‘फिनिक्सभरारी’चा ‘सुशील’ प्रवास

11 Mar 2021 18:59:54

Sushil Arora_1  
 
 
 
मनुष्यबळाची कमतरता, ठप्प झालेले व्यवसाय, त्यामुळे कोलमडलेले आर्थिक गणित, या सर्व आव्हानांवर यशस्वीपणे मात करत, कोरोनाच्या कठीण परिस्थितीतही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत, पुन्हा एकदा नव्या जोमाने व्यवसायाची सुरुवात ‘अरोरा रिफ्रॅक्टरिज प्रायव्हेट लिमिटेड’च्या व्यवस्थापकीय संचालक सुशील अरोरा यांनी केली. त्यांनी आपल्या कार्यातून उद्योजकांसमोरही एक आदर्श प्रस्थापित केला आहे. तेव्हा, आपल्या कर्मचाऱ्यांना तसेच इतर उद्योजकांनाही आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या सुशील अरोरा यांच्या ‘फिनिक्सभरारी’ची ही कहाणी...
 
कोरोनाचा सुरुवातीचा काळ म्हणजेच मार्च महिन्यात परिस्थिती सर्वांसाठीच भीषण होती. कंपनीतील कर्मचारी, कामगार, मजूर घरी परतले होते आणि होते त्यांच्या आरोग्याची खबरदारी घेण्याचेही मोठं आव्हान कंपनीसमोर असल्याचे सुशील अरोरा सांगतात. कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला होता. मात्र, सरकार, कंपनीतील कर्मचारी, काही मित्रमंडळी यांच्या सोबतीने अरोरा यांनी या संकटाशी नेटाने लढा दिला व या संकटावर मातही केली. मर्यादित संसाधनांच्या मदतीने कंपनीने संपूर्ण व्यवसाय पुन्हा सुरू केला. यावेळी कंपनीतील कर्मचारी, स्थानिक प्रशासन, पोलिसांचे या काळात अरोरा यांना प्रचंड सहकार्य लाभले. यावेळी अरोरा यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हानं होतं ते कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे आणि स्थानिक पुरवठा सुरळीत करण्याचे. मात्र, यावेळी सर्वच ग्राहकांनी पुरेपूर सहकार्य केल्याचे अरोरा सांगतात. संपूर्ण देशभरातील कंपनीचे प्रकल्प सुरू असणाऱ्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आधार दिला. त्यांनी कोणालाही ‘काम सोडून तुम्ही गावी जा,’ असे सांगितले नाही. उलट सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत त्यांच्या राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था केली. कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी सर्वांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी, तसेच इतर आरोग्य सुविधा कर्मचाऱ्यांना देऊ केल्या.
 
‘अरोरा रिफ्रॅक्टरिज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची स्थापना १९८३ साली झाली. त्यानंतर कंपनीने भारतातील प्रमुख राजधानीच्या शहरांमध्ये आपल्या शाखांचा विस्तार केला. देशाबाहेर मध्य पूर्व, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, सौदी अरेबिया आणि आफ्रिका येथे रिफ्रॅक्टरी उत्पादने निर्यात केली जातात. ‘अरोरा रिफ्रॅक्टरिज’ ही कंपनी गुणवत्तापूर्ण उत्पादने व सेवा, तसेच ग्राहकांचे समाधान हे प्रमुख उद्देश समोर ठेवून काम करते. भट्टी उत्पादक आणि सल्लागार म्हणूनही कंपनी सेवा देते. इंधन संवर्धनाच्या जागरूक जगात कंपनीने ‘इन्स्युलेटिंग ब्रिक्स’, ‘इन्स्युलेटिंग अॅण्ड कास्टेबल्स’, ‘सिरॅमिक्स फायबर प्रोडक्ट्स’ आणि ‘कॅल्शियम सिलिकेट उत्पादने’ यांसारख्या उत्पादनांचा उत्कृष्ट पर्यायी वापर केला आहे. कंपनी हिट ऑडिटमध्ये आघाडीवर आहे, ज्यामुळे ऊर्जा वाचविण्यासाठी विद्यमान यंत्रणेत सुधारणा व आधुनिकीकरणासाठी उद्योगांना मदत झाली आहे.
 
