पालघर नौदल अधिकारी हत्या प्रकरणाला वेगळे वळण

08 Feb 2021 18:06:18
Palghar _1  H x


पालघर : भारतीय नौदलातील अधिकारी सुरजकुमार दुबे यांच्या अंगावर अज्ञातांनी पेट्रोल टाकून त्यांना जीवंत जाळण्यात आल्याची घटना शनिवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील वेवजीच्या जंगलात समोर आली होती. रविवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी या अपहरण व हत्या प्रकरणात पोलिसांना आणखी वेगळी माहिती मिळाल्याचे पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 
नौदल अधिकारी सुरजकुमार यांच्याकडे अज्ञातांनी दहा लाख रुपयांची मागणी करून त्यांचे चेन्नई विमानतळावरून अपहरण केले. तीन दिवस सुरजकुमार यांना चेन्नईत डांबून ठेवल्यानंतर तलासरी जवळच्या वेवजी जंगलात आणून त्यांना जीवंत जाळले असल्याची माहिती सुरजकुमार यांनी स्वतः मृत्यू अगोदर दिलेल्या पोलीस जवाबात दिली होती. मात्र, मागील दोन दिवसांत या तपासात पालघर पोलिसांनी आणखी वेगळी माहिती समोर आणली आहे.
 
सुरजकुमार यांच्याकडे दोन मोबाईल क्रमांक होते आणि ते तिसरा मोबाईल क्रमांकदेखील वापरत होते. या तिसर्‍या क्रमांकाची सुरजकुमार यांच्या परिवाराला माहिती नव्हती. सुरजकुमार हे या तिसर्‍या मोबाईल क्रमांकावरून शेअर बाजाराचे व्यवहार करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याचे पोलीस अधीक्षक शिंदे यांनी सांगितले आहे. सुरजकुमार शेअर बाजाराचे व्यवहार ज्या तिसर्‍या क्रमांकावरून करायचे तो क्रमांक दि. 1 फेब्रुवारीपर्यंत चालू होता, असे त्यांच्या नातेवाईकाने सांगितले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
 
काम करत असलेल्या ठिकाणी ठिकाणी सुरजकुमार यांनी सहकार्‍यांकडून काही पैसे हातउसने घेतले होते. सुरजकुमार त्यांच्या खात्यात काही नाममात्र रक्कम पोलिसांना आढळून आली. तसेच, या खात्यातून त्यांनी सर्वाधिक व्यवहार शेअर बाजारासोबत आणि संबंधित काही खासगी कंपन्यांमार्फत केला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, ठार मारणे अशा विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाच्या तपासासाठी पालघर जिल्हा पोलिसांनी दहा पथके तैनात केली आहेत. सुमारे 100 पोलीस अधिकारी व कर्मचारी विविध पातळीवर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. सुरजकुमार यांनी मृत्यूपूर्वी दिलेल्या जवाबानुसार एका वेगळ्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. हे प्रकरण आता वेगळे वळण घेत असून यात आता कोणकोणत्या घडामोडी घडत आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
सुरजकुमार यांच्या सहकार्‍यावर संशय
रांची येथील पोलीस ठाण्यात सुरजकुमार यांचा संपर्क होत नसल्याने त्यांचे वडील मिथिलेश दुबे हे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करायला गेले असताना पोलिसांनी त्यांना चेन्नई येथे तक्रार दाखल करण्यासाठी जाण्यास सांगितले. सुरज यांच्या नातेवाईकांची तक्रार चेन्नई येथील पोलीस ठाण्यातही घेतली नाही. सुरजकुमार यांच्या वडिलांनी सुरजकुमार यांच्या एका सहकार्‍यावर संशय व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0