ठाणे महापालिकेच्या घोटाळेबाज ठेकेदारावर गुन्हा

12 Mar 2021 19:09:46

thane_1  H x W:



ठाणे :
ठाणे महापालिकेतील घोटाळे उघड होऊ लागल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मृत व्यक्तींच्या नावे बेकायदेशीर एनओसी घेत होर्डिंगचे मनोरे ठाण्यात उभारणाऱ्या कंत्राटदारावर नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनसेने भंडाफोड केल्यानंतर या घोटाळेबाज कंत्राटदाराविरोधात पालिका प्रशासनाने नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.मे- एवन इंटरप्रायजेस या कंपनीच्या आनंदनगर येथील परबवाडीतील होर्डींगला जाहिरात विभागाने परवानगी देताना कागदपत्रांची पडताळणी जाणीवपूर्वक योग्यरित्या केली नाही.


या अनधिकृत जागेचे मालक महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानुसार श्रीनिवास गुडाब्बा हे असताना नाहरकत प्रमाणपत्र सादर करताना रामचंद्र सदाशिव परब आणि वामन सदाशिव परब यांच्या २००३ साली निधन झालेल्या वडिलांच्या खोट्या सह्या करून मालकी दाखवली.हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बेकायदा होर्डिंग हटवण्यात आले. मात्र या प्रकरणी घोटाळेबाज ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी पाचंगे यांनी केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने याबाबत मे- एवन इंटरप्रायजेस या कंपनीच्या अफरोज खान विरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी ४२०, ४६५, ४६८ या कलमान्वये खानविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान,या घोटाळ्याला ठेकेदाराबरोबरच पालिकेतील अधिकारी व कर्मचारीही जबाबदार असुन त्यांच्यावरदेखील फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे,अशी मागणी पाचंगे यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0