सेवाव्रती ललित

11 Mar 2021 17:35:37

Lalit Seth _1  
 
 
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात हळूहळू वाढू लागला होता. अशावेळेस दळणवळणाची सर्व साधनेच बंद झाली. औषधांच्या आयात-निर्यातीतदेखील मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले. देशविदेशातील संपर्क तुटले असताना आणि समाजामध्ये महामारीमुळे अस्थिरता पसरली असताना, ‘इस्टर्न कार्गो कॅरिअर्स’चे संचालक ललित सेठ यांनी मोजक्या संसाधनांच्या उपलब्धतेत किमान सेवा देण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे, या आव्हानात्मक काळातही त्यांच्या नियोजनाला यश लाभले आणि कंपनीचा कारभार सुरु झाला. अशा या उद्यमी कर्तृत्वाची कामगिरी...
 
 
भारताचे इतर देशांशी चांगले व्यावहारिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच उद्योग आणि दळणवळणाच्या विकासात कार्गो क्षेत्राचे मोठे योगदान आहे. औषधे तसेच इतर महत्त्वाच्या वस्तूंची आयात-निर्यात करण्यासाठी कार्गो क्षेत्राचा मोठा वापर करण्यात येतो. देशामध्ये ’इस्टर्न कार्गो कॅरिअर्स इंडिया प्रा.लि’चे संचालक ललित सेठ यांनी आपली एक वेगळी ओळख आपल्या कामातून निर्माण केली. भारताबाहेर जाणार्‍या फार्मास्युटिकल्स, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या ‘लॉजिस्टिक ऑपरेशन्स’मध्ये म्हणजे रसद पुरवठा साखळीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर माल पोहोचविण्याचे कार्य ते गेल्या ३५ वर्षांपासून निरंतर करीत आहेत.
 
 
देशभरात तसेच काही आंतरराष्ट्रीय देशांमध्ये जसे की, अमेरिका, आफ्रिकन देश येथेदेखील त्यांचा माल निर्यात केला जातो. आपण जाणतोच की, हा व्यवसाय आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असतो. त्यामुळे जगभरात घडणार्‍या राजकीय, भौगोलिक घडामोडींचा मोठा प्रभाव या व्यवसायावर पडताना दिसतो. कोरोना महामारीनंतरही काही महिने हवाई वाहतूक बंद असल्याने या उद्योगाचे कसे नुकसान झाले? यातून त्यांनी कसा मार्ग काढला? ‘अनलॉक’मध्ये हा व्यवसाय पुन्हा सुरळीत होण्यासाठी काय मार्ग अवलंबले? तसेच, कंपनीशी बांधील असणार्‍या कर्मचार्‍यांबाबत काय निर्णय घेतले? याबाबत जाणून घेऊया...
 
 
मार्चमध्ये कोरोनाचा प्रसार देशातही सुरू झाला आणि संपूर्ण जग हळूहळू स्तब्ध झाले. या कोरोना विषाणूचा प्रसार जगभरामध्ये अगदी वेगाने होऊ लागला. यामुळे प्रत्येक देशाने आपले दरवाजे इतर देशातील नागरिकांसाठी बंद केले. कोरोना प्रसारामुळे मार्चनंतर काही महिने रस्ते वाहतूक, जलवाहतूक तसेच हवाई वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले. यामुळे देशांमध्ये होणारी आयात-निर्यातदेखील अंशतः थांबली होती. याचा देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायांवर मोठा परिणाम झाला. वाहतूकच बंद असल्याने अनेक कार्गो सेवांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला.
 
 
भारतातील कार्गो क्षेत्रातील असेच एक मोठे नाव म्हणजे ’इस्टर्न कार्गो कॅरिअर्स इंडिया प्रा.लि’ ललित सेठ यांच्या या कंपनीसमोरही एक मोठे आव्हान उभे ठाकले. सर्व वाहतूक सेवा बंद झाल्याने आता पुढे काय करायचे, हा प्रश्न कंपनीसमोर होता. ‘लॉकडाऊन’नंतर काही दिवस विचार केल्यानंतर भारत सरकारने जारी केलेली नियमावली पाळत यावर मार्ग काढण्याचा निर्धार ललित सेठ आणि त्यांच्या कंपनीने घेतला. आपल्या कंपनीतील कर्मचार्‍यांचे होणारे हाल पाहता, त्यांच्यासाठी ’वर्क फ्रॉम होम’च्या निर्णयाचा योग्य वापर कंपनीने करून घेतला. इतर कोणत्याही वस्तूंची आयात-निर्यात न करता, फक्त औषधांच्या आणि रुग्णालयांशी संबंधित सामग्रीची आयात-निर्यात करण्याची मुभा सरकारने कंपनीला दिली होती. त्यामुळे गरजेपुरतेच कामगारांना सोबत घेऊन त्यांनी हे काम पूर्णत्वास आणले. यामध्ये त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागला. कर्करोग व तत्सम रोगांच्या औषधांचा यामध्ये समावेश असल्यामुळे ते वेळच्यावेळी गंतव्य स्थानापर्यंत पोहोचविणे, हे खूप मोठे आव्हान त्यांनी पेलले.
 
