नागरिकांनो जागरूक व्हा ! : स्मिता काळे

12 Mar 2021 19:35:46

smita kale_1  H


डोंबिवली :
मुलांवर मोठय़ा प्रमाणात अत्याचार होत असतात. ही मुले त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांमुळे न्यायालयासमोर बोलू शकत नाही. अत्याचार झालेल्या मुलींच्या बाबतीत जे कायदे आहेत. त्यात सुधारणा होण्याची गरज होती. पण त्या कायद्यात बदल झाले नाहीत. या कार्यक्रमाला आलेल्या माझ्या मैत्रिणींनी एखाद्या पालकांपर्यंत सर्व गोष्टी पोहचविल्या तर आज जे मुलींवर अन्याय होत आहे ते थोडेफार प्रमाणात रोखण्यात आपल्याला यश येईल, असे मत समाजसेविका स्मिता काळे यांनी व्यक्त केले.


डोंबिवलीतील अनाहत इव्हेंट्स पी आर आणि रोटरी सन सिटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील दहा महिलांचा सत्कार करण्यात आला. अँँड. वृंदा कुळकर्णी आणि 'गुरूकुल द डे स्कूल'च्या संस्थापिका गौरी करकरे यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून केवळ निमंत्रितासाठीच पार पडला. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रासाठी दिपाली काळे, समाजसेवा विभागासाठी स्मिता काळे, लेखन विभागासाठी सुनीता तांबे, वैद्यकीय विभागासाठी डॉ. माधुरी बैरट, संशोधन विभागासाठी गिरीजा बेहेरे, गायन विभागासाठी पल्लवी केळकर, अभिनय क्षेत्रासाठी अश्विनी मुकादम, वार्तांकन विभागासाठी सुवर्णा जोशी, व्यावसायिका विभागासाठी विदुला आमडेकर आणि विशेष उल्लेखनीय सामाजिक बांधिलकी या विभागासाठी प्रिया अशोक या महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अनाहत इव्हेंट्स पी आर संस्थेच्या संचालिका श्वेता वैद्य उपस्थित होत्या.


काळे म्हणाल्या, मी गेल्या वीस वर्षापासून एकटे राहणाऱ्या, अनाथ, रस्त्यावर राहणाऱ्या विधवांची मुले यांच्या पुर्नवसनाचे काम करीत आहे. आई आपल्या मुलांना पाळणाघरात ठेवते तेव्हा प्रत्येक पालकांनी विचार करायला हवा . मध्यमवर्गीय टीव्हीवर काही जनजागृतीचे कार्यक्रम पाहतात, जास्तीत जास्त शेजाऱ्यांशी चर्चा करतात आणि विषय सोडून देतात. किमान काही महिलांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. जेणेकरून समाजातील लोक पुढे येऊन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करतील. या गोष्टी आपल्या समाजात, घराच्या आसपास होत आहे. फक्त आपण डोळे उघडे ठेवून बघण्याची गरज आहे. मुलींवरच अत्याचार होतात असे नाही. मुलांवर ही अत्याचार होतात. एका मुलींवर झालेला अत्याचारांच्या घटनेने मी निशब्द झाले. तेव्हापासून या मुलींसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. १९९२पासून अत्याचार होणाऱ्या मुलींसाठी काम करीत आहे. मी माझ्या मुलींला देखील या मुलींसाठी काम करायचे हे सांगितले आहे. माझी मुलगी पेशाने वकील आहे. ती या मुलींसाठी काम करीत आहे. नागरिकांनो जागृरूक व्हा! एखादी आपल्या परिसरातील दररोज दिसणारी मुलगी दिसत नाही हे लक्षात आल्यावर लगेचच त्यांची माहिती द्या. तुमची ओळख सांगू नका पण माहिती द्या, असे आवाहन ही त्यांनी केले.

Powered By Sangraha 9.0