचारपरंपरा होती. टिळकांच्या नंतरची तिसरी पिढी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची. ही सारी राष्ट्रवाद्यांची परंपरा, पण त्यांचे मूळ विष्णुशास्त्री चिपळूणकर हेच होते. चिपळूणकरांच्या निबंधमालेचे भाषांतर नंतर बंगाली भाषेत ‘देशेरकथा’ या नावाने झालेले होते. ते वाचून योगी अरविंद म्हणाले होते की, "या पुस्तकाच्या तोडीचे पुस्तक बंगाली भाषेत दुसरे नाही." त्यांची मरणवार्ता ऐकल्यानंतर मुंबईत असलेले न्या. रानडे म्हणाले होते की, "front organizations He had no business to die so soon."
 
 
हरी नारायण आपटे हे प्रख्यात लेखक लिहून गेले होते की,
 
"झाला झाला अहह... जनहो, घात झाला महान
नेला नेला हरुनि विधीने सर्व देशाभिमान...
भारतीय राष्ट्रवादाच्या या जनकास विनम्र अभिवादन...!-
 
- अनंत शंकर ओगले
 
 
 
Powered By Sangraha 9.0