हे आव्हान पेलताना सेठ यांनी अनेकवेळा कार्गो विमानांची उपलब्धता सांभाळत ती औषधे इप्सित स्थानापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविली. या प्रत्येक औषधाच्या तापमानाची योग्यरीत्या देखरेख करणे आवश्यक होते आणि कार्गो विमानांमध्ये तशी सोयही असते. मात्र, सामान्य विमानांमध्ये या सर्व बाबींचा विचार करून ती औषधे व्यवस्थित पोहोचविणे हे महत्त्वाचे होते. या भयंकर काळात ‘शिवधनुष्य’ पेलण्यामध्ये ललित सेठ यांना त्यांच्या कर्मचार्‍यांची चांगली साथ मिळाली. कंपनीचे कर्मचारी त्यांच्यासोबत एका सैनिकाप्रमाणे उभे होते.
 
ज्यांना शक्य होते त्यांनी ’वर्क फ्रॉम होम’ करत कंपनीच्या कामात योगदान दिले, तर काही ‘ग्राऊंड स्टाफ’ला कार्यालयातच राहण्याची सोय करून त्यांना सर्व प्रकारची मदत पोहोचविण्याची जबाबदारी कंपनीने घेतली. त्यांना पुरेल एवढ्या अन्नधान्याचा साठा पुरवला. याशिवाय नातेवाईकांमध्ये आणि कर्मचार्‍यांमध्ये कोणाला औषधांची गरज पडल्यास त्यांना ती औषधे उपलब्ध करून देण्याचे कामदेखील केले. अशा आणीबाणीच्या प्रसंगी ललित सेठ यांना त्यांच्या कुटुंबाची चांगली साथ लाभली. कोणाला काही पैशांची गरज लागली किंवा रुग्णालयातील बिले भरण्यासाठी मदत हवी असल्यास सेठ यांनी पुढाकार घेतला. ललित सेठ यांनी वैयक्तिकरीत्या, तर अनेकांची मदत केलीच, याशिवाय त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या कर्मचार्‍यांनीही काही गरजू कुटुंबांना मदत केली.




Lalit Seth _2  
 
‘कोविड’ काळामध्ये ललित सेठ यांनी कधीच नकारात्मक विचार न करता, सर्व बाबी लक्षात घेऊन या व्यवसायात आपल्या कंपनीची वाढ कशी होईल, याचा सातत्याने विचार केला. त्यांची हीच सकारात्मक ऊर्जा पाहून कर्मचार्‍यांनाही प्रेरणा मिळाली. ’आपले कर्मचारीच आपले योद्धे आहेत’ असे म्हणणार्‍या ललित सेठ यांनी कोरोनामुळे आजारी पडलेल्या कर्मचार्‍यांची जातीने चौकशी केली. ’विमा’, ’कोविड कवच’ यांसारख्या योजनांचा लाभ कर्मचार्‍यांना मिळवून दिला. परिणामी, त्यांचे कर्मचारी आपली जबाबदारी ओळखून अधिक जोमाने कामाला लागले.
 
 
यादरम्यान, कंपनीने कामगार कपातीचा मार्ग न अवलंबता, कर्मचार्‍यांची आर्थिक आणि मानसिक स्थिती चांगली राहावी, यासाठी नेहमी पुढाकार घेतला. अद्याप परिस्थिती फारशी निवळली नसली, तरीही कोरोना काळातील त्यांची हीच ऊर्जा व्यवसायवाढीसाठी उपयोगी ठरली. एवढे मोठे संकट असतानाही ज्याप्रकारे एक नेतृत्व म्हणून धडाडीची कामगिरी बजावली, हा तरुण उद्योजकांसमोर एक मोठा आदर्श आहे. आता ‘अनलॉक’ सुरु झाल्यानंतर अनेक तरुण उद्योजकांना नव्या संधी, नव्या वाटा मिळणार आहेत. त्यामुळे या संकटांना घाबरून न जाता, त्यातून मार्ग काढण्याची विचारशक्ती प्रत्येक तरुण उद्योजकांकडे हवी, असे ललित सेठ आवर्जून सांगतात.संकटातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा. तसेच, एक कंपनीचा संचालक म्हणून कर्मचार्‍यांच्या मदतीला उभे राहिले पाहिजे, असा विचार करून मदतीसाठी पुढाकार घेतला. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, न डगमगता या महामारीचा सामना करण्याचा निर्धार केला.





 
Powered By Sangraha 9.0