तीन दिवसात 'फणसाड अभयारण्या'तून पक्ष्यांच्या १९० प्रजातींची नोंद

04 Feb 2021 15:37:25

bird _1  H x W:


शास्त्रीय गणनेतून बेडूकमुखी सारख्या दुर्मीळ प्रजातींची नोंद


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रायगड जिल्ह्यातील 'फणसाड वन्यजीव अभयारण्या'त पार पडलेल्या तीन दिवसीय पक्षी गणनेच्या उपक्रमामधून पक्ष्यांच्या १९० प्रजातींची नोंद करण्यात आली. अभयारण्यात प्रथमच शास्त्रोक्त पद्धतीने पक्षी गणना पार पडली. या गणनेमधून पक्ष्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजातींसह काही पक्ष्यांची प्रथमच अभयारण्यातून नोंद करण्यात आली आहे.
 
 
 
महाराष्ट्र वन विभाग आणि 'ग्रीन वर्क ट्रस्ट'च्या संयुक्त विद्यमाने 'फणसाड अभयारण्या'मध्ये २९,३० आणि ३१ जानेवारी रोजी पक्षी गणनेचे आयोजन करण्यात आले होते. लाईन ट्रान्सेक्ट आणि पाॅईंट काउंट या शास्त्रीय पद्धतीने ही पक्षी गणना पार पडली. या गणनेसाठी देशभरातील १३० लोकांनी नोंदणी केली होती. मात्र, त्यामधील ४१ लोकांना निवडून त्यांचे ११ गटांमध्ये विभाजन करण्यात आले. या प्रत्येक गटामध्ये १ पक्षीतज्ज्ञ, १ छायाचित्रकार, ग्रीन वर्क्स ट्रस्टचा स्वयंसेवक आणि एका वनरक्षकाचा समावेश होता. या ११ गटातील लोकांनी 'फणसाड अभयारण्या'तील सर्व अधिवासांमध्ये पक्षीगणना केली. त्यासाठी अभयारण्याच्या ५२ चौ.किमी क्षेत्रात एकूण १७ लाईन ट्रान्सेक्ट आणि १ पाॅईंट काउंटचा वापर करण्यात आला.
 
 
bird _1  H x W:
 


पक्षीगणनेच्या माध्यमातून तीन दिवसांमध्ये १९० प्रजातींची नोंद करण्यात आली. यामध्ये माशीमार-खाटीक, बेडूकमुखी, कोतवाल कोकीळ, निळ्या चष्म्याचा मुंगश्या, टिकेलचा कस्तुर, मासेमार घुबड, तपकिरी वन घुबड, चट्टेरी वन घुबड यांसारख्या दुर्मीळ पक्ष्यांची नोंद झाली. तर मलबारी कवड्या धनेश, पांढऱ्या पोटाची निळी माशीमार, काळ्या गळ्याची मनोली, निलगिरी रानपारवा यांसारख्या प्रदेशनिष्ठ प्रजाती नोंदवण्यात आल्या. याशिवाय रंगीत तुतारी, कालव फोड्या, ब्लिथची तीरचिमणी, सामान्य कस्तुर या प्रजातींची नोंद 'फणसाड अभ्यारण्या'त प्रथमच झाली. पक्ष्यांव्यतिरिक्त ५० प्रजातीची फुलपाखरे, १८ प्रजातींचे सरपटणारे प्राणी, १० प्रजातींचे उभयचर, ४ प्रजातींचे कोळी आणि २३ प्रजातींच्या सस्तन प्राण्यांची नोंद देखील करण्यात आली.
 
 
 
गणनेदरम्यान झालेल्या पक्ष्यांच्या नोंदींची पडताळणी तज्ज्ञ व्यक्तींकडून केल्यानंतरच त्यांना मंजूरी देण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे हा संपूर्ण उपक्रम पक्षीनिरीक्षणाच्या कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर पद्धती (जशा की, पक्ष्यांच्या ध्वनिमुद्रित आवाजाचे प्रक्षेपण करणे) न वापरता पार पडला. या कार्यक्रमाची सांगता ३१ जानेवारी रोजी वन्यजीव विभाग, ठाण्याचे उपवनसंरक्षक डाॅ. भानुदास पिंगळे, सहाय्यक वनसंरक्षक कुपते, वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले आणि 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट'चे निखिल भोपळे यांच्या उपस्थितीत सहभागींना प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आली. अशा प्रकारचा पक्षीगणनेचा कार्यक्रम वर्षातील तीन हंगामात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0