
केरळमध्ये इस्लामी कट्टरतावाद्यांनी केली संघ स्वयंसेवकाची हत्या
नवी दिल्ली, पार्थ कपोले : केरळमध्ये सत्तेत असलेला कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांनी मोकळे रान दिलेल्या पीएफआय या मुस्लिम कट्टरतावादी संघटनेच्या सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या राजकीय पक्षाच्या गुंडांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची अतिशय निर्घृण हत्या केली आहे. दरम्यान, एरवी रा. स्व. संघ आणि भाजपवर फॅसिस्ट असल्याचा आरोप करणारी पुरोगामी मंडळींसाठी हिंदुत्ववाद्यांची हत्या ही हत्या नसतेच, अशी प्रतिक्रिया राज्यसभा सदस्य आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी 'दैनिक मुंबई तरुण भारत'सोबत बोलताना व्यक्त केली आहे.
पीएफआय ही एक मुस्लिम कट्टरतावादी संघटना आहे. सीएएविरोधी दंगलींमध्येही या संघटनेचा सहभाग होता. केरळमध्ये एसडीपीआय हा त्यांचा राजकीय पक्ष कार्यरत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुंदरन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रारंभ केलेल्या विजय यात्रेचा निषेध म्हणून एसडीपीआयने राज्यव्यापी निषेध आंदोलन केले. त्यांनी काढलेल्या मोर्चामध्ये प्रक्षोभक घोषणाबाजी करण्यात आली. त्याचा विरोध रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आणि इतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला असता. एसडीपीआयच्या गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये रा. स्व. संघाच्या वायावर येथील शाखेचे मुख्यशिक्षक नंदू उर्फ राहुल कृष्णा यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला चढविण्यात आला. या हल्ल्यात २२ वर्षांच्या नंदू यांचे निधन झाले. याप्रकरणी आतापर्यंत अब्दुल खदर, रियास, निशाद, अनस, अन्सिल आणि सुनील या एसडीपीआयच्या गुंडांना अटक करण्या आली आहे.
केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची हत्या करणे हा कम्युनिस्ट राजवटीचा आवडता छंद आहे. मात्र, तरीदेखील अतिशय आत्मविश्वासाने काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा धसका त्यांनी घेतला आहे. त्यामुळे डावे पक्ष आणि त्यांच्या आशिर्वादावर जगणाऱ्या पीएफआय – एसडीपीआय यांनी पुन्हा एकदा संघ स्वयंसेवकाची हत्या घडविली आहे. यामुळे कम्युनिस्ट राजवटीमध्ये हिंदू सुरक्षित राहू शकत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

हिंसेच्या आधारावरच कम्युनिस्टांचे राजकारण – डॉ. विनय सहस्रबुद्दे, राज्यसभा सदस्य