पश्चिम बंगाल - पंतप्रधानांच्या कार्यक्रमामधून ममता दीदींचा काढता पाय

    दिनांक  22-Feb-2021 14:55:06
|
west bengal _1  
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगले तापले आहे. यामध्येच आज हुगळीतील रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मात्र, या कार्यक्रमातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जींनी काढता पाय घेतला आहे.
 
 
पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीचे वारे वाहू लागल्यापासून अनेक राजकीय भूकंप आणि हालचालींना वेग आला आहे. आज सायकांळी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालामध्ये येणार आहे. गेल्या महिन्याभरातील तिसऱ्यांदा मोदी पश्चिम बंगालमध्ये येत आहेत. यावेळी ते हुगळीमध्ये विविध रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनाचे आणि भूमीपूजनाचे कार्यक्रम पार पाडतील. मात्र, त्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी त्याठिकाणी उपस्थित असणार नाहीत. राजशिष्टाचारानुसार पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये संबंधित राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित असणे आवश्यक असते. हुगळीतील कार्यक्रमासाठी भारतीय रेल्वे विभागाकडून बनर्जींना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, प्रशासकीय बैठकांमुळे आपण कार्यक्रमाकरिता उपस्थित राहणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलंय.
 
 
आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नोआपारा ते दक्षिणेश्वर या मेट्रो रेल्वेच्या विस्ताराचे उद्घाटन करतील. या विस्तारामुळे लाखो पर्यटक आणि भाविकांसाठी कालीघाट आणि दक्षिणेश्वर येथील दोन जगातील प्रसिद्ध काली मंदिरांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. दक्षिण पूर्व रेल्वेच्या खडगपूर-आदित्यपूर या तिसऱ्या मार्गाचे पंतप्रधानही उद्घाटन करतील. यामुळे हावडा-मुंबई ट्रंक मार्गावर प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची अखंडित गतिशीलता सुनिश्चित करण्यात मदत होईल. सोबतच अनेक रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आज सायंकाळी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.