अनंत तरे यांचे शिवसेनेला सोयरसुतक नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2021
Total Views |

anant tare _1  


ठाणे : “ ‘त्रिविक्रमी महापौर’ अशी महाराष्ट्रात ख्याती पावलेल्या शिवसेना उपनेते अनंत तरे यांचा अवघ्या काही तासांतच शिवसेनेला विसर पडला. अनंत तरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारची स्थायी समितीची सभा पूर्णपणे तहकूब करण्याची भाजपची मागणी शिवसेनेने फेटाळली. अनंत तरे यांचे शिवसेनेला सोयरसुतक उरले नाही. हीच का बाळासाहेबांची शिवसेना ?” अशा शब्दांत भाजप सदस्य नगरसेवक कृष्णा पाटील यांनी खेद व्यक्त केला आहे.
 
 
शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार अनंत तरे यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. मंगळवारी सायंकाळी दुःखदवातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. अनंत तरे यांनी ठाण्याचे तीन वर्षे महापौरपद भूषविल्याने ‘त्रिविक्रमी महापौर’ असा त्यांचा महाराष्ट्रभर लौकिक होता. महापालिकेतील संकेतानुसार माजी महापौर वा तत्सम मोठ्या नेत्याचे निधन झाल्यानंतर स्थायी समिती व महासभा तहकूब करण्याची पद्धत आहे.
 
 
 
त्यानुसार, अनंत तरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्थायी समितीची मंगळवारची सभा तहकूब करण्याची मागणी भाजपचे स्थायी समिती सदस्य कृष्णा पाटील यांनी दूरध्वनीवरून केली. मात्र, शिवसेनेने फक्त अर्धा तास सभा तहकूब करत तोंडदेखली श्रद्धांजली अर्पण केली. त्यावर, स्थायी समिती सभा आजचा पूर्ण दिवस तहकूब करा, अशी मागणी भाजपचे सदस्य भरत चव्हाण यांनी सभागृहात केली. मात्र, सत्ताधारी शिवसेनेने न जुमानता सभा सुरू केल्याने भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. या संपूर्ण प्रकाराला भाजपचे सदस्य भरत चव्हाण व नम्रता कोळी यांनी आक्षेप घेतला. मात्र, शिवसेनेने त्यांचे आक्षेप फेटाळून लावले.
 
 
तसेच, अर्ध्या तासाची सभा तहकुबी योग्य असल्याचे स्पष्ट केले. एकेकाळी आपल्याला यश मिळवून देणार्‍या नेत्याचा शिवसेनेला आता विसर पडल्याची टीका यावेळी विरोधकांकडून करण्यात आली. श्रद्धांजलीपेक्षा शिवसेनेने आर्थिक मुद्द्याला प्राधान्य देत कार खरेदीची हौस फिटवून घेतली, अशीही टीका भाजपकडून करण्यात आली.
 
 
बाळासाहेबांची सेना राहिली नाही
“बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. सेनेच्या ठाण्यातील नेत्यांच्या स्वार्थी राजकारणानुसार हेच अभिप्रेत होते. पक्षाला यशाची शिखरे दाखवणार्‍या नेत्याबद्दल शिवसेनेला कसलेच सोयरसुतक राहिले नाही,” अशी खेदजनक टीका भाजप नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली.



@@AUTHORINFO_V1@@