माझे मन, माझी जबाबदारी!

01 Mar 2021 22:39:30

Mind_1  H x W:
 
 
 
आयुष्यात आपल्याला चिंता वा तणाव कमी करायचा असेल, तर सगळ्यात सुलभ गोष्ट कुठली करायची, तर आपल्या मनात विचारांचे काहूर माजवण्यापेक्षा वस्तुस्थितीकडे लक्ष केंद्रित करायचे. पुन्हा पुन्हा ही वस्तुस्थिती कोरोनाच्या काळात तपासून घ्यायची, ‘डबलचेक’ करायची. कारण, काही वेळा लोक ‘सिरीयस’ली दुहेरी माहिती पुरवतात. वादळं निर्माण करतात आणि आपण हरवतो. आपल्या स्वत:च्या मानसिक तथ्याचा आढावा स्वत:च घ्यायला हवा. आपण मनात नकारात्मक चाळण तर ठेवली नाही ना, हे पाहिले पाहिजे.
 
 
आयुष्य घडत असतं. आपण अगदी शांत बसून, थोडंसं वळून पाहिलं कधी दिवसाकडे, महिन्यांकडे आणि कधी वर्षांकडे, तर आपल्या लक्षात येतं की, आयुष्य घडत गेलं. गोष्टी आपोआप घडत गेल्या. काही आपल्याला स्पर्शून गेल्या. काही नकळत खूप दुरून गेल्या. त्यातही बराच आनंद देऊन गेल्या आणि काही विषण्ण करून गेल्या. खटकणारं इतकंच की, विषण्ण करणाऱ्या गोष्टी मनात मात्र घर करून राहिल्या. मार्क ट्रम या अमेरिकन लेखकाने म्हटले आहे आणि खूप मनोरंजकतेने म्हटले आहे की, “माझ्या आयुष्यात खूप चिंतादायी गोष्टी होत्या आणि त्यापैकी बऱ्याचशा कधी घडल्याच नव्हत्या.” म्हणजेच आयुष्य जेव्हा घडत असतं, तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींचा तणाव जाणवतो. आपण ज्या पद्धतीने घडलेल्या प्रसंगांचे विश्लेषण करतो, त्यावर खरेतर आपल्या चिंता वाढू शकतात किंवा त्या कमी होऊ शकतात. आपल्याला तणाव किंवा ‘स्ट्रेस’ जर काबूत ठेवायचा असेल, तर आपल्याला आपला ‘नजरियाँ’ किंवा दृष्टिकोन सांभाळायला लागेल.
 
सध्या कोरोनाचा प्रभाव वर-खाली होत राहिला आहे. महामारी दूर गेली असे वाटत असताना पुन्हा आता महामारीची नवीन लाट येऊ घातली आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मास्क लावत आहेत. काही कोरोना गायब झाला, असे समजून मास्क न लावता हुंदडत आहेत. काही आजूबाजूला लपलेला कोरोना जवळ आला, तर मास्क नाकावर घेऊ म्हणून हनुवटीवर किंवा गळ्यात मास्क बाळगून आहेत. गंमत आहे खरी, फक्त यावर खोडसाळपणे हसता येत नाही. कारण, कोरोना ही गंभीर बाब आहे. काही लोक कोरोनाची उगाचच अफवा पसरवित आहेत. ‘मतदान जवळ आले आहे म्हणून राजकीय नेत्यांचा कट चालला आहे.’ ‘लस बाजारात आलेली असल्यामुळे तिचे ‘मार्केटिंग’ सुरू आहे.’ आणखी काय काय कंड्या पिकत आहेत. शेजारीपाजारी प्रत्येकाचे आपले आपले मत आहे किंवा शेजाऱ्यांबरोबर मैत्रीखातर वाढून घेतलेला दृष्टिकोन आहे. हे सगळे कोरोनाचे जगभर चाललेले तांडवनर्तन पाहूनसुद्धा होत आहे. पण, जेव्हा माणसाचे मन भरकटत जाते, तेव्हा त्याची कुठलीही सीमा नसते. ते भ्रमात आणि कल्पनेत गोलगोल फिरत राहते. अर्थात, कोरोनाला घाबरून घरातून बाहेर न पडणारी मंडळीही या चक्रांकित भ्रमाचे दुसरे टोक आहे. यामध्ये आपल्याला शहाण्या माणसाचा शोध घेणं आवश्यक असतं. ही हुशार मंडळी आपल्या बुद्धीला भयाच्या गुहेत लोटत नाहीत किंवा बिनधास्त शहाण्यांच्या बेजबाबदार वागण्यातून स्वतःला कोरोनाच्या पायी बळीही देत नाहीत. ही मंडळी खऱ्या अर्थाने बुद्धीला शास्त्राच्या आधाराने पुढे नेताना स्वयंप्रेरित असतात. सुज्ञ असतात. त्यांना काम-धाम करायचे असते, पण स्वतःलाही सुरक्षित ठेवायचे असते. मग काय न चुकता मास्क वापरत ‘दो गज दुरी’ पाळत आणि इतरांनाही पाळायला लावत ही मंडळी शहाण्यासारखं आयुष्य जगतात. आताच्या तणावजन्य आणि संभ्रमित जगात ही मंडळी स्वतःला भ्रमित न करता किंवा जगाचा कोरोनाने विध्वंस होईल, असा पराकोटीचा विचार न करता, स्वतःचा व्यवस्थित ‘प्लान’ करतात. शांतपणे आयुष्य जगातात.
 
आयुष्यात आपल्याला चिंता वा तणाव कमी करायचा असेल, तर सगळ्यात सुलभ गोष्ट कुठली करायची, तर आपल्या मनात विचारांचे काहूर माजवण्यापेक्षा वस्तुस्थितीकडे लक्ष केंद्रित करायचे. पुन्हा पुन्हा ही वस्तुस्थिती कोरोनाच्या काळात तपासून घ्यायची, ‘डबलचेक’ करायची. कारण, काही वेळा लोक ‘सिरीयस’ली दुहेरी माहिती पुरवतात. वादळं निर्माण करतात आणि आपण हरवतो. आपल्या स्वत:च्या मानसिक तथ्याचा आढावा स्वत:च घ्यायला हवा. आपण मनात नकारात्मक चाळण तर ठेवली नाही ना, हे पाहिले पाहिजे. जसे या जगात जाहिरातीच्या, गप्पाटप्पांच्या विश्वात वाहून जाणारे आहेत, तसेच समोरच्या प्रत्येक माहितीला आणि शास्त्राला उगाचच नाकारणारे लोकही अमाप आहेत. हे दोन्ही प्रकारचे लोक नेमक्या महत्त्वाच्या क्षणी समाजात सावळा गोंधळ घालू शकतात. आपण स्वत:ला संकटामध्ये टाकू नये, हे महत्त्वाचे. यासाठी आपल्याकडे चौकस मन असायला पाहिजे. वस्तुस्थितीवर विश्वास असायला पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे. या सगळ्यातून लाभणारी निर्णयक्षमता आपल्याला कोरोना असो की आर्थिक तोटा असो, सगळ्यातून सहिसलामत सुटका करून घ्यायची प्रेरणा देते. समस्या आहेत आणि त्या असणारच; पण त्यातूनही आयुष्य जमेल तितक्या आनंदाने जगायचे, हे शेवटी महत्त्वाचं!
 

- डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0