मार्च आणि एप्रिल ‘निवडणूक महिने’; मे महिन्यात निकाल

    दिनांक  27-Feb-2021 12:52:22
|
west bengal_1  


५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा

पश्चिम बंगालमध्ये ८, आसाममध्ये ३, तर तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरीमध्ये प्रत्येकी एक टप्पा


नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्च आणि एप्रिल महिन्यात होणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा शुक्रवारी केली. पश्चिम बंगालमध्ये आठ, तर आसाममध्ये तीन टप्प्यांत; तर तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये एका टप्प्यात मतदान होईल. सर्व निवडणुकांचे निकाल दि. २ मे रोजी लागतील. त्यामुळे आता पुढील तीन महिने हे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.


निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पाच राज्यांच्या एकूण ८२४ मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. त्यामध्ये १८.६ कोटी मतदार २.७ लाख मतदान केंद्रांमध्ये आपला मताधिकार बजाविणार आहेत. केवळ प. बंगालमध्येच एक लाखांहून अधिक मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था आणि कोरोना संसर्गाविषयी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव अरोरा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.


पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान
 
संपूर्ण देशाचे लक्ष सध्या प. बंगाल विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. राज्यात सत्ताबदल करण्यास भाजप सज्ज आहे, तर सत्ता राखण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्याची तयारी तृणमूल काँग्रेसने केली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या होणार्‍या हत्या आणि ममता बॅनर्जी सरकारची भूमिका यामुळे बंगाल निवडणूक म्हणजे ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ ठरणार आहे.
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ३० मतदारसंघांसाठी दि. २७ मार्च रोजी मतदान होणार आहे, तर दुसर्‍या टप्प्यात ३० मतदारसंघांतील मतदार दि. १ एप्रिल रोजी मतदान करतील. तिसर्‍या टप्प्यांत ३१ मतदारसंघांमध्ये दि. ६ एप्रिल रोजी, चौथ्या टप्प्यात ४४ मतदारसंघांसाठी दि. १० एप्रिल आणि पाचव्या टप्प्यांत ४५ मतदारसंघांमध्ये दि. १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यात ४३ मतदारसंघात दि. २२ एप्रिल रोजी, सातव्या टप्प्यात 36 मतदारसंघात दि. २६ एप्रिल रोजी आणि अखेरच्या आठव्या टप्प्यात ३५ मतदारसंघांमध्ये दि. २९ एप्रिल रोजी मतदान होईल.आसाममध्ये तीन टप्पे
 
ईशान्य भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या आसाममध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. सध्या तेथे भाजप सत्तेत आहे. राज्यात सत्ताबदल करण्याचा काँग्रेसचा क्षीण प्रयत्न सध्या दिसून येत आहे. राज्यातील फुटीरतावादाची समस्या निकाली काढण्यात भाजपला यश आले असून पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आसाममध्ये पहिल्या टप्प्यात ४७ मतदारसंघामध्ये २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात ३९ मतदारसंघांमध्ये दि. १ एप्रिल रोजी तर अखेरच्या तिसर्‍या टप्प्यात ३० मतदारसंघामध्ये ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान
 
दक्षिणेतील तामिळनाडूमध्ये ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सध्या भाजप तेथे अद्रमुकसोबत युतीमध्ये आहे. मात्र, यावेळी भाजपने तेथे आपली ताकद लावली आहे. त्यामुळे राज्यात जनाधार निर्माण करण्यासाठी भाजप या निवडणुकीकडे पाहत आहे. कम्युनिस्ट सरकारच्या हिंसाचाराचा सामना करीत केरळमध्ये भाजपने आपला जनाधार निर्माण केला आहे. कम्युनिस्ट पिनरायी विजयन सरकारचा सोने घोटाळा हा मुद्दा केवळ भाजपनेच राज्यात लावून धरला आहे. त्यामुळे राज्यातील मतदारही भाजपचा पर्याय म्हणून विचार करीत असल्याचे चित्र आहे. केरळमध्ये एकाच टप्प्यात दि. ६ एप्रिल रोजीच मतदान होणार आहे. पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातही दि. ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दक्षिण भारतात एकमेव प्रदेशात सत्ता असणार्‍या काँग्रेसचे सरकार नुकतेच कोसळले आहे. त्यामुळे भाजप दक्षिणेतील या प्रदेशातही सत्ता काबिज करण्याची तयारी करीत आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.