आरोग्य क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होण्यास देश पूर्ण सज्ज

23 Feb 2021 22:23:54

PM MODI _1  H x
 
 


नवी दिल्ली : “यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सेवा पुरवण्याप्रति सरकारची वचनबद्धता अधोरेखित झाले आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी मंगळवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी केले.
 
 
आरोग्यक्षेत्राशी संबंधित एका ‘वेबिनार’ला मोदी यांनी मंगळवारी संबोधित केले. ते म्हणाले, “कोरोनाने आपल्याला हा धडा शिकवला की आपल्याला आज केवळ महामारीविरुद्ध लढायचे नाही, तर भविष्यात अशी परिस्थिती उद्भवली तर त्यासाठीही देशाला सज्ज ठेवले पाहिजे. म्हणूनच, आरोग्याशी संबंधित प्रत्येक क्षेत्राचे बळकटीकरण करणे तितकेच आवश्यक आहे.
 
 
कोरोना महामारीच्या काळात तशी तयारी भारताने सुरू केला आहे. त्यामुळे आगामी काळात वैद्यकीय उपकरणापासून ते औषधांपर्यंत, व्हेंटिलेटरपासून लसीपर्यंत, वैज्ञानिक संशोधनापासून देखरेखीच्या पायाभूत सुविधांपर्यंत, डॉक्टरांपासून साथीच्या रोगांच्या तज्ञांपर्यंत सर्व गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही आरोग्यविषयक आपत्तीसाठी देश सुसज्ज असेल. ‘पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजने’मागे हीच प्रेरणा आहे. या योजनेंतर्गत देशातच संशोधनापासून चाचणी व उपचारापर्यंत आधुनिक परिसंस्था विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
 
 
अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “देशातील औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन दिले जाते. त्याचप्रमाणे औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यासाठी ‘मेगा पार्क’ उभारले जात आहेत. देशाला स्वास्थ्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये, गंभीर आजारांसाठी सेवा, आरोग्य देखरेखीसाठी पायाभूत सुविधा, आधुनिक प्रयोगशाळा आणि ‘टेलिमेडिसिन’ची आवश्यकता आहे.
 
 
त्यांनी प्रत्येक स्तरावर कार्य करण्याच्या आणि प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर भर दिला. आपण हे सुनिश्चित करायला हवे की, देशातील लोक मग ते गरीब असतील. दुर्गम भागात राहणारे असले तरीही त्यांना उत्तम उपचार मिळतील. यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि देशातील स्थानिक संस्था यांनी एकत्र येऊन उत्तम परिणाम साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Powered By Sangraha 9.0