सगळ्या विधायक लोकांच्या मनात बरे-वाईट संदेह असतातच आणि नेहमीच असणार, पण आपण या संदेहांचे, शंकांचे मंथन कसे करतो, हे महत्त्वाचे आहे.
बऱ्याच वेळा आपल्याला लोक सांगतात की, “जास्त संशय घेऊ नकोस. फक्त विश्वास ठेव.” पण, विल्यम शेक्सपिअरने म्हटले आहे की, Modest doubt is called the beacon of the wise, म्हणजे मर्यादित संदेह हा शहाण्या माणसासाठी दीपस्तंभासारखा आहे. संदेह किंवा संशय हा एखाद्या गोष्टीची खात्री नसली किंवा त्यात अनिश्चितता असली की उत्पन्न होतो. पण, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात संदेह हा किती उपयुक्त ठरू शकतो, हे फार कमी जणांना माहीत आहे. थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून हे आपण समजून घ्यायला पाहिजे. बहुतेक लोकांना ‘संशय’ ही संकल्पनाच ओंगळ वाटते.
आपल्याबद्दल एखाद्याने शंका घेतली तर आपल्याला अस्वस्थ वाटतं. कधीकधी अपमानितही वाटतं. लगेचच आपण त्या व्यक्तीला ते कसे खोटे आहे, हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. आपण तिरमिरीत जातो. बहुधा लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या क्षमतेबद्दल संदेह व्यक्त करतात, तेव्हा त्यांचे नैतिक खच्चीकरण होत जाते. पण, आपल्या ‘इंडियन क्रिकेट टीम’ला सगळ्यांनी अक्षम ठरविल्यानंतरही जो ऑस्ट्रेलियावर सोनेरी विजय मिळविला, ते पाहून लक्षात येते की, आपली एखाद्या गोष्टीबद्दलची व कृतीबद्दलची क्षमता ही काही शाश्वत टिकणारी गोष्ट नसते. अशा प्रकारचा संदेह कधीकधी उत्तम प्रेरणेतही बदलू शकतो. फक्त आपल्या मनात स्वत:बदल वा स्वत:च्या कुवतीबद्दल संशय नसावा. दुसऱ्यांनी आपल्याबद्दल घेतलेल्या संदेहामुळे कधीकधी आपल्या समोर एक ध्येय उभं ठाकतं. त्या ध्येयामुळे आपल्या मनात एक स्फूर्ती निर्माण होऊ शकते. म्हणजे सक्षम माणसाच्या बाबतीत अशा प्रकारचे संदेह यशश्री खेचून आणू शकतात. जगातील महान व्यक्ती या सामान्य लोकांच्या वैचारिक मर्यादेपलीकडे का पोहोचतात? याची अनेक कारणे असू शकतात. एक महत्त्वाचे कारण म्हणजे, जगाच्या अशा बऱ्या वा वाईट शंकाकुशंकातून ते तरून गेले. त्याबरोबर ते जगायला शिकले. खरेतर त्यांना या अनुभवातून शहाणपण मिळाले. त्यांनी त्यांची चाल अर्धवट सोडली नाही. ते पुढे मार्गक्रमण करत राहिले.
व्हिन्सेंट वॅन गॉन हे जगप्रसिद्ध चित्रकार म्हणतात, “तुमच्या डोक्यातून आवाज आला की, तुम्हाला चित्र काढता येणार नाही... तर तुम्ही मुद्दाम चित्र काढा. तुमचा तो आवाज आपोआप शांत होईल.” संदेह हे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात येत जात असतात. कधीकधी मोठे संशयकल्लोळही घडत असतात. पण, संदेह शेवटी आपल्याला एखाद्या गोष्टीचा पुनर्विचार करण्याची संधी देतात. पण, त्यात सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचे चक्र असते. अनिश्चितता असते. या अनिश्चिततेचा आपण चिंतनात्मक विचार केला तर शेवटी आपण एका निश्चित निरसनापर्यंत पोहोचू शकतो. संदेह तसा आपल्याकडे असलेल्या विचारमंथनाचा घटक आहे. आपल्या अनुभवाचा व ज्ञानाच्या साठ्याचा हिस्सा आहे. चूक किंवा बरोबर हा प्रश्न आपल्यासमोर केव्हा उभा राहतो, जेव्हा आपण अनेक गोष्टींचा विचार करतो तेव्हा... आपली विश्लेषण करण्याची कुवत असते तेव्हा... सगळ्या विधायक लोकांच्या मनात बरे-वाईट संदेह असतातच आणि नेहमीच असणार, पण आपण या संदेहांचे, शंकांचे मंथन कसे करतो, हे महत्त्वाचे आहे. आपण आयुष्यातील शंकांचे निरसन किती जाणीवपूर्वक आणि प्रगल्भपणे करतो, यावर निर्णय अवलंबून राहतील. संदेहाचे गुलाम होणारे रसातळाला गेले, पण त्यावर सारासार विचार करणारे जन जगज्जेतेही झाले.