‘मी जबाबदार’ नाहीच!

24 Feb 2021 12:12:58
sanjay rathod_1 &nbs

वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांकडून ‘कोरोना’ नियम पायदळी


हजारोंच्या संख्येने झुंबड; ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांची ऐशीतैशी

मुंबई: पुण्यातील २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधकांकडून आरोप झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून गायब असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे मंगळवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. पोहरादेवीचे दर्शन घेण्यासाठी पोहरागड येथे जाताना राठोड यांनी मंगळवारी हजारो कार्यकर्त्यांसमवेत शक्तिप्रदर्शन केले.
 
 
 
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत ‘सोशल डिस्टन्सिंग’सह कोरोनाबाबतचे अनेक नियम पायदळी तुडवले. विशेष म्हणजे, कोरोनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केल्यानंतर अगदी दुसर्‍याच दिवशी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी याचा फज्जा उडविल्याचे दिसून आले. त्यामुळे मंत्री आणि त्यांच्या समर्थकांवर काय कारवाई होणार, असा प्रश्न विरोधक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
 
 
पूजा चव्हाण प्रकरणी विविध समाजमाध्यमांमधून गंभीर आरोप झाल्यानंतर असलेले संजय राठोड हे १५ दिवसानंतर सर्वांससमोर आले. पोहरागड येथे मंगळवारी ते पोहरादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले.
 
 
‘मला आरोपीच्या पिंजर्‍यामध्ये उभे करू नका’
“माझ्यावर होणारे आरोप हे निंदनीय राजकारण आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यातून सगळे बाहेर येईल. मात्र, मला आरोपीच्या पिंजर्‍यामध्ये उभे करू नका. पूजा चव्हाणच्या मृत्यूमुळे संपूर्ण बंजारा समाजाला दुःख झाले आहे. आम्ही चव्हाण कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. मात्र, या मृत्यूवरून सुरू असलेले राजकारण निंदनीय आहे. मी ओबीसींचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा घाणेरडा प्रयत्न होत आहेत. याविषयी विविध समाजमाध्यमातून पसरणार्‍या बाबी तथ्यहीन आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल,” असे स्पष्टीकरण मंगळवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिले.
  
Powered By Sangraha 9.0