पोहरागडावर कोविड नियमांचे तीनतेरा; राठोड समर्थकांकडून धिंगाणा

23 Feb 2021 12:23:47
sanjay rathod _1 &nb


मुंबई -
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले वनमंत्री संजय राठोड आज पोहरागडावर दर्शनाला पोहोचले आहेत. यावेळी राठोड सर्मथकांनी कोविड नियम धुडकावल्याचे चित्र दिसत आहे. पोहारदेवी मंदिर परिसरात सर्मथकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी न करण्याचा केलेल्या आवाहनाला हरताळ फासला आहे.
 
 
गेल्या पंधरा दिवसांपासून गायब असलेले वनमंत्री संजय राठोड आज आपल्या यवतमाळच्या घरी पोहोचले. काही दिवसांपूर्वी पुण्यात पूजा चव्हाण नामक मुलीने आत्महत्या केली होती. पूजा ही राठोड यांची कार्यकर्ती होती. पूजाच्या आत्महत्येनंतर काही ऑडिओ क्लिक व्हायरल झाल्या होत्या. यामधील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावला. आत्महत्येनंतर संजय राठोड गायब होते. आज पंधरा दिवसानंतर ते आपल्या यवतमाळच्या घरी पोहोचले. तिथून ते बंजारा समाजाचे आराध्यदैवत पोहरादेवीच्या दर्शनाला रवाना झाला आहेत.
 
 
 
मात्र, पोहरादेवी परिसरात राठोड सर्मथकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. वाशिम जिल्हा पोलिसांनी मंदिर प्रशासनाला केवळ ५० माणसांसाठीच परवानगी दिली आहे. परंतु, प्रत्यक्षात याठिकाणी हजारो कार्यकर्ते जमले आहेत. त्यामुळे राज्यातील कोविडच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. अशा परिस्थिती राठोड यांच्या सर्मथकांकडून मुख्यमंत्र्यांच्या आवाहानाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0