'रेडिओ कॉलरिंग’मुळे वन्यप्राण्यांना त्रास होतो का ? वाचा...

    दिनांक  22-Feb-2021 11:39:33
|

 

wildlife _1  H


वन्यजीव संशोधनाच्या पद्धतींमध्ये आजभारत देश बराच पुढारलेला आहे
. अद्ययावत होणार्‍या तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होऊन वन्यजीव संशोधनामध्ये बदल होत आहेत. या बदलत्या संशोधन पद्धतींमधील एक पद्धत म्हणजे ’रेडिओ कॉलरिंग.’ त्याविषयी माहिती देणारे या आठवड्याचे ‘निसर्गज्ञान.’वन्यजीव संशोधनामधील तांत्रिक वाटा

 


गेल्या २० वर्षांमध्ये वन्यजीव संशोधन क्षेत्रातील माहिती संकलन पद्धतीमध्ये (डाटा कलेक्शन) आमूलाग्र बदल घडले आहेत. हे बदल प्रामुख्याने तंत्रज्ञानाची कास धरणारे आहेत. ‘कॅमेरा ट्रॅप’, ‘रेडिओ कॉलर’ या उपकरणांमुळे वन्यजीवांसंबंधी माहिती संकलनामध्ये विश्वासार्हता निर्माण झाली आहे. संकलित केलेल्या माहितीच्या आधारे ठोस आणि अस्सल निष्कर्ष काढणारी काही ‘सॉफ्टवेअर्स’ विकसित झाली आहेत. त्यामुळे निष्कर्ष काढण्याच्या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. भविष्यात संशोधनाकरिता ड्रोन, सेल्युलर नेटवर्क/वाय-फाय/आर्टिफिशियल इंटेलिजन्सी असलेल्या ’कॅमेरा ट्रॅप’चा वापर वाढेल. अशा उपकरणांमुळे वन्यजीव संशोधकांना माहितीचे संकलन करणे अधिक सुकर व सुलभ होणार आहे. शिवाय निष्कर्ष काढण्यामध्येही सुसूत्रता आणि विश्वासार्हता जपण्यास मदत मिळेल.
 कॉलरिंग

वन्यजीवांची ‘इकोलॉजी’, त्यांचा भ्रमणमार्ग आणि मानव-प्राणी सहसंबधाचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने ‘रेडिओ कॉलर’ पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. यामध्ये प्राण्याच्या गळ्यामध्ये ‘रेडिओ कॉलर’चा पट्टा बसवला जातो. हे रेडिओ कॉलर ’जीएसएम’ किंवा ’सॅटेलाईट’या संपर्क तंत्रज्ञानाच्या पद्धतीद्वारे कार्यान्वित असतात. यामाध्यमातून वन्यजीव संशोधकांना ‘रेडिओ कॉलर’ लावलेल्या प्राण्याचा ठावठिकाणा नेमकेपणाने समजतो आणि हालचालींचा मार्गही उलगडतो. वन्यजीव संशोधकांना बसल्या जागी ‘रेडिओ कॉलर’ लावलेल्या प्राण्याची माहिती जाणून घेण्यामध्ये ’जीएसएम’ किंवा ’सॅटलाईट कॉलर’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
 