अगदी विशाखापट्टणम, कोची, गुजरात या सर्वच ठिकाणी जेथे-जेथे कंपनीचे प्रकल्प सुरू आहेत, तिथे आम्ही आवश्यक ती सर्व खबरदारी बाळगली असल्याचे अरोरा सांगतात. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधांचा आणि कमतरतांचाही कंपनीने वेळोवेळी आढावा घेतला. या काळात कंपनीच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी होती. मात्र, पुरेसे मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध नसल्याने कंपनी कोणतेही उत्पादन घेऊ शकत नव्हती, तसेच वितरण करू शकत नव्हती. अशावेळी उत्पादनाची विक्रीच नसल्याने अनेक आर्थिक आव्हानं समोर उभी राहिली. यावेळी घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला ५० टक्केच पगार देण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र, अरोरा यांनी यास नकार देत कर्मचाऱ्यांच्या पाठीशी या गंभीर परिस्थितीतही कायम उभं राहत ८० टक्क्यांहून अधिक पगार या काळात दिला. कालांतराने मे महिन्यात जेव्हा कंपनीला काम सुरू करण्याची परवानगी मिळाली, त्यानंतर त्वरित त्याच महिन्यापासून कर्मचाऱ्यांना १०० टक्के पगार दिला गेला. माझे कर्मचारी माझ्यासोबत या काळातही खंबीरपणे उभे होते, याचा मला खूप अभिमान असल्याचं सुनील अरोरा सांगतात. कर्मचाऱ्यांच्या याच सहकार्यामुळे कंपनीला कोरोनानंतर व्यवसायाला पुन्हा उभारी देणं शक्य झाले. या काळात कंपनीसमोर आर्थिक आव्हानं मोठ्या प्रमाणावर होती. उत्पादन ठप्प होते. मात्र, खर्च हा सुरूच होता. मात्र, सरकार या काळात कर भरणे, बँकांचे हफ्ते भरणे, वीजबिल भरण्यास सवलत यांसारख्या असंख्य गोष्टींतून सहकार्य करत होते. मात्र, तरीही कंपनीने कोणतेही सरकारी कर भरण्यात दिरंगाई केली नाही, तसेच सर्व कर वेळेत कोणत्याही दंडात्मक कारवाईशिवाय भरणा केले.
 
या काळात सामाजिक कार्यातही अरोरा यांनी भरीव योगदान केले. एप्रिल-मे या काळात प्रचंड ऊन होते. ही बाब लक्षात घेत गरजवंतांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, तसेच छत्रीचे वाटप अरोरा यांनी केले. तसेच रस्त्यावर विनामास्क फिरणारे नागरिक, ज्यांच्याकडे मास्क नाहीत, अशा सर्वांना मास्कचे वाटप अरोरा यांनी केले. कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना छत्री, पाण्याच्या बाटल्या तसेच साडेतीन हजार मास्कचे वाटप अरोरा यांनी केले. इतकेच नाही तर गरजू नागरिकांना शिजवलेले अन्न, तसेच अन्नधान्याची पाकिटे दोन हजारांहून अधिक नागरिकांना ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून वाटले. तसेच ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून कोरोनाच्या मोफत चाचण्या, ‘क्वारंटाईन सेंटर’ची उभारणी व तेथे येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची खबरदारी यामध्ये अरोरा यांनी हिरिरीने सहभाग नोंदविला. कोरोनाकाळात सर्व व्यवहार ठप्प होते, कंपनीच्या बैठका होऊ शकत नव्हत्या. याचबरोबर संवाद साधणं अवघड झालं होतं. मात्र, या कठीण काळातही मित्रमंडळी एकमेकांना मानसिक आधार, आर्थिक मदत करण्यात व्यस्त असल्याचे अरोरा सांगतात. या काळात अरोरा व त्यांच्या मित्रमंडळींनी काही गट बनवले ते असे की, एक ग्रुप सर्वांची आरोग्यविषयक काळजी घेईल, काही जण कंपनीच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडतील, एक ग्रुप एमआयडीसीमधील कंपन्यांच्या स्थितीवर आर्थिक आव्हानांवर लक्ष ठेवेल, अशा रीतीने सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत एकमेकांना सहकार्य केल्याचे अरोरा सांगतात.
 
भविष्यात ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यानुसार स्वतःत बदल निर्माण करणे, हे व्यवसाय क्षेत्रासमोर संधी निर्माण करणार असेल, असे अरोरा सांगतात. यासाठी तरुणांनाही काही कौशल्ये अवगत करणे आवश्यक आहे. जसे की, तंत्रज्ञानाच्या मदतीने एका ठिकाणाहून संपूर्ण जगभरात काय चालले हे पाहणे संवाद साधणे, त्या बदलांचा बारकाईने अभ्यास करून नव्या बदलांना आत्मसात करणे, उद्योजकता क्षेत्रात येणाऱ्यांना येणं भविष्यात गरजेचे आहे. “व्यवसाय सुरू करताना आपले उत्पादन सर्वसामान्यांसाठी खरंच गरजेचे आहे का? कठीण प्रसंगात ते उपयुक्त ठरू शकेल का? याचा विचार करा, जे आपल्याला कोरोनाकाळाने शिकवले आहे,” असे सुशील अरोरा नव्याने उद्योजक क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना सांगतात.
 
Sushil Arora 1_1 &nb
 
 
 
"कोरोना काळाने खूप काही शिकवले. कोरोनानंतर जग बदलत आहे. हे नवे बदल आत्मसात करून पुन्हा नव्याने सुरुवात करूया. तंत्रज्ञानस्नेही युगाचे महत्त्व आपण जाणले आहे. त्यामुळे व्यवसायात उन्नती हवी असल्यास तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करा."



Powered By Sangraha 9.0