‘पीएसएलव्ही-सी ५१’- ‘अ‍ॅमेझोनिया-१’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

    दिनांक  01-Mar-2021 11:45:35
|

narendra modi_1 &nbs

अंतराळात भगवद्गीतेसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र

नवी दिल्ली: ‘पीएसएलव्ही-सी ५१’-‘अ‍ॅमेझोनिया-१’ उपग्रहाच्या प्रक्षेपणासह भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने २०२१ मधील आपली पहिली अवकाश मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा स्पेस पोर्टच्या प्रक्षेपण पॅडमधून प्रथमच भारतीय रॉकेटने ब्राझीलच्या ६३७ किलो वजनाच्या ‘पीएसएलव्ही-सी ५१’-‘अ‍ॅमेझोनिया- १’ उपग्रहाचे प्रक्षेपण केले. सोबतच इतर १८ उपग्रहांनाही अवकाशातील त्यांच्या नियोजित कक्षेत सोडण्यात आले.
 
 
 
रविवारी प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहाला ‘सतीश धवन उपग्रह’ किंवा ‘एसडी सॅट’ असे नाव देण्यात आले आहे. याद्वारे २५ हजार लोकांची नावे अंतराळात पाठवण्यात आली. ‘नॅनो सॅटेलाईट’मध्ये भगवद्गीतेची एक प्रत ‘एसडी कार्ड’च्या रूपात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वरच्या पॅनेलवर कोरले आहे. हा त्यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमासाठी आणि अवकाश खासगीकरणासाठीच्या योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा प्रयत्न आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सीवन आणि वैज्ञानिक सचिव डॉ. आर. उमामहेश्वरन यांची नावे तळावरील पॅनेलवर कोरलेली आहेत.
 
 
 
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएसएलव्ही-सी ५१’-‘अ‍ॅमेझोनिया-१’ मिशनच्या पहिल्या व्यावसायिक प्रक्षेपणाच्या यशाबद्दल ‘एनएसआयएल’ आणि ‘इस्रो’चे अभिनंदन केले आहे. “ ‘पीएसएलव्ही-सी ५१’-‘अ‍ॅमेझोनिया-१’ मिशनच्या पहिल्या समर्पित व्यावसायिक प्रक्षेपणाच्या यशाबद्दल ‘एनएसआयएल’ आणि ‘इस्रो’ यांचे अभिनंदन. यामुळे देशातील अंतराळ सुधारणांच्या नव्या युगाची सुरुवात झाली झाले. १८ सह-प्रवाशांमध्ये चार छोट्या उपग्रहांचा समावेश होता जे आमच्या तरूणांचा उत्साह आणि नवोन्मेशाचे प्रदर्शन घडवितात,” असे पंतप्रधानांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. सोबतच पंतप्रधानांनी, “पीएसएलव्ही-सी ५१’ द्वारे ब्राझीलच्या ‘अ‍ॅमेझोनिया-१’ उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनोरो यांचे अभिनंदन. उभय देशातील अंतराळ सहकार्यातील हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि ब्राझीलच्या वैज्ञानिकांना माझ्या शुभेच्छा,” असे ट्विटरवरील दुसर्‍या संदेशात म्हटले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.