मनसेच्या खेळीला नवी मुंबईतून सुरुवात
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आधीच सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. त्याप्रमाणे मनसेनेही व्यूहरचना आखली आहे. त्याच दृष्टीने राज ठाकरे यांनी आज वाशी कोर्टात उपस्थित राहण्याचे निमित्त करून नवी मुंबईत शक्ती प्रदर्शन केले. यासाठी वाशी परिसरात सर्वत्र मनसैनिक राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जमले होते. कोर्टाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राज ठाकरेनी मनसैनिकांची बैठकही घेतली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २६ जानेवारी २०२० रोजी वाशी येथील विष्णूदास नाट्यगृहात भडकावू भाषण केले होते. ज्यामध्ये राज यांनी टोल भरू नका, असे आवाहन केले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी राज्यातील ठिकठिकाणचे टोल नाके फोडले. या प्रकरणी वाशी कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरुद्ध भडकावू भाषण करणे आणि त्यामुळे जमाव प्रक्षुब्ध होऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणे या प्रमुख आरोपांतर्गत राज ठाकरे याच्यावर भादंस १५३,५०४,५०५ (१) (२) गुन्हा दाखल केला व हा खटला वाशी कोर्टात सुरू झाला.
त्यानुसार अनेक २०१४ ते २०२० या वर्षात राज ठाकरे यांना कोर्टात तारखेला उपस्थित राहण्यासाठी वॉरन्ट आले मात्र ते उपस्थित राहिले नाहीत.आज अखेर आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ते वाशी कोर्टात गेले असतील असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने राज ठाकरे यांना कोणत्याही अटी आणि शर्तीवीना जामीन मंजूर केला आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार असून पुढच्या सुनावणीला अनुपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
राज ठाकरे हे एक राज्यातील महत्वाचे राजकारणी आहेत.विद्यार्थी संघटनेपासून ते राज्यातल्या महत्वाच्या राजकारणात ते सक्रिय आहेत.पक्ष स्थापन झाल्यानंतर 200९ ला त्यांचा पक्षाला चांगले यश मिळाले.मात्र हळूहळू पक्षाच्या कामगिरीला उतरत्या कळा लागल्या आणि पक्षातील वाटचाल ही संथ गतीने सुरू झाली . मात्र या वर्षात मनसेने कामात चांगलीच भरारी घेतली आहे.लॉक डाउन काळात ही राज ठाकरेनी सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवत सर्वसामान्यांचा मनावर छाप पाडली. त्यातच आता पुढे महापालिकेच्या आगामी निवडणूका आहेत.
या दृष्टीने मनसेने चांगलीच घोडदौड सुरू केली आहे. राज्यात आगामी नवी मुंबई, औरंगाबाद ,कल्याण महापालिका निवडणुकीसाठी मनसेने समिती स्थापन केल्या आहेत. त्यानुसार त्यांचं कामकाज चालणार आहे. पण राज ठाकरे ही या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहरात दौरे करणार आहेत. ह्याच दौऱ्याचा भाग म्हणून आज राज ठाकरे हे गेल्या काही वर्षात ज्या सुनावणीला कोर्टात गेले न्हवते. त्या कोर्टाच्या तारखेला आज गेले. त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात शक्तिप्रदर्शन कार्यकर्त्यांनी केले, हीच त्यांची आगामी निवडणुकीची खेळी आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अनेक वेळा समन्स पाठवूनही राज ठाकरे उपस्थित न राहिल्याने कोर्टाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले होते. त्यामुळे आज राज ठाकरे स्वत: कोर्टात हजर राहणार होते . यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली . राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरात बॅनरबाजी देखील करण्यात आली होती. चार ते पाच हजार कार्यकर्ते यावेळी कोर्टाच्या आवारात उपस्थित होते. नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार असल्याने मनसेला वातावरण निर्मिती करण्यासाठी हीच संधी राज ठाकरेंनी साधून घेतली.