प्रताप सरनाईक यांना ठोठावलेला ११ कोटींचा दंड २५ लाखांवर

03 Feb 2021 10:37:31

niranjan davkhare and pra

ठाणे महापालिकेबाहेर भाजपचे ठिय्या आंदोलन

ठाणे: शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी उभारलेल्या ठाण्यातील विहंग गार्डन येथील बेकायदा बांधकामप्रकरणी ठाणे महापालिकेने ठोठावलेला ११ कोटी रुपयांचा दंड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ २५ लाखांवर आणला असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या घटनेचा निषेध करीत आ. प्रताप सरनाईक यांच्या अटकेच्या मागणीसाठी किरीट सोमय्या, भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दि. २ फेब्रुवारी रोजी ठाणे महापालिकेबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
 
 
 
 
आ. प्रताप सरनाईक यांच्या ‘विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्स’ने ठाण्यात उभारलेल्या ‘विहंग गार्डन’ येथील ‘बी-१’ व ‘बी-२’ या इमारतींना वापर परवाना (ओसी) मिळालेले नाही. या इमारतींमधील ९ ते १३ मजले अनधिकृत असून, महापालिकेने २०१२ मध्ये ते पाडण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणी महापालिकेने ठोठावलेल्या दंडाची रक्कम ११ कोटी रुपयांपर्यंत होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या अर्जानंतर दंडाची ११ कोटींची रक्कम केवळ २५ लाख रुपये करण्यात आली, असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात प्रताप सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेच्या मागणीसाठी भाजपचे शिष्टमंडळ महापालिकेत आले होते. त्यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेण्याआधी मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.
 
 
 
 
या आंदोलनातून प्रताप सरनाईक यांच्या अटकेच्या मागणीबरोबरच ११ कोटी रुपयांच्या वसुलीची मागणी करण्यात आली. या आंदोलनात किरीट सोमय्या, निरंजन डावखरे यांच्याबरोबरच महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नारायण पवार, मनोहर डुंबरे, अर्चना मणेरा, सीताराम राणे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नौपाडा पोलीस ठाण्यात नेले.
 
 
 
 
सर्वसामान्यांना करमाफी नाही, बिल्डरवर कृपाछत्र : निरंजन डावखरे
“ठाणे शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन सत्ताधारी शिवसेनेने निवडणुकीवेळी वचननाम्यात दिले होते. मात्र, ते आता पूर्ण करण्यास टाळाटाळ केली जात आहे. परंतु, राजकीय वरदहस्त असलेल्या आ. प्रताप सरनाईक यांना दंडात माफी दिली गेली. हाच न्याय आणखी काही बिल्डरांना लावला आहे का? सामान्यांना वार्‍यावर सोडून बिल्डरांवर कृपाछत्र का,” असा सवाल भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला आहे.



Powered By Sangraha 9.0