वसा स्वच्छता व सुरक्षेचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

rupesh jadhav_1 &nbs


कोरोना संकटकाळात व्यवसाय क्षेत्रासमोरील आव्हाने पार करत स्वच्छता व सुरक्षितता या क्षेत्रात ‘युएफएमएस सोल्युशन्स इंडिया एलएलपी’ कंपनीने उत्तम सेवा बजावली. कंपनीचे संचालक रुपेश जाधव यांनी कोरोना काळात केलेल्या उत्तम नियोजन आणि कर्मचारी व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर कंपनीला विकासाचा टप्पा गाठता आला. आपल्या कर्मचार्‍यांमध्ये ‘कोविड’संबंधी महत्त्वाच्या सूचना देऊन त्यांनी जनजागृतीही केली. शिवाय ‘सॅनिटायझेशन सोल्युशन’ देण्यासही कंपनीने सुरुवात केली. तेव्हा, रुपेश जाधव यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख...कोरोना काळातील एकूणच परिस्थिती पाहता, व्यवसाय क्षेत्रासमोर अनेक आव्हाने या काळात निर्माण झाली. अशावेळी तब्बल तीन ते चार महिने ‘लॉकडाऊन’ झाल्यानंतर प्रत्येक क्षेत्राला नव्याने उभारी देत कर्मचारी व्यवस्थापन ते उत्पादन व सेवा क्षेत्रात काही आमूलाग्र बदल या काळात घडून आले. अशा अटीतटीच्या प्रसंगी रुपेश जाधव यांनी ‘युएफएमएस सोल्युशन्स इंडिया एलएलपी’ या कंपनीच्या विस्तारास आणि इतर कंपन्यांना कर्मचारी व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले. आपली सेवा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेल्या बदलांची माहिती देणारा हा लेख. ‘युएफएमएस सोल्युशन्स इंडिया एलएलपी’ ही तत्काळ प्रतिसाद देणारी, एकात्मिक सुविधा आणि सेवा देणारी कंपनी आहे. ज्यामध्ये हाऊसकीपिंग सर्व्हिसेस, इलेक्ट्रिक व टेक्निकल सर्व्हिसेस, बिझनेस सपोर्ट सर्व्हिसेस आणि सेवांसह सर्व प्रकारच्या क्लीनिंग मशिनरींची विक्री व सेवा यांचा समावेश आहे. पुणेस्थित ‘युएफएमएस’ कंपनीची स्थापना २०१३ साली झाली. रुपेश जाधव यांनी आपल्याकडे असणार्‍या व्यवस्थापकीय कौशल्याच्या १४ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला पुण्यातून कारभार सुरू झालेली ही कंपनी आता महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये आपली सेवा पुरविते आहे. पुणे, मुंबई, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या शहरांमध्ये कंपनीच्या शाखा कार्यरत आहेत. पुण्यातील ‘सॉलिटर ग्रुप’, ‘एएफसी लिमिटेड’, ‘ईपीरॉक’, ‘आय.रिसर्च’ यांसारख्या २४ ते २५ नामांकित ठिकाणी कंपनी आपल्या सेवा पुरविते आहे.संकटकाळात खचून न जाता, धीराने संकटाचा सामना करणे गरजेचे आहे. तरुणांनी कोणत्याही परिस्थितीत हार मानता कामा नये. उद्योजकता क्षेत्रात आव्हाने येतच असतात. मात्र, त्याबरोबरच नव्या संधीही घेऊन ही आव्हाने येतात. त्यामुळे हतबल होऊन लगेच माघार घेऊ नये.


अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच जाधव यांच्यासमोरही कंपनीचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ‘लॉकडाऊन’ होताच आयटी क्षेत्रात कार्यरत असणार्‍या कंपन्यांनी सर्वच कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा दिली. अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली. याचा मोठा फटका सुरक्षा कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचार्‍यांना बसला. ज्या प्रमाणात ‘कोविड’पूर्व काळात मनुष्यबळाची मागणी होत होती, ती ‘कोविड’च्या काळात अचानक घटली. त्यामुळे ‘युएफएमएस’सोबत जोडल्या गेलेल्या मनुष्यबळाचे काय करायचे? तसेच त्यांचे पगार व सुरक्षा ही सर्व आव्हाने कंपनीसमोर उभी राहिली. मात्र, या काळात जाधव ज्या कंपन्यांना आपल्या सेवा पुरवतात, अशा सर्वच कंपन्यांनी कर्मचार्‍यांना घरी राहूनदेखील पगार दिले. या काळात दळवळण व परिवहन सेवा बंद असल्याकारणाने सर्व सिस्टीम्सचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान कंपनीसमोर निर्माण झाले. त्यामुळे कर्मचार्‍यांची कंपनीतच राहण्याची व्यवस्था करण्यात आली. कंपनीत राहत असताना सर्व कर्मचार्‍यांची सुरक्षा, आरोग्याची काळजी, जेवणाची व्यवस्थाही कंपनीने केली.rupesh jadhav_1 &nbs


खरंतर मार्च ते जुलै दरम्यान पुण्यात कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होत होता. अशावेळी जाधव यांच्यावर कुटुंबीयांकडूनही अशा वातावरणात बाहेर जाऊ नये, असा आग्रह होता. मात्र, या काळात आपल्या कर्मचार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, कंपनीच्या प्रगतीसाठी घरात बसून चालणार नाही, हे रुपेश जाधव यांनी वेळीच ओळखले होते. त्यामुळे या काळातही जाधव आपल्या आरोग्याची काळजी घेत प्रत्येक ठिकाणी आवर्जून भेट देत. तेथील कर्मचार्‍यांची विचारपूस करत. यावेळी ज्या ठिकाणी कंपनी सेवा देते, अशा ठिकाणी कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांनादेखील कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली. एकीकडे कर्मचार्‍यांचे पगार व व्यवस्थापनासमोरील आव्हाने लक्षात घेत, काहीतरी पर्यायी मार्ग असावा, या विचारामुळे ‘सॅनिटायझेशन सोल्युशन’ देण्यासही कंपनीने सुरुवात केली. ही सुरुवात करत असताना शासनाकडून दिल्या गेलेल्या सर्व नियमांचे पालन करणेही तितकेच आवश्यक होते. त्यामुळे स्वच्छता क्षेत्रात सेवा बजावणार्‍या कर्मचार्‍यांना ‘पीपीई किट’ देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, ‘कोविड’ होऊ नये म्हणून त्यांना सर्व उपाययोजना समजावून सांगणे यांसारख्या गोष्टी जाधव यांनी अविरतपणे केल्या. याचा परिणाम असा झाला की, कर्मचार्‍यांना सुरक्षिततेची हमी मिळाली व सर्वच कर्मचारी वेळेवर कामात उपस्थित राहू लागले. त्यामुळे या काळात कंपनीच्या कोणत्याही ग्राहकाकडून कर्मचार्‍यांबद्दल तक्रार आली नाही. परिणामी, कंपनीची प्रतिमा बाजारात आणखी उंचावली. उत्तमरीत्या सेवा दिल्यामुळे सर्व कंपन्यांनी वेळेत सर्व ‘पेमेंट’ केले. हे सर्व ‘पेमेंट’ जाधव यांनीदेखील सर्व कर्मचार्‍यांना दिले. तसेच कोणतीही कर्मचारी कपात केली नाही. आपल्या कुटुंबाप्रमाणे सर्व कर्मचार्‍यांची व त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेतली. अशा रितीने भविष्यातही कंपनीसमोर आपले कार्यक्षेत्र अधिकाधिक वाढविणे हेच ध्येय असल्याचे जाधव सांगतात.
@@AUTHORINFO_V1@@