विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्री नाहीत ते फक्त शिक्षणसम्राटांचेच

06 Feb 2021 15:31:56

atul bhatkhalkar_1 &



सरकारची व शिक्षण सम्राटांची हातमिळवणी



मुंबई
: कोरोनाच्या महामारीमुळे बहुतांश शाळा बंद असताना सुद्धा खाजगी शिक्षण संस्थांकडून सर्व प्रकारच्या फी आकारण्यात येत आहेत. अशा शिक्षण संस्थांना ताकीद देण्याचे सोडून राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड हे पालक संघटनांवरच खोटे आरोप करून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करीत आहेत, शिक्षणमंत्री हे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे सोडून केवळ शिक्षण सम्राटांच्या फायद्यासाठीच काम करीत आहेत असा आरोप भाजपा नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
 
 
 
कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी देशातील गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांनी तेथील कायद्यात सुधारणा करून विद्यार्थांना फी मध्ये ५० टक्यांपेक्षा अधिकची सुट दिली आहे. यात महाराष्ट्राने सुद्धा राज्यातील विद्यार्थांना शाळांच्या फी मध्ये ५० टक्के सवलत देण्याची मागणी पहिल्या दिवसापासून, भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या सभागृहात व सभागृहाच्या बाहेर सतत आवाज उठवीत आहे.



राज्यातील विविध पालक संघटना यांच्याकडून सुद्धा मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन केले जात आहे. मात्र राज्यातील शिक्षण मंत्री व हे सरकार त्याकडे लक्ष देत नाही , शिक्षण संस्थांच्या फायद्याचे निर्णय हे सरकार घेत आहेत असं म्हणत भाजप नेते भातखळकर यांनी शिक्षण मंत्र्यांवर निशाना साधला.
 
 
 
हे सरकार योग्य निर्णय घेत नाही कारण , सरकारची व शिक्षण सम्राटांची हातमिळवणी असल्याचे उघड आहे. शासन निर्णया विरुद्ध शिक्षण सम्राट न्यायालयात जातील याची पूर्वकल्पना असून सुद्धा कायद्यात सुधारणा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या विरोधात आंदोलन करणाऱ्या पालक संघटनांच्या विरोधात शिक्षणमंत्री दबाब टाकत आहेत हे खेदजनक व संतापजनक प्रकार आहे.




इतकेच नव्हे तर पनवेल व नाशिक येथील दोन शाळांच्या तपासणीला स्थिगिती देण्याचे काम सुद्धा शिक्षणमंत्र्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे पालक संतप्त आहेत जर या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून तात्काळ शालेय फी मध्ये 50 टक्के सवलत देण्यासंदर्भात पुढील आठ दिवसांत वटहुकूम काढावा अन्यथा भारतीय जनता पक्षांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा भातखळकर यांनी आज दिला आहे.




Powered By Sangraha 9.0