केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर टेरिटोरियल आर्मीमध्ये बनले कॅप्टन !

10 Mar 2021 19:16:42

anurag thakur_1 &nbs



नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना पदोन्नती मिळाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे दिली आहे. हे प्रमोशन राजकारणातील नाही तर प्रादेशिक सैन्यातील म्हणजेच टेरिटोरियल आर्मीमधील आहे. अनुराग ठाकूर हे २०१६मध्ये प्रादेशिक सैन्याशी जोडले गेले आहेत. त्यावेळी ते लेफ्टनंट या पदावर नियुक्त झाले होते. आता त्यांना बढती मिळाली असून त्यांना कॅप्टन पद देण्यात आले आहे.अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, “जुलै २०१६ मध्ये मी टेरिटोरियल आर्मीमध्ये रेग्युलर ऑफिसरप्रमाणे लेफ्टनंट पदावर नियुक्त झालो होते. आज मला सांगताना अभिमान वाटत आहे की, माझं प्रमोशन झालं असून मी कॅप्टन बनलो आहे. भारत माता आणि तिरंग्याप्रती असलेलं कर्तव्य पार पाडण्यासाठी मी तयार आहे. जय हिंद”, अशा शब्दात ठाकूर यांनी आपला आनंद व्यक्त केला.




टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय?


टेरिटोरियल आर्मी हा भारतीय सैन्याचा एक भाग आहे. लष्कराला जिथेही गरज भासते तिथे टेरिटोरियल आर्मी आपले यूनिट उपलब्ध करुन देते. टेरिटोरियल आर्मीमध्ये १८ ते ४२ वयोमर्यादा असणारे पदवीचं शिक्षण घेतलेले, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असलेले नागरिक लेफ्टनंट पदावर रुजू होऊ शकतात. मात्र या सैन्यात भरती होण्यासाठी तुमच्याकडे कमाईचं स्वत:चं साधन असलं पाहिजे. ही एक प्रकारे वॉलेंटियर सर्व्हिस आहे. कायमस्वरुपाची नोकरी नाही. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही टेरिटोरियल आर्मीसोबत जोडला गेलेला आहे. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये ऑपरेशन रक्षक, नॉर्थ-ईस्टमध्ये ऑपरेशन रायनो आणि ऑपरेशन बजरंगमध्ये टेरिटोरियल आर्मीने सक्रियपणे भाग घेतला होता. टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार आणि सर्व्हिस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे.


Powered By Sangraha 9.0