संघातून बाहेर पडताच पृथ्वीचे शानदार द्विशतक

    25-Feb-2021
Total Views | 73

Prithvi Shaw_1  
 
मुंबई : भारतीय क्रिकेट संघात समावेश न झालेल्या पृथ्वी शॉने नाबाद द्विशतक करत स्वतःचे कौशल्य सिद्ध केले. विजय हजारे करंडक स्पर्धेमध्ये पृथ्वीने पुदुच्चेरीविरोधात हे नाबाद द्विशतक झळकावले आहे. न्यूझीलंड दौऱ्यात पृथ्वी शॉची निवड भारतीय संघात करण्यात आली होती. मात्र, तिथे त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतरही ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्येही शॉला संधी देण्यात आली होती. मात्र तेव्हाही त्याने खराब कामगिरी करत निराशाच केली. या निकषावर इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला नाही.
 
 
संघाबाहेर गेल्यानंतर पृथ्वी शॉने आक्रमक फलंदाजी करून नाबाद द्विशतक झळकावत निवड समितीला प्रत्त्युत्तर दिले. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये गुरुवारी मुंबईचा सामना पुदुच्चेरीविरोधात सुरु आहे. यात पुदुच्चेरीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव या दोघांनी पुदुच्चेरीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. पुदुच्चेरी संघाने तब्बल ९ गोलंदाजांचा वापर केला. पण त्यांना पृथ्वी शॉला बाद करण्यात अपयश आले.
 
 
पृथ्वी शॉने १५२ चेंडूचा सामना करताना नाबाद २२७ धावांची खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने ३१ चौकार ५ षटकार लगावले. शॉने १४२व्या चेंडूवर आपले द्विशतक पूर्ण केले. तर सुर्यकुमार यादवने अवघ्या ५८ चेंडूत १३३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २२ चौकार आणि ४ षटकार लगावले. पृथ्वी आणि सुर्यकुमार यादव यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने ५० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ४५७ धावांचा डोंगर उभा केला.
 
 
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पृथ्वी शॉ चौथा भारतीय
 
 
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ हा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. इतकेच नव्हे तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्याही आता पृथ्वीच्या नावावर झाली आहे. पृथ्वीने केरळच्या संजूचा विक्रम मोडीत काढला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121