मराठी भाषा दिनानिमित्त विधानमंडळात ऑनलाईन परिसंवादांचे आयोजन

24 Feb 2021 16:57:48

marathi bhasha din_1 



वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी विभाग असणार आयोजक

मुंबई: मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून “मराठी भाषेला अभिजात दर्जा” व “आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी साहित्य प्रसार आणि प्रचार” या विषयांवर परिसंवादांचे आयोजन केले आहे. हे वेबिनार वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई आणि मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ फेब्रुवारी, २०२१ रोजी दुपारी २.३० ते ५.०० यावेळेत आयोजित केले आहे.
 
 
 
 
परिसंवादातील “मराठी भाषेला अभिजात दर्जा” या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, डॉ. विजयाताई वाड, प्रा. हरी नरके, माजी विधानपरिषद सदस्य हेमंत टकले, प्रा. मिलिंद जोशी आपले विचार व्यक्त करतील. तर “आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार” या विषयावरील परिसंवादात विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, मंदार जोगळेकर, प्रसाद मिरासदार, आनंद अवधानी, पत्रकार रश्मी पुराणिक वक्ते म्हणून सहभागी होतील. तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने करणार आहेत.
 
 
 
 
या वेबिनार प्रणाली परिसंवादात दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, मराठी भाषाप्रेमी मान्यवर, पत्रकार, महाविद्यालयीन प्राध्यापक-विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आणि वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी दिली.
 
 
 
 
 
या परिसंवादात श्रोते म्हणून सहभागी होण्यासाठी लिंक मिळवण्यासाठी संपर्क क्रमांक :-  
८६९१८७७७६७ - अजय सर्वणकर
९९२०४८३७७७ - राजेंद्र संखे




Powered By Sangraha 9.0