'शरजीलला अटक करा' ; भाजप नेत्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन

03 Feb 2021 15:15:46

bjp pune_1  H x



पुणे :
हिंदू धर्मियांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शरजील उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी करत पुण्यातील भाजप नेत्यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. शरजीलच्या अटकेच्या मागणीसाठी भाजप शहराध्यक्ष आमदार जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली.सडक्या मेंदूचा, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा वादग्रस्त विद्यार्थी शरजील उस्मानी याच्यावर कलम १२४ (अ) कलमानुसार गुन्हा दाखल करुन अटक करावी आणि संयोजकांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी आज शिष्टमंडळाने अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन दिलं.



मंगळवारी एल्गार परिषदेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शरजील उस्मानी नावाचा कोणीतरी सडक्या डोक्याचा व्यक्ती एल्गार परिषदेत हिंदूविरोधी वक्तव्य करतो. त्यानंतरही राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही. राज्यात मोगलाई आली आहे का, हिंदू रस्त्यावर पडलेत का, असा सवाल त्यांनी केला होता. फडणवीसांच्या आक्रमक भूमिकेनंतर पुण्यातील भाजप नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.एल्गार परिषद ही समाजात तेढ पसरवण्यासाठी आणि आग ओकण्यासाठीच आयोजित केली जाते. याचा अनुभव असूनही सरकारने एल्गार परिषद आयोजित करण्यास परवानगी दिलीच का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही सरकारची मिलीभगत आहे का, अशी शंका उत्पन्न होते. मात्र, सरकारने शरजील उस्मानीविरोधात कारवाई केलीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले.



कोणत्याही परिस्थितीत हिंदूविरोधी वक्तव्ये करणाऱ्या शरजील उस्मानीला ताबडतोब अटक करण्याची मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे पुणे शहराध्यक्ष आमदार जगदीश मुळीक यांनी केली आहे. आज (बुधवार)त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष श्री. जगदीशजी मुळीक, उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंगडे, माजी खासदार प्रदीपजी रावत, आमदार भीमराव जी तापकीर, आमदार सौ. मुक्ताताई टिळक, आमदार सिद्धार्थ जी शिरोळे, शहर सरचिटणीस गणेश घोष, दत्ताभाऊ खाडे, राजेश येनपुरे,संदीप लोणकर, दीपक नागपूरे, भाजयुमो प्रदेश चिटणीस आणि या प्रकरणी फिर्यादी असलेले प्रदीप गावडे, भाजयुमो शहराध्यक्ष बापू मानकर यांच्यासह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0