दिल्ली दंगलीची वर्षपूर्ती..

26 Feb 2021 16:04:59

dilli riots_1  


वाचा, अंकित शर्माच्या कुटुंबाचं पुढे काय झालं?

ईशान्य दिल्लीच्या ठसठसणाऱ्या काही आठवणींविषयी..


नवी दिल्ली: दंगलीच्या आगीत जळून झालेल्या ईशान्य दिल्लीतल्या घटनेची आज वर्षपूर्ती. पण अजूनही त्याच्या खुणा लोकांच्या मनातून आणि जीवनातून पुसल्या गेलेल्या नाहीत. एवढंच नव्हे तर या भागातील इमारती व रस्त्यांवरही त्या खुणा अगदी आजही दिसून येतात. भजनपुरा चौकाच्या मध्यभागी दंगलींनी जाळून टाकलेली समाधीचे काही अवशेष आजही अगदी लख्ख आहेत. दंगल संपल्यानंतर दुरुस्तीचे काम लवकरच सुरू झालं होतं, परंतु स्थानिक प्रशासनाने मात्र थोड्याच कालावधीतच थांबवले. हे कशामुळे घडले याचे अचूक उत्तर कोणाकडेही नाही.
 
 
 
 
गेल्या वर्षी २ फेब्रुवारीपासून दिल्लीत तणाव सुरू झाला होता आणि पुढील सात दिवस उत्तर-पूर्व बर्‍याच भागात हिंसाचार सुरू होता. आता दंगलीला एक वर्ष उलटले आहे, परंतु या भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन अजूनही रुळावर येऊ शकलेले नाही. भजनपुरा चौकात 'आझाद चिकन कॉर्नर' असायचा. त्याचा मालक मोहम्मद आझाद म्हणतो, "माझ्या दुकानात एकेकाळी दहा मुलं काम करायची. आज अशी परिस्थिती आली आहे की मी पैसे घेऊन काही प्रमाणात जगतो आहे. माझे संपूर्ण दुकानाची आणि घराची राखरांगोळी झाली. त्या दंगलीत एक कार आणि दुचाकीही जळाली. तब्बल ४० लाखांचे नुकसान झाले, परंतु सरकारकडून केवळ दीड लाखांची नुकसानभरपाई मिळाली. एक वर्ष उलटून गेले आहे, मी आजपर्यंत माझे दुकान पुन्हा सुरु करू शकलो नाही."
 
 
 
 
मोहम्मद आझाद यांच्या दुकानातून करावल नगरकडे जात असताना अंकित शर्माचे घर दिसते. गेल्या वर्षी झालेल्या दंगलीत अंकितच्या मृत्यूची सर्वाधिक चर्चा होती. आयबीमध्ये काम करणारा अंकित शर्मा याचा मृतदेह २६ फेब्रुवारी रोजी एका नाल्यात सापडला. त्याच्या मृत्यूचा संदर्भ देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले की, 'अंकितच्या शरीरावर चारशे जखमा झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकितवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता आणि त्याच्या शरीरावर एकूण ५१ जखमा होत्या. अंकित आपल्या कुटुंबासमवेत खजुरी खास येथे राहत होता. अंकितचा मोठा भाऊ अंकुर शर्मा म्हणतो, “तिथे राहणे सोपे नव्हते. नाल्यात मृतदेहाचा अनेक वेळा त्यांनी तपास केला; त्या घाणेरड्या नाल्यातून भावाचा मृतदेह बाहेर काढला, तेव्हा तेच भयानक दृश्य आठवते.
 
 
 
 
  
दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील व्हिडिओ, लोकांच्या फोनवरून सापडलेल्या घटनेची छायाचित्रे, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि फोन लोकेशनच्या आधारे अटक केलेल्यांची ओळख पटली आहे. दंगलीमागील मोठ्या कट रचल्याचा तपास करण्यासाठी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून विशेष कक्षामार्फत चौकशी केली जात आहे. मागील वर्षी भयानक दंगली झालेल्या ईशान्य दिल्लीचे हे क्षेत्र हे देशातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे क्षेत्र आहे. दंगलीमुळे बरीच लोक आता हे ठिकाण सोडून गेले आहेत.




Powered By Sangraha 9.0