"चव्हाण परिवाराच्या दुःखात सहभागी, सत्य समोर येईलच"

    दिनांक  23-Feb-2021 14:40:12
|

Sanjay Rathod_1 &nbs
 
 
 
वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर अज्ञातवासात असलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे मंगळवारी पहिल्यांदा प्रसारमाध्यमांसमोर आले. पोहरादेवीचे दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, "पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुखी आहे. या प्रकरणात राजकारण केले जात आहे. पूजा चव्हाण ही आमच्या समाजातल्या मुलीचा मृत्यू झाला. याचे आम्हाला दु:ख आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातून सत्य बाहेर येईलच, फक्त आपण विश्वास ठेवावा."
 
 
आज सगळे नियम धाब्यावर बसवत वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचे शक्तिप्रदर्शन करत दर्शन घेतले. यावेळी सोशल डिस्टनसिंगचा देखील फज्जा उडालेला दिसला. अनेक दिवसांपासून पूजा चव्हाण प्रकरणी गंभीर आरोप होत असतानाही राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. विरोधातील सगळ्याच पक्षांनी त्यांचा विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांचा चौकशीची मागणी केली. यानंतर आज अखेर राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाणच्या मृत्युवर संपूर्ण बंजारा समाजाला दुःख झाले आहे. आम्ही चव्हाण कुटुंबीायंच्या दुःखात सहभागी आहोत. मात्र या मृत्युवरून सुरू असलेले राजकारण निंदनीय असल्याचे ते म्हणाले. मी ओबीसींचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझे राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा घाणेरडा प्रयत्न या प्रकरणात झाल्याचे आपण पाहिले आहे. याविषयी सोशल मीडियातून पसरणाऱ्या बाबी तथ्यहीन आहे असे राठोड म्हणाले.
 
 
तसेच पुढे राठोड म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल असे ते म्हणाले. माझी, माझ्या कुटुंबाची, माझ्या समाजाची बदनामी करू नका ही विनंती करतो. माझ्या समाजाचे माझ्यावर प्रेम आहे. अनेक लोक मला भेटतात. ते माझ्यासोबत फोटो काढतात. कृपया मला राँगबॉक्समध्ये उभे करू नका असें म्हटले. तत्पूर्वी संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी राठोड यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्यात जमाव बंदी लागू आहे. मात्र राठोड यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात येथे दाखल झाले. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
 
सकाळी ते यवतमाळ येथील निवासस्थानातून पोहरागड देवस्थानाकडे जाण्याकरिता निघाले होते. ते रामरावबापू महाराज सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन आणि महंतांसोबत चर्चाही करणार असल्याची माहिती यावेळी समोर आली होती. त्यांच्या या ताफ्यामध्ये केवळ एक खासगी वाहन आणि एक शासकीय वाहनाचाही समावेश होता.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.