 
wildlife _1  H
 

जीएसएम / सॅटेलाईट कॉलर

’दी ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन’ (जीएसएम) तंत्रज्ञानावर चालणारे ’जीएसएस कॉलर’ वन्यजीव संशोधनामध्ये वापरण्यात येते. अशा प्रकारच्या कॉलर या सर्वसामान्यपणे वापरल्या जाणार्‍या ’मोबाईल सेल्युलर नेटवर्क’च्या आधारे कार्यान्वित असतात. सेल्युलर नेटवर्कच्या माध्यमातून प्राण्याच्या नेमक्या ठिकाणाचे ’ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम लोकेशन’ म्हणजेच ’जीपीएस लोकेशन’ संशोधकांना मिळते.‘सॅटेलाईट कॉलर’ हे उपग्रहांशी जोडलेले असतात. ज्या कंपनीकडून हे कॉलर विकत घेतले जाते, त्या कंपनीचा उपग्रह अवकाशात असतो. अशा वेळी प्राण्याच्या नेमक्या ठिकाणाची माहिती थेट उपग्रहाकडे जाते. तिथून ही माहिती सर्व्हरला मिळते आणि त्या माध्यमातून ’जीपीएस’ लोकेशन संशोधकांपर्यंत पोहोचते.संशोधकाने आपल्या सोयीनुसार नेमलेल्या वेळेच्या अनुषंगाने कॉलर लावलेल्या प्राण्याविषयीची माहिती त्याच्यापर्यंत या तंत्रज्ञानाच्या आधारे मिळते.

 


मर्यादा

’जीएसएम’ आणि ’सॅटेलाईट कॉलर’बाबत काही मर्यादा आहेत. पहिली मर्यादा म्हणजे हे ‘कॉलर’ मिळवण्याची. भारतात अशा प्रकारच्या ‘कॉलर’ तयार केल्या जात नाहीत. त्यामुळे या ‘कॉलर’ परेदशांमधून आयात कराव्या लागतात. सोबतच या ‘कॉलर’च्या वापरासाठी ’भारतीय संचार मंत्रालया’ची परवानगी घ्यावी लागते. दुसरी मर्यादा म्हणजे ‘नेटवर्क’ची. दुर्गम जंगलामध्ये सर्वसामान्य ’मोबाईल सेल्युलर नेटवर्क’उपलब्ध नसते. त्यामुळे अशा परिसंस्थेमध्ये संशोधन करताना प्राण्याला ’जीएसएम कॉलर’ लावू शकत नाही. अशावेळी ’सॅटेलाईट कॉलर’च वापरणे आवश्यक असते. या कॉलरच्या किंमतीही लाखांच्या घरात असतात.


wildlife _1  H

प्राण्यांना त्रास होतो का ?

 

 
सामान्यपणे कॉलरची बांधणी वन्यजीवाचे आकारमान, वजन आणि शरीरशास्त्राचा अभ्यास करूनच केलेली असते. ‘कॉलर’चे वजन प्रजातींनुुरुप अवलंबून असते. सस्तन प्राण्यांचा विचार केल्यास ‘कॉलर’चे वजन प्राण्याच्या शरीराच्या वजनाच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी असते. उदा. रानकुत्र्यांना लावण्यात येणार्‍या ‘कॉलर’चे वजन ४५० ग्रॅमपेक्षा जास्त नसते.प्राण्याच्या गळ्याभोवती हा पट्टा लावताना विशेष काळजी घेतली जाते. प्राण्याला बेशुद्ध करून ‘कॉलर’चा पट्टा लावण्यात येतो. प्राण्याच्या वाढत्या वयाचा विचार करूनच ‘कॉलर’ त्याच्या गळ्यात बांधली जाते. त्यामुळे प्राण्याच्या गळ्याभोवती फास लागत नाही.काळानुरूप ‘रेडिओ कॉलरचा पट्टा झिजून वा संशोधकांनी लावलेल्या वेळेनुसार प्राण्याच्या गळ्यातून आपसुकच गळून पडतो. हे ‘कॉलर’ ‘रिमोट’च्या साहाय्याने प्राण्याच्या गळ्यातून काढता येतात. त्यामुळे प्राण्यास कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही.उदाहरण

 

२०१९ मध्ये टिपेश्वर ते ज्ञानगंगा अभयारण्य असा ३ हजार,०१७ किमींचा प्रवास केलेल्या ’सी-वन’ वाघाचा ऐतिहासिक संचारमार्ग ‘रेडिओ कॉलर’मुळेच उघड झाला होता.


दहा वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील माळशेज घाट ते मुंबईपर्यंततब्बल १२५ किमी प्रवास केलेल्या ‘आजोबा’ नामक बिबट्याचा प्रवासही ‘रेडिओ कॉलर’मुळेच समोर आला होता
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.