संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार का ? संजय राऊत म्हणतात...

24 Feb 2021 12:11:51

sanjay raut _1  



मुंबई :
वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या समर्थकांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर गर्दी केली होती. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर बेपत्ता झालेले वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी सर्वांसमोर येत पोहरादेवी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. यावेळी राठोड समर्थकांनी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले. त्यामुळे आता राज्यातील जनतेला कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर कारवाई करणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. याच प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पोहोरादेवी येथे गर्दी प्रकरणी कारवाई करणारच असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.


माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले. तर संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावर मुख्यमंत्री आणि शरद पवार नाराज आहेत का, याबाबत बोलण्यास मात्र राऊत यांनी नकार दिला. संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले.
Powered By Sangraha 9.0